विदर्भातील ‘मधाचे गाव’ बघितले का? | Honey Village Andharwadi Travel Guide | Agri Tourism in Maharashtra
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अंधारवाडी या चिमुकल्या आदिवासी गावाने मध संकलातून विकासाचा मार्ग साधला आहे. राज्य सरकारने या गावाच्या हातात हात घालून त्याला ‘मधाचे गाव’ ही नवी ओळख मिळवून दिली. या गावाच्या ‘विकास वाटे’ वरील प्रवासाविषयी...
Andharwadi Village, Yavatmal
हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरच्या जंगलाला लागून असलेल्या या गावात गोंड आणि कोलाम या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. मधमाशांचा मुक्त संचार असलेल्या या परिसरातील झाडांवरच्या मधाच्या पोळ्यातील मध काढून ते २० किमीवरील पांढरकवड्याला ५० रुपये किलो दराने विकायचे. मात्र येथील मधाची उपलब्धता पाहून राज्य शासनाने मधाचे गाव म्हणून अंधारवाडी विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि या गावाची वाटचाल स्वावलंबनातून समृद्धीकड़े सुरू झाली. दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन मधामुळे त्यांचे आयुष्य कसे बदलू शकते, हे समजावून सांगितले. गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता विद्यमान उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांच्या नेतृत्वात अंधारवाडीची वाटचाल उजेडाकडे सुरू आहे. येथे पूर्वी पारंपरिक पद्धतीने मध गोळा केले जायचे. मात्र शासनाने त्यांना शास्त्रीय पद्धतीने मध गोळा करण्याच्या पद्धत शिकविली. त्यासाठी दहा दिवसांच्या प्रशिक्षणासहच पुणे, महाबळेश्वर येथे त्यांचा अभ्यास दौराही केला. त्यामुळे मध संकलनात अन्यत्र काय सुरू आहे हे पाहून, मध आपले भाग्य बदलवू शकते, याची त्यांना खात्री पटली. आजवर ५० रुपये किलोने २० किमी दूर जाऊन विकाव्या लागणाऱ्या मधाला आता गावातच १००० रुपये किलोचा दर मिळू लागण्याचा चमत्कार यामुळे घडला आहे.
मध कसे काढतात, प्रत्यक्ष बघा! | Honey Village Farming in Vidarbha, Maharashtra
शासनाने येथे २०० मधुमक्षिका पालन पेट्या दिल्या. घराच्या परिसरात किंवा लगतच्या जंगलात या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधमाशांचे पोळे या पेट्यांमध्ये तयार होते आणि पोळे पूर्ण झाले की, त्यातून मध काढण्यात येते. एका पेटीतून साधारण एक ते दोन किलो मध निघते, अशी माहिती येथील व्यंकटेश दळांजे यांनी दिली. पूर्वी झाडावरील पोळ्यातून मध काढायचे म्हणजे झाडावर चढावे लागायचे. त्यातही कधी वन्यप्राणी तर कधी मधमाशांच्या हल्ल्याची भीती, पण आता त्यातून सुटका झाली आणि या सुरक्षित शास्त्रीय पद्धतीने गावातील महिलाही मध संकलित करू लागल्या आहेत. मध उत्पादन वाढण्यासाठी लवकरच येथे मधुबनची निर्मिती केली जाणार असून, त्यासाठी १२ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. आता फक्त मधावर आपला उदरनिर्वाह होऊ शकतो, याची खात्री गावकऱ्यांना पटली आहे. आजवर मध विकण्यासाठी फिरावे लागायचे, ती वणवण शासनाच्या प्रयत्नांनी थांबली आहे.
