तेथे रावण पुजला जातो...! | Ravana Temples and Worship in India | Author: Sakhi | Heritage Tourism | India Tourism
रावणाची पूजा: बिसरख आणि मंदसौर | Ravana Worship in Bisrakh & Mandsaur
तेथे रावण पुजला जातो...!
रामायणातील खलनायक: विदर्भातील गोंड आदिवासी मानतात पूर्वज
दसऱ्याचा दिवस म्हटला की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो आकाशाला भिडणारा रावणाचा पुतळा, त्याच्या दहा तोंडांना लागणारी आग आणि ‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषात होणारा दुष्ट प्रवृत्तींच्या पराभवाचा उत्सव! लहानपणापासून आपण रामायणाची कथा ऐकत आलो आहोत. या कथेत श्रीराम हे आदर्श पुरुष, तर रावण हा अहंकार, अन्याय आणि दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून आपल्या मनावर ठसला आहे. मात्र, भारतात अशी काही गावे आणि शहरे आहेत, जिथे दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करण्याऐवजी त्याची पूजा केली जाते. कुठे तो विद्वान आहे, कुठे शिवभक्त, कुठे पूर्वज, तर कुठे चक्क घरचा जावई!
अलीकडे प्रदर्शित झालेल्या भव्यदिव्य ‘रामायण’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा रावणाच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटात रावणाला दिलेले महत्त्व, त्याचे सामर्थ्य, त्याचा रुबाब आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यांना अधिक ठळकपणे मांडल्याची टीका काही प्रेक्षकांकडून होत आहे. काहींच्या मते, रामायणासारख्या महाकाव्यात प्रभू श्रीरामांच्या जीवनप्रवासाला केंद्रस्थानी ठेवणे अपेक्षित असताना रावणाचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावीपणे पडद्यावर आले आहे. त्यामुळे हा चित्रपट रामायणापेक्षा रावणायण अधिक वाटतो, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, या चर्चेच्या निमित्ताने एक वेगळाच प्रश्न समोर येतो. रामायणातील रावणाला आपण नेहमी खलनायक म्हणूनच पाहिले; पण भारतातील काही समाजसमूह त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्याची विद्वत्ता, शिवभक्ती, संगीतकला, युद्धकौशल्य आणि त्याच्याशी जोडलेल्या स्थानिक परंपरा यामुळे त्याला आजही पूजनीय मानले जाते. ही मंदिरे आणि श्रद्धास्थाने पाहिली की भारतीय संस्कृतीतील विविधतेची एक वेगळीच ओळख होते. कुठे आहेत ही मंदिरं आणि तिथे या खलनायकाला का पुजले जाते थोडे जाणून घेऊ या!
१. बिसरख, उत्तर प्रदेश (रावणाची जन्मभूमी मानले जाणारे गाव)
दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा परिसरात असलेले बिसरख हे गाव रावणाच्या जन्मभूमीशी जोडले जाते. स्थानिक मान्यतेनुसार, रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांचे वास्तव्य या गावात होते. त्यांच्या नावावरूनच या गावाला बिसरख हे नाव पडल्याचे सांगितले जाते. या गावातील वैशिष्ट्य म्हणजे येथे दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जात नाही. उलट गावकरी रावणाची पूजा, यज्ञ आणि धार्मिक विधी करतात. गावातील शिवमंदिराला रावण आणि त्याचे वडील विश्रवा यांच्या परंपरेशी जोडले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून रावण हा भगवान शंकराचा परमभक्त होता, या भावनेतून त्याची आठवण जपली जाते. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रावणाच्या जीवनातील विविध पैलू मंदिर परिसरात दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. रावण हा केवळ दहा तोंडांचा राक्षस नव्हता, तर तो विद्वान, राजा आणि योद्धाही होता, अशी स्थानिकांची भावना आहे. दसऱ्याच्या आधीपासूनच गावात धार्मिक वातावरण असते. रावणाच्या प्रतिमेचे पूजन, हवन आणि शिवपूजा केली जाते. गावकऱ्यांच्या मते, ज्याचा जन्म या भूमीत झाला, त्याचे दहन आपण कसे करायचे? ही श्रद्धा या गावाला देशातील इतर गावांपेक्षा वेगळे ठरवते.
