चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism
ताडोबाच्या वनराईपासून आनंदवनाच्या मानवतेपर्यंत...
“जिथे वाघाच्या डरकाळीने जंगल जागते, किल्ल्यांच्या तटबंदीवर इतिहास अभिमानाने उभा असतो, मंदिरांच्या घंटानादात श्रद्धा निनादते, आदिवासी संस्कृती निसर्गाशी संवाद साधते आणि आनंदवनात मानवतेचा अर्थ नव्याने उमलतो—तो प्रदेश म्हणजे चंद्रपूर!”
महाराष्ट्राच्या नकाशावर दक्षिण-पूर्वेकडे वसलेला चंद्रपूर जिल्हा प्रथमदर्शनी कदाचित उद्योग, कोळसा आणि वीज निर्मितीसाठी परिचित वाटतो; परंतु या ओळखीच्या पलीकडे गेल्यावर चंद्रपूरचे एक विलक्षण आणि बहुरंगी रूप आपल्या समोर उलगडते. वाघांचे जंगल, प्राचीन किल्ले, महाकालीची श्रद्धा, गोंड संस्कृती, महापाषाणकालीन अवशेष, बौद्ध लेणी, झाडीपट्टीची रंगभूमी, वैदर्भीय खाद्यसंस्कृती आणि आनंदवनाची मानवतावादी परंपरा—या सगळ्यांचा एकत्रित अनुभव देणारा हा जिल्हा आहे.
चंद्रपूर म्हणजे केवळ एका पर्यटनस्थळाला दिलेली भेट नाही; चंद्रपूर म्हणजे अनुभवांची एक संपूर्ण यात्रा आहे. ही यात्रा निसर्गापासून इतिहासाकडे, इतिहासापासून लोकसंस्कृतीकडे, संस्कृतीपासून मानवतेकडे आणि मानवतेपासून शाश्वत विकासाच्या विचाराकडे घेऊन जाते. भौगोलिकदृष्ट्या चंद्रपूर महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात असून पूर्वेला छत्तीसगड, दक्षिणेला तेलंगणा आणि पश्चिमेला यवतमाळ, तर उत्तरेकडे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांचा परिसर आहे. सुमारे ११,४४३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या जिल्ह्याला वर्धा, वैनगंगा, पैनगंगा,अंधारी, इरई आणि मूल यांसारख्या नद्या लाभल्या आहेत. विस्तीर्ण अरण्ये, टेकड्या, जलस्रोत आणि समृद्ध जैवविविधता यामुळे चंद्रपूरच्या पर्यटनाला नैसर्गिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.
परंतु चंद्रपूरचे खरे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि मानवी संस्कृती यांचा येथे झालेला सुंदर संवाद. म्हणूनच चंद्रपूरला समजून घेण्यासाठी केवळ जंगल सफारी पुरेशी नाही आणि केवळ किल्ल्यांची सफरही पुरेशी नाही. या भूमीचा अनुभव घेण्यासाठी तिच्या इतिहासात उतरावे लागते, लोकजीवनाशी संवाद साधावा लागतो आणि तिच्या मातीची चवही अनुभवावी लागते.
