भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism
सह्याद्रीतील २२२० वर्षांचा इतिहास सांगणारा घाट
सच्चम भाना गोदावरी पुव्वसमुद्देन सहियासन्तिसलाहनकुलसरिसम जय ते कुले कुलम अथ्ति?
(हे गोदावरी नदी, तू पूर्वेकडील महासागराकडे वाहत आहेस. मला सांग, सातवाहनांपेक्षा मोठा राजवंश तुम्ही कुठे पाहिला आहे?)
आपण सर्वांनी चीन देशाचा सिल्क रूट (Silk route) ऐकले, वाचले असेल. पण भारत देशातील तेवढाच ऐतिहासिक, जुना आणि तितकाच महत्वाचा जागतिक व्यापारी मार्ग आपण जाणून घेऊ या...
Naneghat Hills
महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्वस्थळ असलेला नाणेघाट, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरपासून वायव्येस सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. नाणेघाट ही रुंद रस्ता असलेली अंदाजे 3 मीटर रुंद खिंड आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक मुंबईच्या उत्तरेकडील भरुकच्छ (भडोच/भरूच), सोपारा (सोपरीय/शूर्पारक) (आताचा नाला सोपारा) तसेच दक्षिणेकडील कलियन - आजचे कल्याण आणि चेऊल (चौल) या बंदरांमार्गे होत असे. यापैकी सोपारा बंदरावर येणाऱ्या मालाची वाहतूक प्रामुख्याने नाणेघाटाच्या खिंडीद्वारे देशावर (डेक्कन प्रदेश) होत असे. तसेच, यात्रेकरूही याच मार्गाने कोकणात ये-जा करीत असत (मात्र यात्रेकरुना जकात लागत नसे). सोपारा आणि कल्याणहून देशावर येण्यासाठी नाणेघाट हा सर्वात जवळचा व वापरला जाणारा मार्ग होता. याच मार्गद्वारे कापड, सुवर्ण / चांदी यापासून तयार करण्यात आलेले दागदागिने, मसाल्याचे पदार्थ, मखमल, कापूस, शस्त्रे इत्यादीची वाहतूक होत असे.
Naneghat Ancient Tax Collection Center
नाणेघाट हे नाव समोर येण्यामागील अनेक स्रोत आहेत...
१. नाना आणि गणा या दोन व्यापारी भावंडांनी डोंगर फोडून वाट तयार करायचे ठरवले. 'नाना' ने डोंगराच्या उत्तरेकडून घाटमार्गाचे खोदकाम पूर्ण केले. 'गुणा' ने डोंगराच्या दक्षिणेकडील खोल दरीच्या बाजूने खोदकाम केले; 'नाना' चे काम पूर्ण झाले म्हणून 'नाणेघाट'.
२. नाणेघाट जेथून प्रारंभ होतो, त्या दोन डोंगरांना 'नाना' व 'गुणा' अशी नावे आहेत. नाना नावाच्या डोंगरांच्या नावावरून घाटास नाणेघाट म्हणतात.
३. 'नना' ही कुषाणांच्या नाण्यांवरील देवता होती. त्यांची नाणी भारतात प्रसिद्ध होती. कालांतराने कुषाणांच्या देवतेच्या 'नना' या उच्चाराचा नाणे असा अपभ्रंश झाला आणि त्यावरून 'नाणे' हा शब्द तयार झाला. नाणेघाटामध्ये पैशांची देवाणघेवाण होत असल्याने, या घाटाचे नाव 'नाणेघाट' असे पडले असावे.
