एकदा तरी अनुभवावे रवीन्द्रनाथांचे शांतिनिकेतन | Arundhati Deshmukh | Shantiniketan Experience in Marathi
रवीन्द्र संगीताचे जनक, विश्वकवी गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर (टागोर) हे हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी बंगालमधील शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरात सव्वाशे वर्षांपूर्वी शाळा आणि विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन १९२१ साली झाले. म्हणजे यंदा १०५ वे वर्ष आहे आणि आजही बालवाडी ते पीएचडी पर्यंतचे विद्यार्थी येथे शिकत आहेत. आंतरराष्ट्रीय नकाशावर विश्व भारती स्वत:चे नाव टिकवून आहे आणि भारताचा झेंडा जगात फडकवत आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात, कोलकातापासून 164 किलोमीटर अंतरावर शांतिनिकेतन वसले आहे.
Gurudev Rabindranath Tagore
केवळ निसर्गोत्सवांना स्थान | Shantiniketan in Nature
रवीन्द्रनाथांचे पिता महर्षि देवेन्द्रनाथ यांच्या काळापासूनच ठाकूर कुटुंबीय ब्रह्मो समाजी असल्याने मूर्तिपूजक नव्हते. त्याच्याच परिणामी शांतिनिकेतन आश्रम परिसरात फक्त निसर्गपूजा होते. देवीदेवतांच्या उत्सवांना येथे स्थान नाही. जगभरातील बंगाली समाज दुर्गापूजा जल्लोषात साजरी करतो. पण शांतिनिकेतनात मात्र दुर्गोत्सव होत नाही ! दुर्गापूजेचा मागमूसही आश्रमात आढळत नाही. अगदी बंगभूमीत राहून सुद्धा शंभर वर्षांहून अधिक काळ दुर्गा पूजोत्सव शांतिनिकेनने टाळला आहे. केवळ रवीन्द्रनाथच असे आश्चर्य घडवू शकले. कारण, त्यांनी भारताच्या प्राचीन हिंदू संस्कृतीमधील निसर्गाच्या महत्तेचा स्वीकार केला आणि तोच राबविला. आपले पूर्वज मुळात निसर्गपूजकच होते. त्यामुळेच झाडे, नद्यांपासून सापांपर्यंत अनेक प्राण्यांची पूजा आपण करीत आलो आहोत. देवदेवता, मूर्तिपूजा हे पूजेत नंतर समाविष्ट झाले. गुरुदेवांनी हेच हेरले आणि शांतिनिकेतनसाठी फक्त निसर्गोत्सव तेवढे पत्करले. संस्कृतीरक्षणाचा त्यांचा हा विलक्षण प्रकल्प आता दुसऱ्या शतकातही राबत आहे, ही त्यांच्या द्रष्टेपणाला मिळालेली पावतीच म्हटली पाहिजे. या आश्रमात मूर्ती नसलेले काचेचे ब्रह्म मंदिर आहे, जेथे फक्त उपासना होते. उत्सव होतात ते निसर्गाशी-ऋतूंशी संबंधित आणि उघड्यावर निसर्गरम्य वातावरणातच. बांगला नववर्ष दिन उत्सव (पोईला बैशाख), बसंतोत्सव, माघोत्सव, पौषोत्सव, वर्षोत्सवांतर्गत व्रुक्षारोपण, हलकर्षण (नांगरणीचा शुभारंभ) वगैरे. या प्रत्येक उत्सवात आणि विद्यापीठाच्या इतरही कार्यक्रमांंमध्ये दोन उपचार असतातच- उपनिषदातील मंत्र अन् रवीन्द्र संगीत. या दोघांशिवाय एकही "अनुष्ठान" येथे होऊच शकत नाही. महत्त्वाच्या कार्यक्रमांचे "पौरोहित्य" करण्याची जबाबदारी कुलगुरूंंवर (उपाचार्य) असते. उपनिषदातील संस्कृत मंत्र हा एकप्रकारे शांतिनिकेतनचा पासवर्डच बनलेला आहे !
