श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India
काही प्रवास फक्त नकाशावरची ठिकाणे बदलत नाहीत, तर मनातली अनेक दारे उघडतात. श्रद्धेच्या वाटेवरून चालताना द्वारकाधीशांच्या चरणी मिळालेली शांतता, सोमनाथच्या सागरगर्जनेत अनुभवलेली शिवभक्ती, दीवच्या निसर्गसौंदर्याने दिलेला आनंद, गिरच्या जंगलात झालेले सिंहदर्शन आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर उभे राहून जाणवलेली राष्ट्रएकतेची भव्यता! या सगळ्यांनी हा प्रवास अविस्मरणीय करून टाकला. त्यात गरुडेश्वरच्या नर्मदातीरी लाभलेली आध्यात्मिक अनुभूती आणि मित्रमंडळींच्या सहवासातील हास्य-विनोदाने या सहलीला आणखी एक सुंदर किनार लाभली. द्वारका–सोमनाथ–दीव–गिर अभयारण्य–स्टॅच्यू ऑफ युनिटी–गरुडेश्वर असा हा प्रवास म्हणजे श्रद्धा, निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि मैत्री यांचा सुंदर संगमच… पाच दिवसांच्या या सहलीने शरीराला ऊर्जा तर मिळालीच, शिवाय मनही आठवणींच्या समृद्ध ठेव्याने भरून टाकले.
मागील २० वर्षापासून मुक्तांगण इंग्लिश स्कूल,पुणे येथे कार्यरत शिक्षिका, संस्कृत, मराठी या विषयावर प्रभुत्व असलेल्या, उत्कृष्ट सूत्रसंचालक तसेच संस्कृत-भारती या संस्थेसह अनेक सामाजिक उपक्रमांशी संलग्न असलेल्या सौ. माणिक प्रशांत जोशी यांचा हा प्रवास अनुभव वाचा तीन भागांमध्ये.
भाग १ - जिथे समुद्र भेटतो श्रद्धेला..
द्वारका म्हणजे भगवान श्रीकृष्णाची नगरी. गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे चार धामांपैकी एक पवित्र तीर्थ आहे.
आम्ही नागपूरहून २० जुलै २०२६, सोमवारी, ओखा एक्स्प्रेसने निघालो. हा जवळपास २४ तासांचा प्रवास होता. आमच्यासोबत मित्रमंडळी असल्यामुळे प्रवास मजेत झाला. रेल्वेतून दिसणारा निसर्गही आनंद देणारा होता. जामनगर जस जसे जवळ येत होते ,तस तसे, 'वन्तारा' दिसेल, वन्तारा दिसेल, असे रेल्वेतील लोक म्हणायला लागले. आपोआपच नजर बाहेरच्या परिसरावर खिळून राहिली. अंबानींनी उभारलेले हे विश्व म्हणजे जवळ-जवळ ४० किलोमीटरचा भव्यदिव्य परिसर आहे. या 'वन्ताराने' अनेक लोकांना रोजगार दिला. तेव्हा संधिकाल असला तरी घड्याळात मात्र ७.१५ ते ७.३० ची वेळ होती.
२१ जुलै, मंगळवारी रात्री ८.३० ला द्वारकेला पोहचलो. मस्त ६ सिटर ऑटोरिक्षाने निघालो. रिक्षावाला चांगला होता त्यानेच हॉटेल शोधून दिले. मस्त नवीन बांधकाम असलेले हॉटेल होते, स्वच्छता होती. पण हॉटेलमध्ये जेवणाची सोय नव्हती. त्यामुळे स्नान करुन (आमचा २४ तासाचा प्रवास होता) जेवायला निघालो, ५०० मीटरवर जेवण मिळाले, छान चवदार होते, आल्यावर दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम ठरवून झोपलो.
Dwarkadheesh Temple
द्वारकाधीश मंदिराकडे | Towards Dwarkadheesh Temple
२२ जुलै, बुधवार द्वारकाधीश मंदिर- समुद्रकिनाऱ्यावर असलेले ५ मजली भव्य मंदिर. काळ्या दगडात बांधलेले आणि ७२ खांबांवर उभे असलेले हे मंदिर. सकाळ-संध्याकाळची आरती खूप प्रसिद्ध. तुमच्या-आमच्या मनांत असलेला श्रीकृष्ण मात्र इथे पाहावयास मिळत नाही. इथे दिसतो तो, काळ्या खडकात वसलेला द्वारकाधीश. पण त्याचे हे धीर गंभीरुपही मनाला भावून जाते. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे, कोरीव काम, त्यावरील नक्षी , मंदिराचा कळस, उत्तम शिल्पकलेचा नमुना असलेल्या या मंदिरात "राधेश्याम राधेश्याम -राधेराधेचा" गुंजारव मधूर नाद निर्माण करत होता.