नाणेघाटापासून कल्याण ६० किलोमीटर अंतरावर आहे. घाटाच्या पश्चिमेस कल्याणच्या बाजूस पायथ्याशी प्रधानपाडा आणि वैशाखरे किंवा वैश्यगृह नावाची दोन गावे आहेत. प्रधानपाडा म्हणजे माल गोळा करण्याचे केंद्र व प्रधान व्यापाऱ्यांचे निवासाचे ठिकाण आणि वैशाखरे म्हणजे वैश्यगृह. वैश्य म्हणजे व्यापारी वर्ग, वैशाखरे म्हणजे व्यापाऱ्यांना तात्पुरते वास्तव्यासाठीचे ठिकाण होय. अशी प्राचीन कालखंडाशी संबंध असलेली आणि अर्थपूर्ण नावे असलेली, प्राचीन परपंरा बाळगून असलेली लहान गावे आजही जुन्नर ते कल्याण व्यापारी मार्गावर आहेत. (उदा. वैशाखखेडे, पिंपळवंडी, खामुड़ी इत्यादी).
नाणेघाटापासून पुढे हा मार्ग जुन्नर, नगर, नेवासा आणि पैठण या मार्गे देशाच्या आतील भागात जात असे. अशाप्रकारे, नाणेघाट हा कोकण आणि देश यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता. घाटाच्या माथ्यावर एक पठार आहे, जिथे एक भव्य दगडी कोरीव रांजण उभे आहे. या रांजणामध्ये प्राचीन काळी जकात (कर) गोळा केली जात असावी, असे अनुमान आहे. नाणेघाटाचे भू-राजकीय स्थान आणि जुन्नर या प्राचीन शहराशी असलेला जवळचा संबंध लक्षात घेता, जुन्नर प्राचीन काळी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते, हे स्पष्ट होते.
खिंडीमार्गात सातवाहन काळातील लेणी | Satvahan Age Caves in Naneghat
नाणेघाट येथील खिंडमार्गात असलेल्या मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजे [(त्यांची पहिली राजधानी प्रतिष्ठान - आजचे पैठण, दुसरी जीर्णनगर - आजचे जुन्नर आणि तिसरी अमरावती (आंध्र प्रदेश)] आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ढासळलेल्या (एक तर नैसर्गिकरित्या किंवा विध्वंस केले गेले असावे) मूर्तींचे अवशेष आढळतात. या मूर्तींच्या वरच्या भागावर त्यांची नावे कोरलेली आहेत. येथे सातवाहन राणी नागनिकेने केलेल्या वैदिक यज्ञांचा आणि दानधर्माचा एक मोठा शिलालेख दोन भिंतींवर उत्कीर्ण केलेला आहे. यातील बराच मजकूर नष्ट झाला असला, तरी उरलेल्या भागावरून त्या काळच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीची माहिती मिळते. मुख्य लेण्याच्या मंडपात दोन्ही बाजूंना बसण्यासाठी बाके कोरलेली आहेत, तर मंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतींवर शिलालेख आहेत. मागील भिंतीवर सातवाहन ( सातवाहन - या काळात ७ या अंकास खूप महत्व दिले गेले आहे. १. सात घोडे असलेला वाहन. २. सात ऋतू 3. सात देवता इत्यादी). राजघराण्यातील सात व्यक्तींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, त्या अशा: सिमुक सातवाहन, देवी नागनिका, श्रीसातकर्णी, कुमार भायल, महारठी त्रनकयिर, कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन. यातील एका जोडमूर्तीच्या वरच्या भागावर 'देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी' असे लिहिले आहे. यावरून ती सातकर्णीची राणी असावी, तसेच महारठी (महारथी) त्रनकयिर ( नाग वंशी, अंगीय कुळ) हे नागनिकेचे वडील असावेत, असे पुरातत्व तज्ञ / इतिहासकार यांनी सुचवले आहे. शेवटचे दोन, कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन, हे सातकर्णी आणि नागनिकेचे लहान मुलगे असावेत. पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते, ही लेणी सातवाहन राजघराण्याचे एक प्रतिमागृह (चित्रशाळा) असावे असे सांगितले जाते.
