सेवाग्राम: केवळ भूतकाळाचा वारसा नाही, तर वर्तमानासाठीचा आरसा | Sevagram Ashram, Wardha | Heritage Tourism | Tourism in Vidarbha | Maharashtra Tourism
जिथे मातीच्या साध्या कुटीतून देशाच्या स्वातंत्र्याचा आणि मानवतेचा मार्ग आखला गेला
विदर्भातील वर्ध्याच्या भूमीला एक वेगळेच भाग्य लाभले आहे. या भूमीवरून महात्मा गांधींच्या विचारांचा सुगंध देशभर पसरला. वर्ध्यापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेले सेवाग्राम हे केवळ एक आश्रम नाही; ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे, ग्रामस्वराज्याचे, अहिंसेचे आणि साधेपणाचे जिवंत स्मारक आहे. सेवाग्रामला जाण्याचा योग आला आणि मनात एक वेगळीच उत्सुकता होती. इतिहासाच्या पुस्तकांत अनेकदा वाचलेले ‘बापू’, त्यांच्या कुटीतील साधे जीवन, चरखा, प्रार्थना, सत्य-अहिंसेचे प्रयोग आणि स्वातंत्र्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची आठवण- हे सर्व प्रत्यक्ष अनुभवायचे होते.
नागपुरातून सेवाग्रामकडे जाताना हळूहळू परिसर बदलत जातो. हा रस्ता तर फारच सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवाई, गावाकडची शांतता आणि साधेपणा मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. असे वाटते, जणू आपण वर्तमानातून काही दशके मागे जात आहोत.आणि मग समोर येते, सेवाग्राम आश्रमाची शांत, प्रसन्न भूमी.
आज ज्याला आपण सेवाग्राम म्हणून ओळखतो, ते गाव पूर्वी ‘सेगाव’ या नावाने ओळखले जात होते. महात्मा गांधी ३० एप्रिल १९३६ रोजी येथे आले. त्यावेळी हे अगदी साधे, ग्रामीण गाव होते. वर्ध्यापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला त्या काळी रस्त्याची आणि टपालाचीही व्यवस्थित सुविधा नव्हती. गांधीजींना शहराच्या सुखसोयींपासून दूर, भारताच्या खऱ्या जीवनाशी जोडलेले राहायचे होते. म्हणूनच त्यांनी गावात राहण्याचा निर्णय घेतला. ग्रामजीवन समजून घेणे, ग्रामोद्योगांना चालना देणे, स्वावलंबन वाढवणे आणि खेड्यांच्या पुनर्रचनेतून भारत घडवणे, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. गांधीजींनी आपल्या कुटीच्या बांधकामासाठीही कमीत कमी खर्च करण्याचा आग्रह धरला होता. साधेपणा हा त्यांच्या जीवनाचा केवळ पोशाख नव्हता; तो त्यांच्या विचारांचा पाया होता. ५ मार्च १९४० रोजी ‘सेगाव’चे नाव बदलून ‘सेवाग्राम’ करण्यात आले. एकाच नावाची इतर ठिकाणांशी होणारी गफलत टाळण्यासाठी हे नामकरण करण्यात आले.
Sevagram Ashram
बापूंच्या कुटीत प्रवेश करताना...
आश्रमातील सर्वांत भावस्पर्शी ठिकाण म्हणजे बापू कुटी. कुटीच्या दिशेने पावले पडत असताना मनात एकच विचार येत राहतो.. याच ठिकाणी गांधीजी बसले असतील, विचार केला असेल, पत्रे लिहिली असतील, देशाच्या भवितव्यावर चर्चा केली असेल आणि असंख्य लोकांना मार्गदर्शन केले असेल! बापू कुटी ही गांधीजींच्या सेवाग्राममधील वास्तव्याचे केंद्र होती. १९३६ ते १९४६ या काळात सेवाग्राम हे गांधीजींचे घर आणि स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे केंद्र राहिले. कुटीत शिरताना भव्यता कुठेच दिसत नाही. उलट साधेपणाच सर्वत्र जाणवतो. पण याच साध्या जागेतून जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या व्यक्तीचे विचार आकार घेत होते, ही जाणीव मनाला अंतर्मुख करून जाते. भिंती जणू काही सांगत असतात- सत्ता इथे नव्हती; पण विचारांची ताकद होती. वैभव इथे नव्हते; पण मूल्यांची श्रीमंती होती.
Click here: Virtual Tour of Sevagram Ashram
बा आणि बापूंच्या आठवणींची ‘बा कुटी’
सेवाग्राममध्ये गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या आठवणींशी जोडलेली ‘बा कुटी’ ही मनाला स्पर्शून जाते. गांधीजींच्या सार्वजनिक आयुष्याच्या मागे कस्तुरबांचे मोठे योगदान होते. त्यांचे जीवनही त्याग, सेवा, संयम आणि संघर्षाने भरलेले होते.आश्रमातील या साध्या वास्तूंकडे पाहताना जाणवते की, गांधीजी आणि बा यांचे जीवन किती निरामय होते. आजच्या काळातील भौतिक सुखसोयींच्या कल्पनांपेक्षा कितीतरी वेगळे!