Chandrapur Fort
इतिहासाच्या पाऊलखुणा: किल्ले, मंदिरे आणि पुरातत्त्वीय वारसा | Temples, Forts, & History of Chandrapur
प्राचीन 'चांदा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीने अनेक राजवटींचे उत्थान-पतन अनुभवले आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, परमार, यादव आणि गोंड राजवटींच्या विविध ऐतिहासिक स्तरांचे प्रतिबिंब या प्रदेशात आढळते. विशेषतः गोंड राजवटीने चंद्रपूरच्या राजकीय, सांस्कृतिक आणि स्थापत्य इतिहासावर अमिट ठसा उमटवला. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना आजही भक्कम तटबंदी इतिहासाची साक्ष देताना दिसते. सुमारे ९ किलोमीटर लांबीची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे आणि खिडक्या तत्कालीन संरक्षणव्यवस्थेची कल्पकता सांगतात. जटपुरा, अंचलेश्वर, पठाणपुरा आणि बिनबा ही प्रवेशद्वारे, तसेच बगड, हनुमान, विठोबा आणि चोर या खिडक्या पाहताना पर्यटकाला केवळ दगड-मातीची रचना दिसत नाही; तर त्या मागे उभे असलेले एक ऐतिहासिक नगर जाणवते. चंद्रपूरसोबतच बल्लारपूर, माणिकगड आणि भद्रावती येथील किल्ले या ऐतिहासिक पर्यटनाला अधिक व्यापक बनवतात. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली गोंडकालीन सत्ता आणि तिचे संरक्षणतंत्र या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवता येते. मंदिर स्थापत्याच्या दृष्टीनेही हा प्रदेश विलक्षण समृद्ध आहे. नेरी, महादवाडी, राजुरा, भद्रावती, जुनासुर्ला, राजगड, माणिकगड आणि भटाळा परिसरातील प्राचीन मंदिरे धार्मिक श्रद्धेबरोबरच कलात्मकता आणि स्थापत्यकौशल्याची साक्ष देतात.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील, आज गडचिरोली जिल्ह्यात असलेले मार्कंडा मंदिरसमूह वैनगंगेच्या काठावर वसलेले असून त्याच्या अप्रतिम शिल्पकलेमुळे 'विदर्भाचे खजुराहो' म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रपूरच्या पर्यटन परिपथात या परिसराचा समावेश केल्यास इतिहास, धर्म आणि स्थापत्यकला यांचा अद्वितीय अनुभव पर्यटकांना मिळू शकतो.
लेण्यांपासून महापाषाणकालीन स्मृतींपर्यंत
चंद्रपूरचा पुरातत्त्वीय वारसा हा या जिल्ह्याच्या पर्यटनाचे एक मोठे सामर्थ्य आहे. भद्रावती-विजासन परिसरातील भव्य बौद्ध लेणीसमूह, भटाळा येथील लघुलेणी, तसेच कुनघाडा, देऊरवाडा, घुग्घुस, गवराळा, माना आणि नागमंदिर परिसरातील लेणी व शैलरचना या इतिहास आणि पुरातत्त्वाच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाच्या ठरतात. चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील महापाषाणकालीन डोलमॅन आणि नागभीड परिसरातील एकाश्म स्तंभ या स्थळांमधून या प्रदेशातील प्राचीन मानवी जीवनाची झलक मिळते. मृतांच्या स्मृती जपण्याच्या हजारो वर्षे जुन्या परंपरेपासून गोंडकालीन वीरगळांपर्यंत मानवी स्मृतींचा प्रदीर्घ प्रवास या भूमीत पाहता येतो. ही स्थळे पर्यटनासाठी विकसित झाली तर चंद्रपूरचा पर्यटन अनुभव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार नाही; तो विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक प्रयोगशाळा बनेल.
ताडोबाच्या जंगलात: वाघाच्या डरकाळीचा थरार
चंद्रपूर म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल. वाघाच्या पावलांचे ठसे शोधत जंगलाच्या वाटेने पुढे जाणे, अचानक झुडपांमधून एखाद्या रानगव्याचे दर्शन होणे, झाडांच्या फांद्यांवरून पक्ष्यांचे आवाज ऐकू येणे आणि एखाद्या क्षणी शांत जंगलाला वाघाच्या डरकाळीने हादरवून टाकणे—हा अनुभव केवळ सफारीचा नाही; तो निसर्गाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा अनुभव आहे.
![]() |
| ताडोबातील वाघ |
वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर, मगर आणि असंख्य पक्षी या परिसंस्थेचा भाग आहेत. जंगल सफारी, पक्षीनिरीक्षण, वन्यजीव छायाचित्रण आणि निसर्ग निरीक्षणामुळे ताडोबा देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मोहुर्ली, नवेगाव, कोलारा, झरी, आगरझरी, देवाडा आदी प्रवेशद्वारांभोवती पर्यटन सुविधा विकसित झाल्याने जंगलाचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांसाठी निवास, मार्गदर्शक, होमस्टे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्याच्या संधी वाढल्या आहेत. परंतु ताडोबाचे खरे आकर्षण केवळ “वाघ दिसला का?” यामध्ये नाही. जंगलाचे मौन, झाडांची सळसळ, पक्ष्यांचे आवाज, मातीचा सुगंध आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अस्तित्व अनुभवणे हेच ताडोबाचे खरे सौंदर्य आहे.
