चला, नागपुरातील पर्यटनस्थळांची सैर करायला! | Tourist Spots in Nagpur, Vidarbha, Maharashtra | Nagpur Travel Guide
हेमाडपंथी शैलीच्या आणि त्यानंतर बांधलेल्या भोसलेकालीन मंदिरातील धूपारतीने पवित्र झालेल्या, भोवताली पसरलेल्या वनराईने व्याप्त नागपूर जिल्ह्याचे दर्शन विलोभनीय आहे. नागपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर आहे. तीनशे वर्षांपेक्षाही जास्त मोठा इतिहास या शहराला आहे.
नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना शहरातच रमवणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. सेमिनरी हिल्सपासून महाराजबागपर्यंत आणि मग उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पापासून रामटेकच्या नयनरम्य पौराणिक वारसा असलेल्या परिसरापर्यंत असंख्य ठिकाणे अगदी तासाभराच्या अंतरावर आहेत. नागपूर शहरातच अनेक पर्यटनस्थळे आहेत. इथल्या वास्तव्यात सहजच या ठिकाणांना भेट देऊ शकतो.
१. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय, गोरेवाडा | Gorewada Zoo
नागपूर शहराच्या पश्चिमेला गोरेवाडा येथे १९१४ हेक्टर जागेवर विकसित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणिसंग्रहालयात वाघ,बिबट, अस्वल, सांबर, चितळ आदी वन्य प्राणी नैसर्गिक अधिवासात वावरताना दिसतात. येथे सफारीसाठी गाड्यांची व्यवस्था आहे. याशिवाय येथे पदभ्रमण, पक्षीनिरीक्षण आणि सायकलींगचा आनंद घेण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. जंगल सफारी, प्राणिसंग्रहालय आणि जैवविविधता उद्यान ही येथील वैशिष्ट्ये आहेत.
Gorewada Zoo
कसे पोहोचाल
नागपूर शहराच्या वाडी येथून माणकापूरकडे जाणारा रस्ता मध्ये काटोलकडे वळतो. तेथेच हे प्राणिसंग्रहालय आहे. नागपूरचे विमानतळ,बसस्थानक तसेच रेल्वेस्टेशनपासून टॅक्सीने अवघ्या अर्ध्या तासात येथे पोहोचतो.
२. महाराजबाग प्राणिसंग्रहालय | Maharaj Bagh Zoo
महाराजबाग प्राणिसंग्रहालय १२० वर्षे जुने आहे. सुमारे १५ एकर परिसरात ते पसरलेले आहे. वाघ, बिबट, अस्वल, हरीण, काळवीट, सांबर, ससे, बगळे, बदके, मोर असे अनेक प्राणी येथे पिंजराबंद आहेत. महाराजबागेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती. मॅहोगनी, गोरखचिंच, कदंब, काळा अंकोल, नागलिंगम, रक्तचंदन, शिरणी, कुसुम आदी वनस्पती येथे बघायला मिळतात. येथे शेजारीच आंबेवाडी आहे. तेथे नागीण जातीचे आंब्याचे वृक्ष आहेत.
Maharaj Bagh Zoo
वनस्पतींनी व्यापलेल्या हिरव्या परिसरामुळे सकाळी येथे नानाविध पक्षांचा संचार असतो. वटवट्या, शिंजीर, तांबट, सातभाई, दयाळ, सुतार, हळद्या, नीलकंठ, टाकचोर, खंड्या, कोतवाल, साळुंकी, भारद्वाज आदी पक्ष इतर सामान्य पक्ष्यांसमवेत दिसतात.
३. बॉटनिकल गार्डन (सातपुडा वनस्पती उद्यान) | Botanical Garden Nagpur
तेलंखेडी तलावाजवळील २५ हेक्टर जागेवर उभारण्यात आलेले जैवविविधता उद्यान ३ टेकड्या आणि २ दऱ्यांनी वेढलेले आहे. विविध प्रकारच्या १५० जातींच्या वनस्पतींचा संग्रह येथे आहे. येथील उद्यान रमणीय आहे. मध्यभागी जलकुंभ तयार करण्यात आला असून या जलकुंभात प्रेक्षक दीर्घा आणि उपहारगृह आहे.