२. मंदसौर, मध्य प्रदेश (रावणाला मानले जाते जावई)
मध्य प्रदेशातील मंदसौर हे रावणाच्या भक्तीमुळे विशेष चर्चेत असलेले शहर आहे. येथे रावणाला राक्षसराज म्हणून नव्हे, तर जावई म्हणून सन्मान दिला जातो. या मागे आहे एक रंजक स्थानिक परंपरा. स्थानिक मान्यतेनुसार, रावणाची पत्नी मंदोदरी ही मंदसौरची कन्या होती. त्यामुळे रावण हा या भागाचा जावई ठरतो. नामदेव समाजातील काही लोक या परंपरेचे पालन करतात. आपल्या मुलीच्या पतीचा अपमान कसा करायचा, या भावनेतून ते रावणाची पूजा करतात. मंदसौरमधील खानपुरा परिसरात रावणाची सुमारे ३५ फूट उंचीची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. दहा तोंडे आणि प्रभावी देहयष्टी असलेली ही मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. येथे रावणाला वेदांचा ज्ञाता आणि शिवभक्त म्हणून मान दिला जातो. या परंपरेतील एक विशेष बाब म्हणजे रावणाच्या मूर्तीसमोरून जाताना काही महिला डोके झाकतात. सासरच्या मंडळींसमोर आदराने डोके झाकण्याच्या प्रथेप्रमाणे रावण हा या भागाचा जावई असल्याने त्याला मान दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी येथे रावणाच्या मूर्तीचे पूजन केले जाते. इतरत्र रावणदहन होत असताना मंदसौरमध्ये मात्र त्याच्या पूजनाचा सोहळा पाहायला मिळतो. रावणाच्या पायाला लाल धागा बांधण्याची प्रथाही काही भाविकांमध्ये आढळते.
रावणग्राम, कानपूर आणि मंडोर | Ravangram, Kanpur & Mandore
३. रावणग्राम, विदिशा (लग्नाच्या पहिल्या आमंत्रणाचा मान रावणाला!)
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रावणग्राम हे नावच पर्यटकांची उत्सुकता वाढवणारे आहे. या गावात रावणाची पूजा केली जाते. येथे सुमारे दहा फूट लांबीची रावणाची झोपलेल्या अवस्थेतील प्रतिमा आहे. स्थानिक लोक रावणाला प्रेमाने 'रावण बाबा' असे संबोधतात. काही स्थानिक कुटुंबे स्वतः ला रावणाचे वंशज मानतात. त्यांच्या श्रद्धेनुसार रावण हा अत्यंत विद्वान आणि सामर्थ्यशाली राजा होता. त्याच्या ज्ञानाचा आणि शिवभक्तीचा आदर केला पाहिजे. या गावातील सर्वांत वेगळी परंपरा म्हणजे विवाह सोहळ्याचे पहिले निमंत्रण रावण बाबांना दिले जाते. घरात लग्नकार्य ठरले की सर्वप्रथम रावणाच्या मंदिरात जाऊन निमंत्रण ठेवले जाते. त्यानंतरच इतरांना आमंत्रणे दिली जातात. दसऱ्याच्या दिवशी येथे रावणाचे दहन करण्याऐवजी त्याचे पूजन केले जाते. त्यामुळे रावणग्राम हे भारतीय धार्मिक परंपरेतील एक आगळेवेगळे ठिकाण ठरते.
४. कानपूर, उत्तर प्रदेश (वर्षातून एकदाच उघडणारे दशानन मंदिर!)
उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील शिवाला परिसरात असलेले दशानन मंदिर हे रावणाच्या मंदिरांमधील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम १८६८ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. मंदिरात रावणाची सुमारे पाच फूट उंचीची दहा तोंडांची मूर्ती आहे. रावणाला येथे भगवान शंकराचा द्वारपाल, शक्तीचे प्रतीक आणि महान विद्वान म्हणून पूजले जाते. या मंदिराची सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे ते वर्षभर बंद असते आणि केवळ विजयादशमीच्या दिवशी भाविकांसाठी खुले केले जाते. दसऱ्याच्या दिवशी सकाळपासूनच मंदिरात पूजाअर्चा आणि आरती सुरू होते. भाविक मोहरीचे तेल, फुले आणि इतर पूजासाहित्य घेऊन दर्शनासाठी येतात. दिवसभर पूजाअर्चा झाल्यानंतर रावणदहनाची वेळ जवळ येते आणि मंदिर पुन्हा बंद केले जाते. म्हणजेच, वर्षातील केवळ एक दिवस रावणाचे दर्शन होते. रावणाच्या विद्वत्तेचा आदर करावा, पण त्याच्या अहंकाराचा परिणाम काय होतो, हेही लक्षात ठेवावे, असा संदेश या परंपरेतून दिला जातो.