गुरुकुलाचा वारस
शांतिनिकेतन आश्रमात प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीचा भास होतो. जंगलातील ऋषिमुनींकडे जाऊन विद्यार्थी शिकत असत. त्यात गुरुदेवांनी परिस्थितीनुरूप बदल केले. निवासी विद्यापीठ असल्याने विद्यार्थ्यांना आश्रमातील होस्टेलमध्ये राहावे लागते. कर्मचाऱ्यांचे पाल्य आणि २५ किलोमीटर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना होस्टेलमध्ये राहण्यापासून सूट दिलेली आहे. पाठभवन म्हणजे पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व वर्ग शक्यतो आम्रकुंजातील झाडाखालीच भरतात. यासाठी काही विस्तीर्ण झाडांखाली सिमेंटचे गोलाकार ओटे बांधलेले आहेत. पाऊस आला तर या वर्गांना सुट्टी असते ! नववीपासून मुलामुलींंना साडी-पोलके आणि बंगाली-पायजमा हा पोषाख आहे. यातील साडी आणि बंगाली सदरा यांचा रंग भगवा. गौरप्रांगण नावाच्या विस्तीर्ण मैदानात एका टोकावर मोठा स्टेज उभारलेला आहे. येथे आणि आम्रकुंजातही संगीत, नाटक, नृत्यनाट्य, नाच, साहित्यिक कार्यक्रम वगैरे दिवसा आणि रात्रीही होत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात, प्राचीन गुरुकुलाप्रमाणे सारं काही होते. गुरुकुलातील शिष्यांची स्वावलंबन पद्धत मात्र गुरुदेवांनी घेतली नाही.
विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय म्हणून मोठ्या मेस उभारल्या. यावरून त्यांचे महात्मा गांधींशी मतभेदही झाले. शेवटी, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आश्रम चालवून पाहा, असे आव्हान गांधीजींना देऊन रवीन्द्रनाथ बाहेर निघून गेले. आठवडाभरानंतर गांधींनी पराभव मान्य केला. "हे विद्यार्थी माझ्या संस्थेत कलांचे शिक्षण घ्यायला आले आहेत. ते जर साफसूफ, स्वयंपाकपाणी हेच करत राहिले तर त्यांना वेळ मिळेल का" हा गुरुदेवांचा बिनतोड युक्तिवाद गांधींनाही मान्य करावा लागला.
Shantiniketan Home
कलासक्त गुरुदेव अनेक कलांचे भोक्ते आणि स्वत: कलावंत होते. वयाच्या १६ व्या वर्षीच पहिली कविता लिहून त्यांनी लवकरच काव्यसंग्रह काढला, प्रौढ वयात मणिपुरी नाच शिकून नृत्यनाटिकेत अभिनय केला आणि वयाच्या ७९ व्या वर्षी पहिल्यांदा कुंचला हाती धरून जगप्रसिद्ध चित्रांची निर्मिती केली. शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण न घेताही बांगला भाषेच्या विकासात त्यांनी मूलभूत योगदान दिले. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. स्वत:च्या 'गीतांजली' या बंगाली काव्यसंग्रहाचा इंग्रजी अनुवाद त्यांनी स्वत:च केला आणि त्यावर भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून दिला. शिक्षणावर व्यापक चिंतन, कलांसोबतच कृषी आणि विज्ञान यांंनाही प्रोत्साहन, शेवटच्या काळात चित्रपट या नव्या माध्यमात निर्मिती आणि दिग्दर्शन, सामाजिक सुधारणांचे सर्व स्तरांवर प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात अव्वल दर्जाचे सहकारी निवडण्याची उपजत हातोटी यामुळे रवीन्द्रनाथांची संपूर्ण कारकीर्द एकाचवेळी अनेक विषयांमध्ये यशस्वी राहिली. नव्हे, ती शिखरावरच पोहोचली. त्याद्वारे त्यांनी आपली संस्कृती प्रवाहित ठेवण्याचे आणि जगासमोर आणण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले. त्यासाठी समस्त भारतीयांनी कायम त्यांच्या ऋणातच राहिले पाहिजे. रवीन्द्रनाथांसारखा बहुमखी प्रतिभेचा धनी असलेला असा माणूस जगात दुसरा झाल्याची नोंद आढळत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे आणि त्यांचा शांतिनिकेतन आश्रम अवश्य पाहिला-अनुभवला पाहिजे.
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️


Good article.
ReplyDeleteamazing writing, chhan
ReplyDeleteGood writing Arundhati madam
ReplyDeleteछान संदर्भ लेख... रवींद्रनाथांना विनम्र अभिवादन 🌺🌺
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
छान लेखन
ReplyDeleteउत्तम लेख 👍
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
Arundhanti mam nice writing.
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
Chhan lekhan
ReplyDeleteरवींद्रनाथ टागोरांच्या विचारांची नेमकी ओळख करुन देणारा लेख
ReplyDelete