अंबामातेच्या नगरीची रोमांचक सफर | Ambadevi Mata Amravati | Author: Parijaat | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism
जिथे इतिहास भेटतो श्रद्धेला...
“जय अंबे...जय जगदंबे...” असा जयघोष कानावर पडताच पावले आपोआप अंबादेवी मंदिराच्या दिशेने वळतात. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच फुलांचा सुगंध, घंटानाद, भक्तांची लगबग आणि देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा दिसतात. समोर दिसते ती शांत, प्रसन्न आणि स्वयंभू अंबामातेची मूर्ती. त्या क्षणी जाणवते; आपण केवळ एका मंदिरात आलो नाही, तर शेकडो वर्षांचा इतिहास आणि श्रद्धा जपणाऱ्या नगरीत प्रवेश केला आहे.
Ambadevi Devasthan Amravati
अमरावती... नावातच दडलेला इतिहास
आजची अमरावती पूर्वी ‘उदुंबरावती’, ‘उंबरावती’ आणि ‘उमरावती’ या नावांनी ओळखली जात होती. पुढे ‘अमरावती’ हे नाव रूढ झाले. या शहराचा इतिहास खूप जुना आहे. अकराव्या शतकातील पुरावे, तेराव्या शतकातील महानुभाव पंथाच्या संदर्भातील उल्लेख आणि पुढील काळातील अनेक ऐतिहासिक नोंदी या शहराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. इतिहासाच्या या पाऊलखुणा मनात ठेवून आपण पुढे जातो आणि पोहोचतो अमरावतीच्या सर्वात प्रसिद्ध श्रद्धास्थानी श्री अंबादेवी मंदिरात.
रुक्मिणी-हरणाची रोमांचक कथा
अंबादेवी मंदिरात उभे राहिल्यावर सर्वात आधी आठवते ती रुक्मिणी-हरणाची आख्यायिका. डोळे मिटले की जणू हजारो वर्षांपूर्वीचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणी श्रीकृष्णाला पती म्हणून स्वीकारू इच्छित होती. मात्र तिचा भाऊ रुक्मीने तिचा विवाह शिशुपालाशी ठरवला. रुक्मिणीने श्रीकृष्णाला गुप्त संदेश पाठवला. विवाहाच्या आदल्या दिवशी ती देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येणार होती. त्याच वेळी श्रीकृष्णाने तिला घेऊन जावे, अशी तिची इच्छा होती. आणि मग तो थरारक प्रसंग घडतो...रुक्मिणी देवीचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येते. बाहेर राजे-महाराजे आणि पाहुण्यांची गर्दी असते. त्याच वेळी श्रीकृष्ण रथासह तेथे येतो. क्षणाचाही विलंब न करता रुक्मिणी रथात बसते आणि श्रीकृष्ण तिला घेऊन वेगाने निघून जातो! पाठलाग सुरू होतो... युद्ध होते... आणि पुढे श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे निघून जातो. आज ही कथा आठवताना अंबादेवी मंदिराचा परिसर आणखीच रोमांचक वाटतो. खरंच, या मंदिराच्या भिंतींनी त्या काळातील किती कथा पाहिल्या असतील? हा विचार मनात येतो.
जुन्या मंदिरापासून भव्य मंदिरापर्यंत | Ambadevi Temple Amravati Development
आजचे अंबादेवी मंदिर भव्य दिसते. मात्र पूर्वी मंदिराचे स्वरूप खूपच साधे आणि लहान होते. काळानुसार मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आणि मंदिराचे रूप बदलत गेले. इ.स. १८९६ मध्ये मंदिराच्या शिखरांचे बांधकाम करण्यात आले. पुढे सभामंडप, विविध देवतांची मंदिरे आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या. मंदिरात प्रवेश करताच समोर अंबामातेची स्वयंभू मूर्ती दिसते. काळ्या वाळुकाश्मातील ही मूर्ती शांत आणि ध्यानस्थ स्वरूपाची आहे. देवीचा शृंगार झाला की तिचे रूप आणखी खुलून दिसते. मुकुट, नथ, ठुशी, हार, कमरपट्टा आणि सुंदर वस्त्रांनी सजलेली देवी पाहताना भक्त काही क्षण तिच्याकडे पाहतच राहतात.