जंगल सफारीसोबत मधाच्या गावाची सैर | Honey Village Tour with Tipeshwar Jungle Safari
या मधाला हक्काची बाजारपेठ नव्हती, मात्र आता टिपेश्वर अभयारण्यात येणारे पर्यटकच अंधारवाडीत येऊन मध खरेदी करतात, असे येथील विकास क्षीरसागर यांनी सांगितले. मधाचे गाव ही ओळख मिळाल्यामुळे पर्यटकांचा ओघ येथे वाढला. गावात पोहचण्यासाठी पूर्वीरस्ता नव्हता, तो राज्य शासनाने प्राधान्याने केला. अंगणवाडीची नवीन इमारत, नवीन घरकुले, गावकऱ्यांना बसण्यासाठी परंपरा जपत बांधलेला पार, घरांच्या भिंतीवरची मधमाशांची रंगीत चित्रे येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. मधामुळे उत्पन्न वाढून राहणीमान बदलले. आर्थिक स्थिती आता आधीसारखी राहिली नाही, अशी प्रतिक्रिया येथील पोलीस पाटील कविता दळांजे यांनी व्यक्त केली, तर प्रत्येक गोष्टीसाठी मोठ्या गावात जावे लागायचे. अडचणी यायच्या पण सरकारच्या या योजनेमुळे ते चित्र राहिले नसल्याचे लक्ष्मी टेकाम सांगतात. येथील सरपंच लक्ष्मी भूजंग मेश्राम म्हणाल्या की, मधमाशांनी आमचे नशीबच बदलले. मधाला भाव तर मिळायला लागलाच पण अनेक सुविधा गावात आल्या. आधी रस्ता नसल्याने कोणतेही वाहन गावात येऊ शकत नव्हते. रुग्णाला खाटेवर दवाखान्यात न्यावे लागायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
Tourist Walk at Honey Village Andharwadi
बैलबंडीत फेरफटका आणि गोंडी नृत्यचा आनंद | Bullock Cart and Gondi Dance Experience in Vidarbha
टिपेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना येथे मध तर मिळतेच पण गावकरी त्यांना बैलबंडीची सफारी घडवितात. बैलबंडीचे अप्रुप असलेले पर्यटक त्यात बसून गावात चक्कर मारतात. त्याचे पाचशे रुपये मिळतात. याशिवाय पर्यटकांसाठी पारंपरिक गोंडी नृत्यही सादर करण्यात येते. त्याकरिता शासनाने एक खुले सभागृह बांधून दिले आहे. ‘मधाचे गाव’ प्रकल्पामुळे या गावात विकासगंगा पोहचली आणि येथील अर्थकारण लक्षणीय बदलले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत या उपक्रमाला साह्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शबरी आदिवासी अर्थ विकास महामंडळाच्या शबरी नॅचरल्समध्ये या मधाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात कुठूनही या मधाची खरेदी करता येईल. लवकरच गावात मध विक्रीचे केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांनी दिली. मधाच्या गावाची ही सुरुवात आहे. कायमस्वरूपी मधुबन, मार्केटिंग, पॅकेजिंग आणि अन्य बाजारपेठ, प्रसिद्धी असे अनेक टप्पे बाकी आहेत. हे जरी खरी असले तरी सुरुवात होणे ही बाब देखील तेव्हढीच महत्त्वाची आहे. स्थानिक संसाधनांचा उपयोग करून गाव कसे समृद्धीकडे नेता येऊ शकते, याचा आदर्श अंधारवाडीने घालून दिला आहे हे निश्चित.
Gondi Tribal Dance
रोजगार आणि पर्यटनाची सांगड | Job Creation along with Tourist Spot Development in Maharashtra
विदर्भाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर केवळ शहरं नाही तर गावपातळीवर देखील लहान-मोठे उद्योग उभे राहावे, राज्यातील प्रत्येक छोट्या-छोट्या गावांचा विकास होऊन ती स्वावलंबी व्हावी, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले स्वप्न अंधारवाडीत पूर्ण होताना दिसत आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने विदर्भात सुरू झालेला अंधारवाडी ‘मधाचे गाव’ प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. गावात रोजगार निर्माण करून पर्यटनाला हातभार लावण्याचे असे लहान - मोठे प्रयोग लक्षणीय ठरतात.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.


छान माहितीपूर्ण लेख.. अविनाशजी
ReplyDeleteअंधारवाडीची प्रकाशवाट
DeleteAvinash Ji - Tumcha lekhan kharach changla ahe. Devendra ji cha kaam ullekhaniya ahe.
ReplyDeleteThis should be done across Maharashtra villages.
ReplyDelete