२२२० वर्षांपूर्वीचा गुहालेख
नाणेघाट लेण्यात कोरलेला राणी नागनिकेचा शिलालेख (हा शिलालेख / गुहालेख २२२० वर्ष इतका जुना आहे यावरून मराठी भाषेचा अभिजातपणा दिसून येतो ) प्राकृत मराठी भाषेत आहे. या शिलालेखाचा पुरावा अभिजात मराठीच्या मागणीसाठी महत्त्वाच्या ऐतिहासिक पुराव्यांपैकी एक म्हणून मांडला गेला. हा शिलालेख सध्या २० ओळींचा उपलब्ध आहे, ज्यापैकी १० ओळी डाव्या भिंतीवर तर उर्वरित १० ओळी उजव्या भिंतीवर कोरलेल्या आहेत. अंगियकुलवर्धन वंशातील महारठी त्रनकयिर यांच्या कन्या नागनिका ह्या सातवाहन राजा पहिला सातकर्णी याची पत्नी, तसेच वेदिश्री आणि श्रीमान सती (शक्ती) या राजपुत्रांची माता होत्या. पतीच्या निधनानंतर नागनिकेने सातवाहन साम्राज्याचे संचालन केले. शिलालेखातील विशेषणांवरून असे दिसते की राणी वैराग्यपूर्ण जीवन जगत होत्या. शिलालेखाच्या सुरुवातीला प्रजापती, धर्म, इंद्र, संकर्षण (कृष्ण), वासुदेव, चंद्र, सूर्य, कुमार आणि चार दिक्पाल (यम, वरुण, कुबेर, इंद्र) यांना नमन केले आहे. यात नागनिकेने सातकर्णीसोबत केलेल्या अनेक श्रौत यज्ञांचा उल्लेख आहे, जसे की दोन अश्वमेध ( रामायण भागात प्रभू श्रीरामांनी केलेला), एक राजसूय ( महाभारत काळात पांडव पुत्र धर्मराजांनी केलेला), तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगलदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतात्रिरात्र इत्यादी. या यज्ञांच्या विस्तृत नोंदीवरून त्या काळात यज्ञसंस्थेचे महत्त्व स्पष्ट होते. शिवाय, ब्राह्मणांना दान दिलेल्या हजारो गायी, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोने-चांदीचे आभूषण यांच्या उल्लेखांतून तत्कालीन आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीची झलक मिळते. कार्षापण व प्रसर्पक नाण्यांचा उल्लेख त्यात आढळतो. याचाच अर्थ त्या काळात नाणकशास्त्राची प्रगती झालेली दिसून येते. तसेच, संख्यांच्या विपुल वापरावरून प्राचीन भारतातील संख्याशास्त्राची प्रगत अवस्था सुद्धा दिसून येते.
Naneghat Tax Collection
हा शिलालेख कोरण्याचा मुख्य उद्देश सातवाहन सम्राज्ञीच्या धार्मिक कार्याची व साम्राज्याच्या वैभवाची माहिती व्यापाऱ्यांकडून इतर देशात व्हावी असा असावा. प्राचीन काळात या मार्गावरून जाणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यांसह भारतातील सार्थवाह, यात्रेकरू इत्यादींच्या मनात सातवाहन वंशाची श्रेष्ठता रुजवण्यात या शिलालेखाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. इ.स. १९७६ मध्ये, नाणेघाटापासून ३० किमी अंतरावर असलेल्या जुन्नर येथे प्रख्यात नाणकशास्त्रज्ञ पी. जे. चिन्मुळगुंद यांना एका शेतकऱ्याकडून सातकर्णी आणि नागनिका यांचे चांदीचे संयुक्त नाणे मिळाले. त्यावर ब्राह्मी लिपीत 'नायनिका' (नागनिका) आणि 'सिरी सातकनी' (श्रीसातकर्णी) असे कोरले होते. तसेच, नाणेघाटाच्या कोकण मार्गावरील एका पाण्याच्या टाक्यावर सापडलेला सातवाहन राजा वासिष्ठिपुत्र स्कंद सातकर्णीचा शिलालेख सुद्धा प्रसिद्धीस आला आहे. या दोन्ही नोंदी नाणेघाटाच्या ऐतिहासिक संदर्भात महत्त्वाच्या आहेत.