Botanical Garden Nagpur
फर्नगृह तसेच कंटतरु व रसाळ वनस्पती गृहांशिवाय येथे अरबोटेरम, बांबुवन, ताडवन,गुलाब वाटिका, कर्दळी उद्यान, बोगन वेल, सुगंधी बाग, जपानी गार्डन, औषधी उद्यान, जलीय वनस्पती उद्यान, रोपवाटिका, दुर्मिळ व लुप्त वनस्पती हरिगृह आहेत. येथे तुम्ही रोपंही खरेदी करु शकता.
४. मोतीबाग नॅरोगेज रेल्वे संग्रहालय | Railway Museum Nagpur
भारतीय रेल्वेतील नॅरोगेजचा ऐतिहासिक वारसा सांगणारे नागपुरातील नॅरोगेज संग्रहालय बघण्यासारखे आहे. ब्रिटिशांनी मध्य भारतात सातपुडा रेल्वे म्हणून रेल्वेचे जाळे विणले. त्या मार्गावर कित्येक वर्ष स्वतंत्र भारतातही प्रवास सुरू होता. हे रेल्वेमार्ग १९०३ ते १९०९ या कालावधीत सुरू झाले. मध्य भारतात ब्रिटिशांच्या काळात सुरु केलेल्या या नॅरोगेज रेल्वेची इत्यंभूत माहिती मोतीबाग परिसरातील या संग्रहालयात मिळते.
५. मुनिया संवर्धन क्षेत्र
नागपूर शहरानजीक बुटीबोरी औद्योगिक वसाहतीजवळ ९६ चौ.किमी वनक्षेत्रात मुनिया संवर्धन क्षेत्र आहे. हा पक्ष्यांचा स्वर्ग आहे. येथे चितळ, सांबर,नीलगाय, काळवीट, वाघ, बिबट आदी प्राणी आढळतात. अत्यंत दुर्मिळ असा माळढोक पक्षीसुद्धा येथे आढळून आला आहे.
कसे पोहोचाल
नागपूर ते वर्धा किंवा चंद्रपूर मार्गावर बुटीबोरी गावाजवळ हे संवर्धन क्षेत्र वसले आहे. नागपूर विमानतळ,बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशनपासून टॅक्सीने अर्ध्या तासात येथे पोहोचता येते.
६. सेमिनरी हिल्स | Seminary Hills Nagpur
सेमिनरी हिल्स हे नागपूर शहरातील मनोहारी पर्यटन स्थळ आहे. शुद्ध व खेळती हवा, अजिबात प्रदूषण नाही त्यामुळे या भागात सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या टेकडीच्या टोकावरुन शहराचे विहंगम दृश्य बघायला मिळते. येथे भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेश्वराचेही मंदिर आहे. याच टेकडीवर बालाजीचे अतिशय सुंदर दाक्षिणात्य शैलीतील मंदिर आहे. सेमिनरी हिल्स बगिच्यात लहान मुलांची कायम चिवचिवाट असते. टॉय ट्रेन हे येथील वैशिष्ट आहे.
७. अजब बंगला | Central Museum Nagpur
देशात मध्यभागी असलेल्या नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ब्रिटिशांच्या काळातली एक देखणी वास्तू आहे. या ऐतिहासिक वास्तूत अजब वस्तूंची गजब दुनिया दडलेली आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात विधानभवनाजवळ स्थित हे संग्रहालय वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
ब्रिटिशांच्या काळात ॲन्टेक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस या संस्थेच्या गरजेनुसार नागपूर येथे संग्रहालय व ग्रंथालय स्थापन करण्यात आले होते. संग्रहालयाची इमारत बांधून त्याला ‘सेंट्रल म्युझियम नागपूर’ असे नाव देण्यात आले व ७ मे १८६३ रोजी हे संग्रहालय सुरू झाले. याची इमारत 'सी’ आकारात (C-shaped) असून ती लाल विटांनी बांधलेली आहे आणि त्याला उतरते छप्पर आहे.
मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय असलेल्या या १५३ वर्षे जुन्या संग्रहालयात भूगर्भ व प्रागैतिहासिक, प्राणी (स्टफ), पक्षी, सरपटणारे प्राणी, आर्ट ॲण्ड क्राफ्ट, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी दालनांचा समावेश आहे.
वाकाटक काळातील विष्णू प्रतिमा,बाराव्या शतकातील ब्रह्मामूर्ती तसेच मुघलकालीन, राजपुतकालीन शस्त्रे, कौंडण्यपूर, माहुरझरी व पवनी येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, दख्खन, जयपुरी, उदयपूर, बिकानेर, पहाडी, मराठी शैलीतील पेंटिंग येथे बघायला मिळतात. इ.स. पहिल्या शतकातील पवनीच्या उत्खननात सापडलेले शीलालेखावरील पदवी प्रमाणपत्र, तसेच, लंडनची राणी व्हिक्टोरियाची तरुण आणि वृद्धावस्थेतील भव्य मूर्ती, फ्रान्स फिरून आलेले हत्ती या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहेत.
त्या काळी या बंगल्यात दुर्मिळ वस्तू, प्राणी, आणि विदेशी वस्तूंचा संग्रह पाहिल्यानंतर लोकांचे कुतूहल वाढत असे. या अनोख्या संग्रहामुळे नागपूरकर याला 'अजब बंगला' (अद्भुत बंगला) म्हणू लागले.
नागपूरचे हेरिटेज | Heritage of Nagpur City
संग्रहालयातील नागपूर हेरिटेज दालनात विविध वारसास्थळांची छायाचित्रे व माहिती देण्यात आलेली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या नावाचे फलक येथे असून त्यात १८५७ व १९४२ च्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांचे नामस्मरण करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, लक्ष्मीनारायण मंदिर, मध्यवर्ती संग्रहालय, रेल्वे स्टेशन इत्यादी प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे येथे बघायला मिळतात. नागपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीत अजब बंगल्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
केव्हा जायचे
दर सोमवारी अजब बंगला बंद असतो. इतर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असते. २६ जानेवारी, होळी, धूलिवंदन, १ मे, १५ ऑगस्ट, दसरा व दिवाळी या सणांना संग्रहालय बंद असते.
८. झीरो माईल (देशाचा मध्यबिंदू) | Zero Mile Nagpur
नागपूर हा देशाचा मध्यबिंदू आहे असे समजून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी शहरातील जे ठिकाण निश्चित केले, ते म्हणजे झीरो माईल. देशाच्या विभाजनानंतर भारताचा मध्यबिंदू जबलपूरजवळ निश्चित झाला; पण स्वातंत्र्यापूर्वीच्या अखंड भारताचे प्रतीक म्हणून नागपुरातील या झीरो माईलकडे बघितले जाते. देशाचा केंद्रबिंदू आपल्या शहरात आहे, हा नागपूरकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. भारताचा नकाशा सर्वात पहिल्यांदा ब्रिटिशांनीच तयार केला. त्या काळात तंत्रज्ञान आजच्यासारखे प्रगत नव्हते. अशा परिस्थितीत ब्रिटिशांनी नकाशा आणि रस्तेबांधणीचे काम हाती घेतले होते. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे असे समजून झीरो माईल स्तंभ उभारला.
