‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism
नवसाला पावणारे आजनसरा येथील श्री भोजाजी महाराज देवस्थान
Ajansara Temple | Temples in Maharashtra
विदर्भात वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात एक गाव असे आहे जेथे दररोज हजारो किलो पुरण बनते आणि तेथील देवस्थानात फक्त पुरण पोळीचाच नैवेद्य दाखविला जातो. या गावाचे नाव आहे आजनसरा. येथील श्री भोजाजी महाराज देवस्थान म्हणजे नवसाला पावणारे देवस्थान अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आजनसरा येथील भोजाजी महाराज मंदिरात पुरण पोळीच्या नैवेद्याची परंपरा कधी आणि कुणी सुरू केली याबाबत नेमकी माहिती नाही. परंतु याबाबतच्या आख्यायिकेनुसार, एका भक्ताच्या स्वप्नात भोजाजी महाराज आले आणि त्यांनी पुरणाच्या नैवेद्याचा दृष्टांत दिला, तेव्हापासून येथे पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा सुरू आहे.
पुरणपोळ्या बनवा चुलीवर
Ajansara Temple | Temples in Maharashtra
संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. रविवारी आणि बुधवारी संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक आजनसरा येथे पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. याशिवाय मंदिर परिसरातही स्वयंपाकासाठी आठ ते दहा शेड तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेडमध्ये शंभर चुली पेटतील अशी व्यवस्था केली आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्यास परवानगी आहे.
Ajansara Temple | Temples in Maharashtra
दगडी पाट्यावर पुरण वाटले जायचे
पूर्वीच्या काळी फारशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने पुरणाची डाळ परंपरागत पद्धतीने म्हणजे पाटा वरवंट्यावर वाटल्या जात होती. भक्तांची वाढती संख्या आणि पुराणाचे प्रमाण फार अधिक झाल्यामुळे आता या ठिकाणी पुरण दळण्याची अनेक विद्युत यंत्रे लावण्यात आली आहेत.
कोण होते श्री संत भोजाजी महाराज
श्री संत भोजाजी महाराजांच्या पद स्पर्शाने व कार्याने आजनसरा गाव केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. या स्थळाचे ऐतिहासिक महत्व आहे. संत भोजाजी महाराजांचा जन्म इ.स. १८०० मध्ये आजनसरा येथे झाला. त्यामुळे या स्थळाला २२५ वर्षांची परंपरा आहे. संत भोजाजी महाराजांचे समाधीस्थळ या गावात आहे. त्यांचा जन्म कोसुरकर कुळातील. त्यांच्या वडिलांचे नाव निळाजी पाटील होते. आजीवन ब्रह्मचारी राहिलेले महाराज विठ्ठलाचे भक्त होते. ईश्वर भक्तीतून त्यांनी पूर्णत्व प्राप्त केले होते. ते एक योगी आणि सिद्ध पुरुष होते. त्यांच्यातील दैवीशक्तीचा अनुभव अनेकांना आला. त्यानंतर देवाजी महाराज यांनी भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात इ.स. १९५५ सालच्या द्वादशीला केली. ही परंपरा आजही अखंड सुरु आहे. आजनसरा येथे संत सोनामाता मंदिर सुद्धा आहे.
Ajansara Temple | Temples in Maharashtra
संत भोजाजी महाराजांच्या मंदिरात दर बुधवार आणि रविवारला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन हजारो भक्तगण दूरवरुन येतात. असे सांगतात की, महाराज कुठेही बाहेर गेले की त्यांच्यासोबत एक पांढरा घोडा असायचा. तो आज सुद्धा महाराजांच्या मूर्तीशेजारी आपल्याला दिसतो. संत भोजाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत आजनसरा गावात १९ व्या शतकात आणखी एका संताने सोनामाईच्या रुपात जन्म घेतला. अशी संतांची परंपरा या गावाला लाभली आहे.