नाणेघाट हा केवळ सह्याद्रीतील एक प्राचीन घाटमार्ग नसून, तो सातवाहन साम्राज्याच्या व्यापारी, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा जिवंत साक्षीदार आहे. येथील शिलालेख, लेणी, जकातीचा रांजण आणि व्यापारी मार्गाची रचना यांमधून प्राचीन महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे दर्शन घडते. भारतीय उपखंडातील आंतरराष्ट्रीय व्यापार, वैदिक परंपरा आणि राज्यकारभार यांचा अभ्यास करताना नाणेघाटाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
कसे पोहोचाल | How to plan trip to Naneghat?
नाणेघाटाला भेट देण्यासाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या मार्गांनी जाऊ शकता - एक घाटमाथ्यावरून (जुन्नर बाजूने) आणि दुसरा कोकणातून (कल्याण बाजूने)
नाणेघाट पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर, प्रामुख्याने जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. हे ठिकाण जुन्नरपासून सुमारे ३० किमी अंतरावर, पुण्याच्या वायव्येस १२० किमी आणि मुंबईपासून १६५ किमी अंतरावर आहे.
आजूबाजूला पाहण्यासारखी इतर पर्यटन स्थळे
Reverse Waterfall
हा परिसर पावसाळ्यात 'उलटे धबधबे' (रिव्हर्स वॉटरफॉल) आणि निसर्ग सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
जीवधन किल्ला
नाणेघाटाच्या संरक्षणासाठी बांधलेला हा एक प्राचीन आणि अभेद्य किल्ला आहे. घाटाच्या अगदी समोरच हा किल्ला असून येथील 'वानर सुळका' (Reverse Needle) ट्रेकर्सचे मुख्य आकर्षण आहे.
शिवनेरी किल्ला
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला हा ऐतिहासिक किल्ला जुन्नर शहरात असून नाणेघाटापासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे.
लेण्याद्री
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी दोन प्रमुख गणपती मंदिरे (गिरिजात्मज लेण्याद्री आणि विघ्नहर ओझर) जुन्नर परिसराजवळच आहेत.
माळशेज घाट
निसर्गसौंदर्य आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे पर्यटन स्थळ नाणेघाटापासून हाकेच्या अंतरावर आहे.
ट्रेकिंग आणि भेटीसाठी योग्य वेळ (Best Time to Visit)
पावसाळा (जून ते सप्टेंबर) - सर्वोत्तम वेळ. या काळात हा परिसर पूर्णपणे हिरवागार होतो. नाणेघाटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील 'उलटा धबधबा' (Reverse Waterfall). जोरदार वाऱ्यामुळे खाली जाणारे पाणी थेट वर उडते, हे दृश्य पाहण्यासाठी पावसाळ्यात येथे प्रचंड गर्दी होते.
हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) - ट्रेकिंगसाठी उत्तम: जर तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल, ब्राह्मी लिपीतील शिलालेख पाहायचे असतील किंवा जीवधन किल्ल्यावर चढाई करायची असेल, तर हिवाळा हा काळ थंड आणि आल्हाददायक हवामानासाठी सर्वोत्तम मानला जातो.
Me @Naneghat
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️



.png)
wow!!
ReplyDeletethis is very good information, Chandewar sir should write more such articles on this platform
ReplyDeleteGreat writing
ReplyDeleteखूपच छान माहिती. आपल्या तरुण पिढीला हा इतिहास माहिती असायला
ReplyDeleteहवा. चांदेवर सर तुमच्याजवळील हा खजिना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे.
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
Interesting
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
changali mahiti
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
खूप सुंदर 🙏
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
विदर्भ बद्दल. काही सांगा
ReplyDeleteछानच
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
Deleteअशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿
Nicely written chadewar sir. Tumche article khup insightful astat
ReplyDeletegood work
ReplyDelete