चरखा: स्वावलंबनाचा आणि स्वातंत्र्याचा संदेश
सेवाग्रामच्या आठवणींमध्ये चरख्याला विशेष स्थान आहे. गांधीजींसाठी चरखा हा केवळ सूत कातण्याचे साधन नव्हता. तो स्वावलंबन, श्रमाची प्रतिष्ठा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक होता. त्यांच्या मते भारताचा विकास केवळ मोठ्या शहरांमधील कारखान्यांतून होणार नव्हता. भारताची खरी शक्ती खेड्यांमध्ये होती. म्हणून ग्रामोद्योग, खादी, हस्तकला आणि स्थानिक उत्पादनांना त्यांनी महत्त्व दिले. त्यांच्या येथील चरख्याकडे पाहताना आजच्या काळातील ‘आत्मनिर्भरते’चा अर्थ नव्याने समजतो.
साधेपणातून शिस्त
गांधीजींचे जीवन अत्यंत शिस्तबद्ध होते. सेवाग्राम आश्रमातील वास्तव्यादरम्यान त्यांची दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होत असे. त्यानंतर काम, भेटीगाठी, लेखन, वाचन, चर्चा, चरखा, सेवा आणि पुन्हा प्रार्थना अशा साध्या पण अर्थपूर्ण जीवनपद्धतीत त्यांचा दिवस व्यतीत होत असे. त्यांच्या दिनक्रमात शरीरश्रमाला विशेष महत्त्व होते. चरखा कातणे, चालणे, स्वच्छता करणे, ग्रामजीवनाशी संपर्क ठेवणे, पत्रव्यवहार करणे आणि देशाच्या प्रश्नांवर चर्चा करणे, हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. आश्रमातील प्रार्थना हा दिवसाचा महत्त्वाचा भाग होता. गांधीजींच्या प्रार्थनेत विविध धर्मांतील विचार आणि स्तोत्रांना स्थान असे. त्यामुळे प्रार्थना ही केवळ धार्मिक कृती न राहता सर्वधर्मसमभाव आणि मानवतेचा संदेश बनली होती. त्यांच्या या दिनक्रमातूनही एक मोठा संदेश मिळतो. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी मोठ्या साधनांची गरज नसते; मोठ्या शिस्तीची गरज असते. विशेष म्हणजे आश्रमात आजही हीच दिनचर्या पाळली जाते. इथे एक दिवस वास्तव्य करुन तुम्ही हा अनुभव घेऊ शकता.
Gandhi-Nehru-Azad
सेवाग्राम: स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र | Indian Independence Movement in Sevagram
१९३६ नंतर सेवाग्राम हळूहळू राष्ट्रीय चळवळीचे महत्त्वाचे केंद्र बनले. देशाच्या विविध भागांतून राष्ट्रीय नेते, कार्यकर्ते आणि विचारवंत येथे येऊ लागले. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, खान अब्दुल गफ्फार खान यांसारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांची येथे ये-जा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक मान्यवरांचाही सेवाग्रामशी संबंध आला. एक साधे गाव देशाच्या राजकीय आणि सामाजिक विचारमंथनाचे केंद्र बनले होते, हीच सेवाग्रामची खरी विलक्षणता!‘
‘भारत छोडो’ च्या निर्णायक क्षणांची साक्षीदार भूमी
सेवाग्रामचा उल्लेख झाला की, स्वातंत्र्यलढ्याच्या निर्णायक टप्प्यांची आठवण येते. १४ जुलै १९४२ रोजी सेवाग्राम येथे काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत ब्रिटिश सत्तेने भारतातून माघार घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या ठरावावर चर्चा झाली. गांधीजींनी त्या ठरावाचा मसुदा तयार केला होता. पुढे हाच संघर्ष ‘भारत छोडो आंदोलन’ म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ठरला. १९४० मध्ये सेवाग्राम येथे काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली आणि वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रस्ताव पुढे आला. विनोबा भावे यांची पहिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली. १९४२ मध्ये गांधीजींनी जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आपल्या राजकीय वारसाच्या भूमिकेबाबतही काँग्रेस कार्यसमितीसमोर स्पष्ट मत व्यक्त केले होते. या घटनांचा विचार करताना जाणवते, या छोट्याशा आश्रमाच्या शांत परिसरात घेतले गेलेले निर्णय पुढे संपूर्ण देशाच्या इतिहासाला दिशा देणारे ठरले!