ऊर्जानगरीचे दुसरे रूप: औद्योगिक पर्यटन | Chandrapur for Industrial Tourism
चंद्रपूरचा उल्लेख झाला की कोळसा, वीज आणि उद्योग यांचा संदर्भ अपरिहार्य आहे. परंतु ही औद्योगिक ओळखदेखील पर्यटनासाठी एक वेगळे दालन उघडते. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, वरोरा परिसरातील औष्णिक वीज प्रकल्प, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी, बल्लारपूरचा कागद उद्योग आणि जिल्ह्यातील सिमेंट उद्योग यामुळे चंद्रपूरला 'ऊर्जानगरी'ची ओळख मिळाली आहे. विद्यार्थी, अभियंते, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी औद्योगिक पर्यटन ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना ठरू शकते. कोळशाचा भूगर्भातील प्रवास, खाणकामाची प्रक्रिया, वीज निर्मिती, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरू शकतो. म्हणजेच चंद्रपूरमध्ये एका बाजूला हजारो वर्षांचा पुरातत्त्वीय वारसा आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मितीची वारसा आहे—भूतकाळ आणि आधुनिकतेचा हा संगमच चंद्रपूरला वेगळे बनवतो.
आनंदवन: पर्यटन नव्हे, मानवतेची तीर्थयात्रा
चंद्रपूरच्या पर्यटनाची खरी ओळख केवळ जंगल आणि किल्ल्यांमध्ये पूर्ण होत नाही. ती पूर्ण होते आनंदवनात. पद्मविभूषण बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवा, पुनर्वसन आणि स्वावलंबनासाठी उभारलेले आनंदवन हे भारताच्या सामाजिक इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व आहे. येथे सेवा म्हणजे दया नाही, तर स्वाभिमानाची पुनर्स्थापना आहे. शेती, उद्योग, हस्तकला, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि स्वावलंबन यांच्या माध्यमातून वंचितांना सक्षम करण्याचा प्रयत्न येथे पाहायला मिळतो. आनंदवनात जाणारा पर्यटक फक्त एक पर्यटनस्थळ पाहून परतत नाही; तो स्वतःला एक प्रश्न विचारत परततो—“समाजासाठी मी काय करू शकतो?” याच परिसरातील आनंदवनाचाच भाग असलेला सोमनाथ प्रकल्प श्रम, जलसंधारण, शेती, वृक्षसंवर्धन आणि ग्रामविकासाचा प्रेरणादायी अनुभव ठरेल. उजाड भूमीला श्रमाच्या बळावर उत्पादक बनविणारी ही भूमी शाश्वत विकासाचा जिवंत धडा आहे. आनंदवन आणि सोमनाथ यांचा समावेश पर्यटन परिपथात करून “मानवता आणि पर्यावरण पर्यटन” ही स्वतंत्र संकल्पना विकसित करता येऊ शकते.
ग्रामीण चंद्रपूर: मातीशी जोडणारा अनुभव
शहरातील धावपळीपासून दूर जाऊन खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर चंद्रपूरच्या ग्रामीण भागात मोठ्या संधी आहेत. शेतात जाणे, पारंपरिक शेतीची माहिती घेणे, बैलपोळ्याची परंपरा समजून घेणे, स्थानिक शेतमालाचा आस्वाद घेणे, ग्रामीण घरातील भोजनाचा अनुभव घेणे, स्थानिक हस्तकला पाहणे आणि गावातील लोकांशी संवाद साधणे—या माध्यमातून पर्यटकाला “अस्सल विदर्भ” अनुभवता येऊ शकतो.
चंद्रपूरमधील कृषी पर्यटनाने केवळ शहरातील रिसॉर्ट संस्कृतीचे अनुकरण न करता स्थानिक शेती, भातशेती, बांबू, वनोपज, आदिवासी जीवनपद्धती, लोककला आणि ग्रामीण खाद्यपरंपरा यांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. असे झाल्यास कृषी पर्यटन हे केवळ पर्यटनाचे साधन न राहता शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा पर्यायी स्रोत आणि ग्रामीण संस्कृतीच्या संवर्धनाचे माध्यम ठरू शकते.