५. मंडोर, राजस्थान ( रावणाचे सासर आणि विवाहस्थळ!)
राजस्थानमधील जोधपूरजवळ असलेले मंडोर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे रावणाचा संबंध त्याची पत्नी मंदोदरी हिच्याशी जोडला जातो. स्थानिक मान्यतेनुसार, मंदोदरी ही मंडोरची कन्या होती आणि रावणाचा विवाह याच भागात झाला होता. त्यामुळे मंडोरमधील काही ब्राह्मण समाज रावणाला आपला जावई मानतात. मंडोर परिसरात रावणाच्या विवाहाशी संबंधित जागेचा उल्लेख 'रावण की चंवरी' असा केला जातो. या परिसरात रावणाचे मंदिरही आहे. रावण आणि मंदोदरी यांच्या विवाहाची आठवण जपणाऱ्या या ठिकाणाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. जोधपूरमधील मौद्गिल आणि दवे ब्राह्मण समाजातील काही लोक स्वतः ला रावणाच्या विवाहाशी संबंधित वंशपरंपरेचे मानतात. रावणाच्या मृत्यूच्या दिवशी काही कुटुंबांकडून श्राद्ध आणि पिंडदानासारखे विधीही केले जातात. रावणाला येथे केवळ पराक्रमी राजा म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील जावई आणि पूर्वजांच्या परंपरेशी जोडलेली व्यक्ती म्हणून पाहिले जाते.
बैजनाथ आणि काकीनाडा: शिवभक्त रावण | Baijnath & Kakinada
६. बैजनाथ, हिमाचल प्रदेश (रावणाच्या शिवभक्तीची साक्ष देणारे मंदिर)
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बैजनाथ हे भगवान शंकराचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. हे रावणाचे स्वतंत्र मंदिर नसले तरी रावणाच्या शिवभक्तीशी जोडलेली आख्यायिका या ठिकाणाला विशेष महत्त्व देते. पौराणिक कथेनुसार, रावण हा भगवान शंकराचा परमभक्त होता. त्याने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. आपल्या दहा मस्तकांपैकी एकेक मस्तक शंकराला अर्पण करण्याची तयारीही त्याने दाखवली. त्याच्या या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला वरदान दिले. काही स्थानिक कथांनुसार, रावणाने कैलासावरून लंकेला नेत असलेले शिवलिंग बैजनाथ परिसरात ठेवले आणि ते तेथेच स्थापित झाले. या परिसरात दसऱ्याला रावणदहन करण्याची परंपरा नाही. रावणाच्या शिवभक्तीचा आदर म्हणून ही प्रथा पाळली जात असल्याचे सांगितले जाते. हिमालयाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही, तर रावणाच्या व्यक्तिमत्त्वातील भक्तीचा पैलू समजून घेण्याचेही एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
७. काकीनाडा, आंध्र प्रदेश ( रावणाची भव्य मूर्ती आणि शिवलिंग!)
आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहरातील समुद्रकिनाऱ्याजवळ रावणाशी संबंधित मंदिर आहे. येथे रावणाची सुमारे ३० फूट उंचीची भव्य मूर्ती आणि मोठे शिवलिंग पाहायला मिळते. स्थानिक आख्यायिकेनुसार, रावणाने या ठिकाणी भगवान शंकराची आराधना केली होती आणि शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे या मंदिरात रावणाला शिवभक्त म्हणून विशेष स्थान आहे. दहा तोंडे आणि वीस हात असलेल्या रावणाच्या प्रतिमेमुळे हे ठिकाण पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. काकीनाडा हे समुद्रकिनाऱ्याचे शहर असल्याने मंदिरदर्शनाबरोबरच समुद्रकिनाऱ्याची सफरही करता येते. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे ठरते.
