सालबर्डीची बौद्ध गुफा: बौद्ध सर्कीट | Lord Buddhist Cave Salbardi | Vidarbha Buddhist Circuit
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याच्या उत्तर-पूर्वेकडे असलेल्या सातपुडा पर्वतांच्या शेवटच्या रांगेत मांडु आणि गंगा नदीच्या काठावर आठ सुंदर गुफा आहेत. त्यातील सहा बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. त्यातील दोन पूर्ण तयार, एक अर्धवट आणि तीन नवीन बांधकामासह मंदिरात रुपांतरित करण्यात आल्या आहेत. दोन पूर्व निर्मित गुफांपैकी एक आता पंचावतार गुफा या नावाने ओळखली जाते. ती आता महानुभाव पंथाच्या अनुयायांच्या नियंत्रणात आहे. या गुफेत वऱ्हांडा, मंडपद्वार, त्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडे कक्ष, गर्भगृहद्वार, स्तंभ आणि वर छत आहे. गर्भगृहासमोर आज श्रीकृष्ण प्रतिमा आहे. त्याच्या मागील पडदा बाजूला केल्यास आयाताकृती लहान गर्भगृहात प्रवेश करता येतो. त्यात भिंतीत बुद्ध, पद्मपाणी आणि वज्रपाणी यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात.
इतिहास संशोधकांच्या माहितीनुसार या गुफांची निर्मिती प्रथम हीनयान पंथीयांद्वारे करण्यात आली. नंतर गर्भगृह आणि प्रतिमा निर्मिती कार्य महायान पंथीयांनी केले असावे. या गुफेच्या पश्चिमेला अर्ध्या किलोमीटरवर लंकेश्वर नामक भव्य गुफा आहे. गुफेच्या समोर भव्य अंगण आहे. त्यानंतर वऱ्हांडा आणि दोन लहान कक्ष. वऱ्हांड्याच्या मधोमध विहारात प्रवेशासाठी दरवाजा आहे. आत १६०० वर्ग चौरस फुटाचे भव्य विहार आहे. विहाराच्या तिन्ही दिशांना उपकक्ष आहेत. या गुफेची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी. या गुफेचे अजिंठ्याच्या ११ व्या गुफेशी साधर्म्य सांगितले जाते. प्राचीन काळात बौद्ध भिक्षुंचे निवास आणि साधना स्थळासाठी या गुफांचा वापर होत असे. या गुफा इ.स. पूर्व पहिल्या शतकातील असाव्यात असा अंदाज आहे.
Cave Salbardi | Vidarbha Buddhist Circuit
सालबर्डीच्या गुफांमध्ये आत शिवमंदिरही आहे. येथे महाशिवरात्रीला मोठा मेळावा भरतो. सातपुडा पर्वत रांगेतील हा परिसर अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य आहे.
कसे पोहोचाल | How to reach Buddhist Caves Salbardi
या गुफा नागपूरपासून ११५ ते १२० किमी अंतरावर आहे. मोर्शी बसस्थानकापासून हे अंतर १३ किमी आहे. मुळात हे स्थान मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यात येते. परंतु मोर्शीपासून जवळ आहे. एसटी बस किंवा खासगी वाहनाने जाता येते. अमरावती हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

this is great
ReplyDelete