पर्चुरे शास्त्री: करुणेचा जिवंत धडा
सेवाग्रामचा इतिहास केवळ राजकीय निर्णयांचा नाही; तो माणुसकीचाही आहे. १९३९ मध्ये कुष्ठरोगाने ग्रस्त असलेले पर्चुरे शास्त्री सेवाग्राममध्ये आले. त्या काळी कुष्ठरोगाबद्दल समाजात प्रचंड भीती आणि तिरस्कार होता. अशा वेळी गांधीजींनी त्यांच्यापासून दूर जाण्याऐवजी त्यांची वैयक्तिक सेवा केली. हा प्रसंग गांधीजींच्या ‘अहिंसे’चा खरा अर्थ समजावून देतो. अहिंसा म्हणजे फक्त हिंसा न करणे नव्हे. दुसऱ्याच्या दुः खाकडे माणूस म्हणून पाहणे, त्याला स्पर्श करण्याचे धैर्य दाखवणे आणि त्याची सेवा करणे हीसुद्धा अहिंसाच आहे.
![]() |
| Parchure Kuti. |
सेवाग्रामच्या मातीतून उमटणारा संदेश
आश्रम परिसरात फिरत असताना, एकएक वास्तू न्याहाळताना येथील प्रत्येक वास्तूशी एक विचार जोडला असल्याची जाणीव प्रकर्षाने होते. गांधीजींसाठी सत्य हे अंतिम मूल्य होते. स्वतः च्या चुका स्वीकारण्याची तयारीही त्यांच्या सत्यनिष्ठेचा भाग होती. अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना द्वेष न करण्याचा मार्ग त्यांनी जगाला दाखवला. चरखा, खादी आणि ग्रामोद्योग यांमधून त्यांनी आर्थिक स्वातंत्र्याचा विचार मांडला. भारताची उभारणी खेड्यांच्या सक्षमीकरणातून व्हावी, असा त्यांचा आग्रह होता. कोणतेही काम लहान नाही. स्वतः च्या हाताने काम करण्याला त्यांनी प्रतिष्ठा दिली. प्रार्थनेत विविध धर्मांच्या विचारांना स्थान देऊन त्यांनी धार्मिक सहअस्तित्वाचा आदर्श मांडला.
एक वेगळेच ‘म्युझियम’: जिथे वस्तूंपेक्षा आठवणी बोलता | Museum at Sevagram Ashram, Wardha
आश्रमात फिरताना एखाद्या वस्तूकडे पाहिले की ती फक्त ‘वस्तू’ राहत नाही. चरखा दिसतो आणि स्वदेशीची आठवण होते. कुटी दिसते आणि बापूंचे साधेपण जाणवते. प्रार्थनास्थळ दिसते आणि सर्वधर्मसमभाव आठवतो. पायवाट दिसते आणि गांधीजींच्या चालण्याची कल्पना मनात उभी राहते. आश्रमातील शांतता अनुभवताना जाणवते की, इतिहास नेहमी मोठ्या इमारतींमध्येच जिवंत राहत नाही. कधी तो मातीच्या भिंतींमध्ये, साध्या चटईत, चरख्याच्या आवाजात आणि शांत पायवाटांमध्येही जिवंत असतो.
Sevagram Ashram
लुई फिशरच्या नजरेतून दिसलेला बापू
अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी जून १९४२ मध्ये सेवाग्राममध्ये सुमारे आठवडा घालवला. त्यांनी गांधीजींच्या जीवनशैलीचे आणि त्यांच्या संभाषणांचे निरीक्षण केले. नंतर त्यावर आधारित A Week With Gandhi हे पुस्तक प्रसिद्ध झाले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते- गांधीजींची जीवनपद्धती जगभरातील लोकांसाठी कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय होती. ते मोठ्या राजवाड्यात राहत नव्हते. ते सत्तेच्या केंद्रात बसले नव्हते. पण त्यांचा प्रभाव जगाच्या राजकारणावर आणि मानवतेच्या विचारविश्वावर होता.
१९४६: सेवाग्रामला निरोप
२५ ऑगस्ट १९४६ रोजी गांधीजी सेवाग्राम सोडून दिल्लीच्या दिशेने निघाले. त्यानंतर त्यांनी देशातील वाढत्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वतः ला झोकून दिले. सेवाग्राममधील त्यांचे वास्तव्य जवळजवळ दहा वर्षांचे होते. १९३६ ते १९४६. या काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने निर्णायक वळण घेतले आणि सेवाग्राम त्या इतिहासाचा साक्षीदार राहिला.