१७६७ साली ‘ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली. या विभागाने १९०७ साली सीताबर्डी किल्ल्यालगतचे हे ठिकाण देशाचा केंद्रबिंदू निश्चित केले. त्यावेळी पाकिस्तान, बांगलादेश भारतातच होते. त्यामुळे त्यांचाही विचार हा केंद्रबिंदू ठरविताना झाला होता. झीरो माईलची समुद्र सपाटीपासून उंची १०२०.१७१ फूट आहे. झीरो माईलच्या उंच स्तंभाजवळ एक छोटासा दगड आहे. हा दगड म्हणजे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते. असे सांगतात की, केंद्रबिंदू निश्चित झाल्यावर तब्बल ८४ वर्षांनी या स्तंभाची उभारणी करण्यात आली. हा स्तंभ सीताबर्डी ते कस्तुरचंद पार्कच्या मार्गावर आहे. ग्रेट ट्रॅग्युलर सर्व्हे या कंपनीला ब्रिटिशांनी भारताचा नकाशा तयार करण्याचे काम दिले होते. त्यांनी हा शून्य मैल ग्राह्य धरुन येथून चारही दिशांना जवळपास १५० घोडेस्वार दौडविले. बहुदा त्याचे प्रतीक म्हणूनच येथे चार दिशांना उधळलेल्या घोड्यांचे शिल्प तयार करण्यात आले आहे.
हा मैलाचा दगड इंग्रजांनी १८२३ साली बसविला पण काळाच्या ओघात तो विस्मृतीत गेला होता. मात्र, एक फ्रेंच महिला या दगडाचा शोध घेत नागपुरात आली आणि तिने हा दगड १९८९ साली उजेडात आणला. तिच्या आजोबांनी हा दगड बसविला होता, अशीही एक कथा सांगितली जाते.
९. रमण सायन्स सेंटर | Raman Science Center, Nagpur
शुक्रवारी तलाव म्हणजेच आजच्या गांधीसागर तलावाच्या काठावर १९८९ साली रमण सायन्स सेंटर उभारण्यात आले. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक सी.व्ही. रमण यांचे नागपुरात ऑडिटर जनरल ऑफीसमध्ये नोकरी करत असताना काही काळ वास्तव्य होते. ते ऋणानुबंध विचारात घेता या केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले. हे केंद्र कोलकात्याच्या नॅशनल कॉन्सिल ऑफ सायन्स म्युझियमने निर्माण केले आहे.
Raman Science Center Nagpur
येथे कायकाय अनुभवायला मिळणार?
तारांगण: येथील अत्याधुनिक तारांगणात भरदिवसा रात्रीच्या अवकाशाचा आनंद लुटता येतो. अभ्यागतांना खगोलशास्त्राच्या विज्ञानाची माहिती येथे मिळते. याठिकाणी एक छोटेसे वाचनालय आणि सभागृह देखील आहे. दर बुधवारी आणि रविवारी सूर्यास्तानंतर आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो.
इतिहासपूर्व प्राणी उद्यान: प्री हिस्टॉरिक ॲनिमल पार्क हे अशा प्रकारचे मध्य भारतातील एकमेव केंद्र असावे. त्रिमिती आकृत्यांच्या सहाय्याने दर्शकांना इतिहासपूर्व काळातील प्राण्यांचे दर्शन घडवितात. ५०० ते १००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांना बघताना आश्चर्य वाटते.
Raman Science Center Nagpur
थ्री डी सायन्स शो: दररोज चार शो असतात. खास चष्मे घालून हा शो बघितला जातो.
विज्ञान बाग: हसतखेळत विज्ञान शिका, या तत्वाच्या आधारे येथे ६ एकर परिसरात एक विज्ञान बाग विकसित करण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांचे पिंजरे, औषधी वनस्पती आदी येथील वैशिष्ट्ये आहेत.
येथील माहिती व संवाद तंत्रज्ञानाच्या गॅलरीत गुंफा मानवापासून आजच्या माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेल्या अवस्थेपर्यंतचा प्रवास अनुभवायला मिळतो.
फन सायन्स प्रदर्शन म्हणजे विज्ञानातील गमतीजमतीचे प्रदर्शन. यात फ्लोअर पियानो, आभासी पुस्तक, अदृश्याचे दृश्य परिणाम, साबणाचा अतिभव्य बुडबुडा असे अनेक प्रयोग आहेत.
केव्हा जायचे
मार्च ते ऑक्टोबर: सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, नोव्हेंबर ते फेब्रुवारी : सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजपर्यंत खुले असते. होळी आणि दिवाळीला केंद्र बंद असते.
तुम्ही येथे गेले आहात का? कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !







Comments
Post a Comment
🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.