वर्धा नदी तीरावर सुंदर मंदिर
वर्धा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात भोजाजी महाराजांचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या डावीकडे विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर आहे. समोरील भागात भक्तांसाठी भव्य सभामंडप आहे. सभा मंडपातील पूर्व दिशेला महाद्वार असून महाद्वाराच्या उत्तरेला राधाकृष्ण मंदिर, पुंडलिक मंदिर व देवाजी महाराजांचे मंदिर आहे. दक्षिणेला गणपती मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूला देवस्थानामार्फत प्रसादालय चालविले जाते. येथे दरदिवशी ५ ते ६ हजार भाविक तर ठराविक दिवशी दहा हजारावर भाविक पुरणपोळीचा प्रसाद ग्रहण करतात.
रिंगण सोहळा व दहीहंडी
भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात रिंगण सोहळा आणि दहीहंडीचे भक्तांना खास आकर्षण असते. पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रात्री ७ वाजता भव्य अशा पालखी मिरवणुकीला सुरुवात होते. जवळपास ३०० ते ३५० भजनी दिंड्यांसह लाखावर भाविक यात सहभागी होतात. विशेष म्हणजे सजविलेले पांढरे घोडे मिरवणुकीच्या समोर मार्गक्रमण करीत असतात. हा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न होतो. मिरवणुकीनंतर ९५ ते १०० भक्त जमिनीवर लोटांगण घालत संपूर्ण गावाची प्रदक्षिणा पूर्ण करुन सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मंदिरात पोहोचतात. याशिवाय रिंगण सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे परीक्षण होऊन उत्कृष्ट दिंड्यांना बक्षिसे दिली जातात. हा रिंगण सोहळा अतिशय सुंदर, बघण्यासारखा असतो. त्यामुळे भाविक रात्रभर याचा आनंद घेतात.
महाराजांच्या मंदिर परिसरात सोनामातेचेही मंदिर असून फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सोनामातेची पुण्यतिथी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यानिमित्त होणाऱ्या खंजिरी भजन स्पर्धेकरिता जवळपास दीड लाख भाविकांची उपस्थिती असते.
पायदळ पालखीचे प्रस्थान
आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर भाविकांची भोजाजी चरणी रीघ लागते व नंतर पंढरपूर यात्रेकरिता आजनसरा येथून पायदळ पालखीचे प्रस्थान होते. त्यात सुमारे ६०० भाविक सहभागी होतात. महिनाभर पायी चालून भक्त पंढरपूरला आषाढी एकादशीला विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतात आणि परतात. आजनसराला पोहोचल्यानंतर महाराजांच्या मंदिरात जवळपास २,००० लोकांना माऊंदे म्हणून महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. पालखी सोहळ्यानंतर संत नामदेव महाराजांच्या सप्ताहास प्रारंभ होतो. त्यानिमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
याशिवाय श्रावण मास, जन्माष्टमी, ऋषीपंचमी, कार्तिक उत्सव यात्रा, ज्ञानेश्वर महाराज एकादशी उत्सव आदी धार्मिक सोहळ्यांनी वर्षभर श्री संत भोजाजी महाराज देवस्थानचा परिसर भक्तांच्या उत्साहाने ओसंडून वाहात असतो. वर्षभरात जवळपास २२ ते २३ लाखावर भाविक या पवित्र स्थळी हजेरी लावतात, अशी माहिती आहे.
![]() |
| Credits: Jayash Photography, Ajansara |
कसे पोहोचाल | How to reach Ajansara Temple
आजनसरा हे गाव नागपूर - हैदराबाद हायवेवर नागपूरपासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या वडनेर या गावापासून पश्चिमेस १० कि.मी.अंतरावर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास पक्का रस्ता आहे. बस अथवा खासगी वाहनाने पोहोचण्यास दोन तास लागतात. वर्धेहून रेल्वेने गेल्यास ३० मिनिटात पोहोचतो.
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️
सखी
नागपूर






naveen mahiti ahe
ReplyDeleteछान लेख
ReplyDeleteमहाराष्ट्रात संतांची मोठी परंपरा आहे. या संतांमुळे येथील जनजीवन समृद्ध होण्यास मदत झाली.
ReplyDeleteWow good info
ReplyDeleteNice
ReplyDelete