आश्रमातून बाहेर पडताना मनात एक प्रश्न उभा राहतो, आजच्या तंत्रज्ञानाच्या, वेगाच्या आणि स्पर्धेच्या युगात सेवाग्राम आपल्याला काय देतो? उत्तर अनेक स्तरांवर मिळते. आज आपण आत्मनिर्भरतेबद्दल बोलतो, गांधीजींनी त्याचा विचार चरख्याच्या माध्यमातून दशकांपूर्वी मांडला होता. आज पर्यावरणपूरक जीवनशैलीची चर्चा होते, गांधीजींचे साधे आणि मर्यादित गरजांचे जीवन त्याचा आदर्श होते. आज मानसिक ताण वाढत आहे. त्यांच्या शिस्तबद्ध जीवनात काम, प्रार्थना, श्रम आणि आत्मपरीक्षण यांचा समतोल दिसतो. आज समाजात मतभेद वाढत आहेत. गांधीजींचा अहिंसेचा मार्ग संवाद आणि संयम शिकवतो. आज गावाकडील अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांवर चर्चा होते. ग्रामोद्योग आणि ग्रामस्वराज्याचा त्यांचा विचार पुन्हा महत्त्वाचा वाटतो. म्हणून सेवाग्राम हा केवळ भूतकाळाचा वारसा नाही; तो वर्तमानासाठीचा आरसा आहे.
एक आश्रम, एक इतिहास, एक विचार आणि एक अखंड प्रेरणा!
आश्रमातून बाहेर पडताना पुन्हा एकदा मागे वळून पाहिले. बापू कुटी शांत उभी होती. चरखा तिथेच होता. पायवाटा तिथेच होत्या. झाडांच्या सावल्या तशाच होत्या. फक्त गांधीजी नव्हते. पण खरंच ते नव्हते का? कदाचित ते त्यांच्या कुटीत नव्हते; पण त्यांच्या विचारांमध्ये होते. सत्याच्या आग्रहात होते.अहिंसेच्या मार्गात होते. श्रमाच्या प्रतिष्ठेत होते. गावाच्या स्वावलंबनाच्या स्वप्नात होते.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, या साध्या पण महान संदेशात ते आजही जिवंत आहेत. सेवाग्राम सोडताना जाणवले, काही ठिकाणांना आपण भेट देत नाही; ती ठिकाणे उलट आपल्याला भेटतात. सेवाग्रामनेही मला अशीच एक भेट दिली. इतिहासाची नव्हे, तर आत्मपरीक्षणाची. गांधीजींच्या पाऊलखुणांवरून चालताना एक विचार मनात कायमचा कोरला गेला. जग बदलण्याची सुरुवात मोठ्या घोषणांनी नव्हे, तर स्वतः पासून होते. आणि म्हणूनच वर्ध्याच्या मातीतील हे छोटेसे सेवाग्राम आजही भारताच्या मनात मोठे आहे.
Writings of Mahatma Gandhi
झुणका-भाकरीचा आस्वाद नक्की घ्या
सेवाग्राम आश्रम बघायला गेलात की आश्रमासमोर असलेल्या केंद्रात झुणका-भाकरीचे जेवण नक्की घ्या. वांग्याचे भरीत, झणझणीत मिरचीचा ठेचा आणि त्यावर उतारा म्हणून थंड ताक. आहाहा.... क्या बात......! शिवाय आश्रमासमोर रस्त्याच्या पलिकडे ठेले उभे असतात. त्या ठेल्यावर कच्चा चिवडाही चविष्ट असतो.
कसे पोहोचाल
- नागपूर किंवा इतर ठिकाणांहून सेवाग्राम (वर्धा) येथे जाण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमान प्रवास उपलब्ध आहे.
- रेल्वेने: सेवाग्राम हे जवळचे रेल्वे स्थानक असून, तेथून सेवाग्राम आश्रम फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे.
- वर्धा हे मुख्य रेल्वे जंक्शन असून हावडा-नागपूर-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई मार्गावरील गाड्या येथे थांबतात. वर्धा किंवा सेवाग्राम स्थानकावरून रिक्षा किंवा टॅक्सीने आश्रमात पोहोचता येते.
- बस सेवा: महाराष्ट्र शासनाच्या Department of Tourism Maharashtra किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नियमित बसेस वर्धा व लगतच्या शहरांमधून उपलब्ध असतात.
- खासगी वाहनाने नागपूरहून राष्ट्रीय महामार्गाने वर्धा व सेवाग्राम अंतर साधारणपणे ७५-८० किमी आहे, जे कार किंवा टॅक्सीने दीड ते दोन तासांत गाठता येते.
- विमानाने: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. तेथून पुढे टॅक्सी किंवा रेल्वेने सेवाग्रामला जाता येते
केव्हा जायचे
सेवाग्राम आश्रम सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला असतो. प्रवेश शुल्क नाही. सोमवारी आश्रम बंद असतो.


.jpg)


आजही देशाला गांधी विचारांची गरज आहे.
ReplyDeleteSevagram hi chhan jaga ahe. Jaylach hava
ReplyDelete