लोकसंस्कृती : चंद्रपूरच्या मातीचा कलात्मक आवाज
चंद्रपूरचा सांस्कृतिक वारसा त्याच्या जंगलांइतकाच समृद्ध आहे. गोंड, माडिया, कोलाम, परधान आणि इतर समाजांच्या परंपरा, लोकगीते, नृत्ये, वाद्ये, वेशभूषा, धार्मिक विधी आणि उत्सव या प्रदेशाच्या सांस्कृतिक ओळखीला आकार देतात. ढोल, तुडूम, नगारा, डाक, संबळ, तुणतुणे आणि हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा नाद ऐकताना पर्यटकाला आदिवासी आणि ग्रामीण जीवनाच्या सामुदायिक स्वरूपाचा अनुभव येतो.
महाकालीची यात्रा, ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा, भजन-कीर्तन, गोंधळ, दंडार, खडीगंमत आणि डाहाका यांसारख्या लोककलांमध्ये या प्रदेशाचा लोकजीवनाशी असलेला संबंध अनुभवता येतो. याच सांस्कृतिक परंपरेतून पुढे आलेली झाडीपट्टी रंगभूमी ही चंद्रपूर आणि संपूर्ण पूर्व विदर्भाच्या सांस्कृतिक पर्यटनाची मोठी क्षमता आहे. वैनगंगेच्या खोऱ्यात जवळपास दीड शतक विकसित झालेल्या या नाट्यपरंपरेला पर्यटनाशी जोडता येऊ शकते. सुगीचा हंगाम आणि झाडीपट्टीतील नाटकांचा मेळ हा ग्रामीण जीवनाचा आगळा अनुभव आहे. बाहेरच्या पर्यटकांसाठी हा अनुभव “लोकजीवनातून जन्मलेली रंगभूमी” म्हणून सादर केला तर चंद्रपूरच्या सांस्कृतिक पर्यटनाला नवा आयाम मिळू शकतो.
चंद्रपूरची खाद्यसंस्कृती: चवीतून ओळखणारा प्रदेश
Gola Bhaat
एखाद्या प्रदेशाला समजून घेण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्याची चव अनुभवणे. चंद्रपूरची खाद्यसंस्कृती ही विदर्भाच्या मातीशी जोडलेली आहे. ज्वारीची भाकरी, पिठलं, झुणका, वांग्याचे भरीत, पानगे, पालेभाज्या, डाळी, भात, आमटी आणि लोणची यांसोबत गोळाभात, वडाभात, कढीगोळे, घुगरी, आथरवडे, पानवडे, शेंगोळे, दुबुकवड्या, ज्वारीचे धापोडे, पुरणपोळी, गुळपोळी आणि विविध पारंपरिक पदार्थ या खाद्यपरंपरेला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. रानभाज्या, कंदमुळे, बांबूची कोवळी कोंब आणि स्थानिक धान्यांवर आधारित पदार्थांमधून आदिवासी समाजाच्या निसर्गाशी सुसंगत जीवनपद्धतीचे दर्शन घडते. चंद्रपूरच्या पर्यटनासाठी “फूड ट्रेल”, “विदर्भ खाद्य महोत्सव”, “आदिवासी खाद्य महोत्सव” आणि ग्रामीण पाककला अनुभव यांसारख्या संकल्पना विकसित करता येतील. तसे प्रयत्न येथील प्रशासनाकडून जिल्हास्तरावर सुरू झाले आहेत. पण त्याचे प्रयत्न व्यापक स्तरावर व्हायला हवे ज्यातून स्थानिक महिलांच्या बचतगटांना या प्रक्रियेशी जोडल्यास खाद्यसंस्कृतीचे जतन, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती हे तिन्ही उद्देश साध्य होऊ शकतात.