मंदिराच्या आसपास विंडो शॉपींग करायला खूप वाव आहे. पण आजकाल सगळीकडे सगळेच मिळते, या विचाराने पुढे निघालो. एका ठिकाणी नाश्ता केला, हॉटेलवर येऊन कपडे बदलले आणि पुढे निघालो. ते नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला. द्वारकेपासून १५ किमी.वर असलेले हे स्थान १२ ज्योतिर्लिंगापैकी एक. इथलाही परिसर मोठा आहे, सभामंडपात शांत बसायचा अनुभव खूप छान होता. मंदिराच्या आवारातील भगवान शिवाची २५ मीटर उंच भव्य मूर्ती इथले मुख्य आकर्षण आहे.
![]() |
| सुदर्शनसेतु |
बेट द्वारका - श्रीकृष्णाचे मूळ घर
नंतर आलो ते बेट द्वारकेला. पूर्वी येथे बोटीने जावे लागायचे पण आता सुदर्शनसेतु नावाचा मोठा ब्रीज तयार केला आहे. सुदर्शन सेतू - नवीन पूल, समुद्राचे दृश्य अप्रतिमच. हा फोटो पाॅईंट होता, ठिकठिकाणी थांबून लोकं फोटो काढत होते. मान्यता आहे की, इथे श्रीकृष्णाचे मूळ घर होते. इथे मात्र आम्हाला गर्दी लागली मोठीच्या मोठी रांग होती. राधे-राधेचा गजर होत होता. शंखाचा आवाज आणि "जय द्वारकाधीश" चा गजर... मन एकदम शांत होऊन जाते. द्वारका समुद्रकिनाऱ्यावर असूनही वातावरण मात्र आल्हाददायक होते. ना थंडी, ना गरमी !
वाहनचालकाने अगदी सहजच सांगितले पाकिस्तान-कराची इथून फक्त ३०-४० किलोमीटरवर आहे. आम्ही सगळेच आश्चर्य चकित झालो, सगळ्यांच्याच मनात सुप्त इच्छा होती बघून येऊ या ! पण धाडस मात्र झाले नाही...
गोमती घाट
मंदिरासमोरून वाहणारी गोमती नदी समुद्राला मिळते. इथे स्नानाला खूप महत्व आहे, इथे कबुतरांना लोकं खूप धान्य देतात, त्यामुळे कबुतरांचे थवेच्या थवे होते. त्यामध्येच फोटोही काढून घेतले.
भडकेश्वर महादेव
नावाप्रमाणेच इथला समुद्र भडकेलेला होता. मोठ्याच्या मोठ्या लाटांचा आनंद इथे मिळाला. किनाऱ्यावर जुने महादेवाचे मंदिर आहे. पिंड खूप खाली आहे, दुरुनच बघता येते. भडकेश्वर महादेव मंदिरसमुद्राच्या आत एका छोट्या टेकडीवर वसलेले हे एक अनोखे शिवमंदिर आहे. ओहोटीच्या वेळी चालत जाता येते, पण भरतीच्या वेळी हे मंदिर समुद्राच्या पाण्याने वेढले जाते.
Bhadkeshwar Mahadev Temple
शिवराजपूर बीच (Shivrajpur Beach)
द्वारकेपासून जवळच असलेला हा पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आहे असे म्हणतात. येथील नितळ निळे पाणी आणि स्कूबा डायव्हिंग (Scuba Diving) सारखे वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात. पण ह्या बीचकडे जाणारा रस्ता मात्र बंद होता. त्यामुळे बघता आला नाही. गुजराती थाळी नक्की ट्राय करा.. महत्वाची टीप. मंदिरात मोबाईल, कॅमेरा आत नेण्यास बंदी आहे.. खूप क्षण टिपायचे राहून जातात.
शेवटी - द्वारका फक्त एक शहर नाही, ती एक भावना आहे. एकदा का तुम्ही द्वारकाधीशांसमोर डोके टेकवले की वाटते कृष्ण खरंच इथे होते. तुम्ही कधी द्वारका दर्शनाला जाणार आहात का? नक्की जा.
(या प्रवासवर्णनातील तांत्रिक माहिती ही गूगलवरुन घेतली आहे. फोटोंचे सगळे श्रेय प्रशांत जोशी यांना)
भाग 2 लवकरच... तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️
सौ. माणिक प्रशांत जोशी
लेखक
पुणे




Great article
ReplyDeletegreat experience at dwarkadhish temple
ReplyDeleteजय द्वारकाधीश
ReplyDeleteJai dwarkadhish
ReplyDeleteJai shri krishna
ReplyDeleteखूप छान अनुभव
ReplyDeleteSuch amazing story
ReplyDelete