अंबानाल्याच्या पुलावरून एकवीरा देवीकडे
अंबादेवीचे दर्शन झाल्यावर पुढचा प्रवास श्री एकवीरा देवीच्या मंदिराकडे सुरू होतो.अंबानाल्यावरील पूल ओलांडताना वातावरणात पुन्हा एक वेगळीच शांतता जाणवते. श्री एकवीरा देवीचे मंदिरही अमरावतीच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिराची कथा संत जनार्दन स्वामींशी जोडलेली आहे. देवीचे दर्शन घेणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. एकदा नदीला पूर आल्याने त्यांना देवीचे दर्शन घेता आले नाही. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर एकवीरा देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्याचे मानले जाते. अंबादेवी आणि एकवीरा देवी या दोन्ही मंदिरांना भेट दिल्यावर जाणवते की अमरावतीची धार्मिक परंपरा किती समृद्ध आहे.
नवरात्रात अमरावतीचे रूपच बदलते! | Navaratri Celebration at Ambadevi Temple Amravati
अमरावतीचा खरा उत्साह अनुभवायचा असेल, तर नवरात्रात या नगरीला भेट द्यायलाच हवी. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अंबादेवी मंदिर परिसर भक्तांनी फुलून जातो. नऊ दिवसांची भव्य यात्रा भरते. शहराच्या वेगवेगळ्या भागांतूनच नव्हे, तर दूरवरच्या गावांमधूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची रांग सुरू होते. मंदिरात घटस्थापना होते. मंत्रोच्चार सुरू होतात. देवीला सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी सजवले जाते. दिवसभर पूजा, अभिषेक, सप्तशतीचे पाठ, कीर्तन आणि प्रवचनांचे कार्यक्रम सुरू असतात. आणि रात्र झाली की मंदिराचा परिसर आणखीच जिवंत होतो. टाळांचा आवाज...संबळाचा नाद...घंटांचा गजर...आणि त्यावर घुमणारा “जय अंबे... जय जगदंबे...” हा जयघोष! भक्तीचे हे वातावरण अनुभवताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात.
Ambadevi Temple Video
नऊ दिवसांची भक्ती आणि नवमीचा हवनसोहळा
नवरात्रातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. भक्त देवीची उपासना करतात. अनेक जण सप्तशतीचे पाठ करतात. नवमीला विशेष हवन आणि पूर्णाहुतीचा सोहळा होतो. मंत्रोच्चार सुरू असताना अग्निकुंडात आहुती दिल्या जातात. संपूर्ण परिसरात धूपाचा सुगंध पसरतो. भक्त शांतपणे या धार्मिक विधीचा अनुभव घेतात. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवीचा महिषासुरावर विजय मिळवण्याची कथा पुन्हा पुन्हा सांगितली जाते. त्यामुळे नवरात्र म्हणजे केवळ उत्सव नाही, तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याची परंपरा आहे. आणि मग येतो दसरा... नऊ दिवसांच्या उत्सवानंतर सर्वांना प्रतीक्षा असते ती विजयादशमीची. दसऱ्याच्या दिवशी अंबादेवीची पालखी मोठ्या उत्साहात निघते. भक्तांचा जयघोष सुरू असतो. पालखी दसरा मैदानाकडे जाते. तेथे सीमोल्लंघन आणि शमीपूजन केले जाते. त्यानंतर देवीची विजययात्रा पुन्हा मंदिराच्या दिशेने निघते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले भाविक देवीचे दर्शन घेतात. त्या वेळी संपूर्ण परिसर भक्ती आणि उत्साहाने भरून जातो. देवीचा महाप्रसाद दुपारी देवीला महानैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी आणि खीर यांचा नैवेद्यात समावेश असतो. त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. देवीचा प्रसाद हातात घेताना मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेशी आपलेही एक नाते जोडले गेले आहे.
परतीच्या वाटेवर...
मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा एकदा मागे वळून पाहते. अंबामातेच्या मंदिराचे शिखर दिसत असते. मंदिरातून घंटानाद ऐकू येत असतो. नवरात्रातील गर्दी, देवीचा जयघोष आणि रुक्मिणी-हरणाची कथा मनात पुन्हा जागी होते. तेव्हा जाणवते, अमरावती म्हणजे फक्त एक शहर नाही. ही इतिहासाची नगरी आहे. आख्यायिकांची नगरी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.आणि अंबामातेच्या भक्तीने उजळलेली नगरी आहे. अंबादेवीच्या मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास मंदिराच्या पायऱ्यांवर संपत नाही. तो मनात पुढेही सुरूच राहतो. अमरावतीला एकदा भेट दिली की इतिहास ऐकू येतो, श्रद्धा जाणवते आणि नवरात्रातील नऊ दिवसांचा उत्सव डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा उभा राहतो. म्हणूनच अमरावतीचा हा प्रवास केवळ प्रवास नसून इतिहास, श्रद्धा आणि रोमांच यांचा अविस्मरणीय अनुभव आहे.




Amazing story, will visit this place
ReplyDeleteजय अंबे
ReplyDelete