श्रद्धेच्या वाटेवर: धार्मिक पर्यटन
चंद्रपूरची धार्मिक ओळखही तितकीच प्रभावी आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर हे विदर्भातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रातील यात्रा ही श्रद्धा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक सहभागाचा भव्य अनुभव देते. वर्धा आणि पैनगंगा नद्यांच्या संगमावरील वढा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, भद्रावतीचे प्राचीन पार्श्वनाथ जैन मंदिर, गवराळा येथील गणपती, चिमूरचे श्रीहरी बालाजी मंदिर आणि त्यासोबतची शतकानुशतकांची घोडा यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाची महत्त्वाची केंद्रे आहेत. चिमूरची घोडा यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नाही; ती लोकपरंपरा, सामाजिक सहभाग, कुटुंबपरंपरा आणि सामुदायिक स्मृतींचा उत्सव आहे. चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरील मार्कंडा हे वैनगंगेच्या काठावरील धार्मिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे. नदीचे धार्मिक महत्त्व आणि मंदिराची अप्रतिम स्थापत्यरचना यामुळे हा परिसर इतिहास, धर्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम बनतो.
चंद्रपूर: पर्यटन विकासाची नवी दिशा | Chandrapur Tourism Development
चंद्रपूरच्या पर्यटनाकडे केवळ स्वतंत्र स्थळांच्या यादीप्रमाणे पाहण्याऐवजी एकात्मिक पर्यटन परिपथ म्हणून पाहण्याची गरज आहे.
उदाहरणार्थ -
ताडोबा – चंद्रपूर किल्ला – महाकाली मंदिर – बल्लारपूर किल्ला – भद्रावती – आनंदवन – सोमनाथ – ग्रामीण व कृषी पर्यटन – लोककला – खाद्यसंस्कृती
असा पर्यटन परिपथ विकसित केला तर एका पर्यटकाला काही तासांचा नव्हे, तर अनेक दिवसांचा चंद्रपूर अनुभव देता येईल. यासाठी स्थानिक इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक, वनविभाग, पर्यटन विभाग, ग्रामपंचायती, स्थानिक कलाकार, महिला बचतगट, आदिवासी समुदाय, शेतकरी, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन उद्योजक यांचा समन्वय आवश्यक आहे. चंद्रपूरच्या पर्यटन विकासाचा केंद्रबिंदू केवळ पर्यटकांची संख्या वाढविणे नसून स्थानिक समाजाला पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेत सहभागी करून घेणे आणि वारशाचे संवर्धन करणे हा असायला हवा. विदर्भाबाहेरून चंद्रपूरकडे येणाऱ्या पर्यटकाने येथे केवळ कॅमेऱ्यात काही सुंदर छायाचित्रे घेऊन परतू नये; तर चंद्रपूरची एखादी कथा, एखादी चव, एखादी लोकपरंपरा, एखादा इतिहासाचा ठसा आणि मानवतेचा एखादा विचार आपल्या सोबत घेऊन जावा.
“जंगल इथे तुम्हाला निसर्ग शिकवेल, किल्ले इतिहास सांगतील, मंदिरे श्रद्धा देतील, लोकसंस्कृती आपलेपणा देईल, शेतमाती अस्सलपणा शिकवेल आणि आनंदवन मानवता शिकवेल.”
एकदा चंद्रपूरला या…वाघाच्या पावलांचा माग घेताना इतिहासाच्या पाऊलखुणाही शोधा. किल्ले पाहताना लोकजीवन समजून घ्या. स्थानिक अन्नाची चव घेताना या मातीची ओळख अनुभवा आणि आनंदवनातून परतताना मनात एक प्रश्न घेऊन परत चला
“आपणही या जगाला थोडे अधिक सुंदर करण्यासाठी काय करू शकतो?”
चंद्रपूर तुमची वाट पाहत आहे—निसर्गाच्या कुशीत, इतिहासाच्या सावलीत, संस्कृतीच्या रंगात आणि मानवतेच्या प्रकाशात!
डॉ. पल्लवी ताजने
इतिहास अभ्यासक
वरोरा









great article
ReplyDeletechhan mahiti chandrapur baddal
ReplyDeleteमॅडम खूप छान लिहिलं तुम्ही. चंद्रपूरची ओळख मोजक्या शब्दात पण सुंदर करून दिली
ReplyDeletedid not know chandrapur is such a historic place
ReplyDeletegood article maam
ReplyDeleteखूप छान आणि विस्तृत माहिती दिली आहे आपण या लेखात.
ReplyDeleteMast article
ReplyDeletekhup chan
ReplyDelete