गडचिरोलीतील गोंड परंपरा आणि लोकश्रद्धा | Gond Tradition of Gadchiroli & Folk Beliefs
८. गडचिरोली, महाराष्ट्र (आदिवासी समाजाच्या श्रद्धेतील राजा रावण!)
रावणाच्या पूजेची परंपरा महाराष्ट्रातही पाहायला मिळते. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही गोंड आदिवासी समाजांमध्ये रावणाला विशेष महत्त्व आहे. या समाजातील काही लोक रावणाला राक्षस किंवा खलनायक मानत नाहीत. त्यांच्या श्रद्धेनुसार रावण हा त्यांचा पूर्वज, राजा आणि आदिवासी अस्मितेचे प्रतीक आहे. काही समुदाय स्वतः ला रावणवंशी मानतात. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि कोरची परिसरात या श्रद्धेचे दर्शन घडते. कमलापूरसारख्या गावांमध्ये रावणाच्या प्रतिमा आणि त्याच्याशी संबंधित परंपरा जपल्या गेल्या आहेत. येथील काही गोंड समुदाय रावणाबरोबरच त्याचा पुत्र मेघनाद याचीही पूजा करतात. फाल्गुन महिन्यातील आदिवासी सणांमध्ये मेघनाद पूजनाची परंपरा आढळते. काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाला विरोधही करण्यात आला आहे. या समाजाची भूमिका अशी आहे की, रावणाचे व्यक्तिमत्त्व केवळ रामायणातील एका दृष्टिकोनातून समजून घेता कामा नये. त्यांची स्वतः ची मौखिक परंपरा, सांस्कृतिक इतिहास आणि पूर्वजांविषयीची श्रद्धा आहे. गडचिरोलीतील ही परंपरा विशेष महत्त्वाची आहे. कारण येथे रावणाची पूजा ही केवळ धार्मिक बाब नसून आदिवासी अस्मिता, सांस्कृतिक ओळख आणि आपल्या पूर्वजांच्या स्मृतीशी जोडलेली आहे.
९. निदघट्टा, कर्नाटक (रावणाला कुलदैवत मानणाऱ्या भाविकांचे मंदिर!)
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील मलवल्ली तालुक्यातील निदघट्टा येथे ‘श्री रावलेश्वर स्वामी सन्निधी’ हे रावणाला समर्पित मंदिर आहे. स्थानिक लोककथेनुसार, रामायणातील युद्धाच्या काळात रावण आपल्या सैन्यासह या परिसरात वास्तव्यास होता. त्याच्या स्मरणार्थ येथे मंदिर उभारण्यात आले, अशी स्थानिक समजूत आहे. या मंदिरात रावणाला पूजनीय स्थान दिले जाते. विशेष म्हणजे काही भाविक रावणाला आपले कुलदैवत मानतात. कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून तसेच शेजारच्या भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. एकेकाळी दुर्लक्षित आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या या मंदिराचा भाविकांच्या देणग्यांमधून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या विकासासाठी भाविकांनी स्वतः हून आर्थिक आणि बांधकाम साहित्याच्या स्वरूपात मदत केली. मंदिराची ही कथा रावणाविषयीची श्रद्धा आजही काही कुटुंबांमध्ये किती जिवंत आहे, हे दाखवून देते.
१०. भटखेडी, मध्य प्रदेश ( रावण आणि कुंभकर्णाची पूजा!)
मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील भटखेडी गावातही रावणाच्या पूजेची आगळीवेगळी परंपरा आहे. येथे दसऱ्याच्या दिवशी रावण आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांपुढे भाविक नवस करतात. पाऊस पडावा, संकटे दूर व्हावीत आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जाते. या प्रतिमा माती आणि चुन्यापासून तयार केल्याचे सांगितले जाते. येथे रावणदहनाऐवजी त्याच्या प्रतिमांची पूजा केली जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देशात दिसणाऱ्या परंपरेपेक्षा या गावातील उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते.
रामायणातील रावण आणि लोकपरंपरेतील रावण!
रामायणातील रावण आणि भारतातील विविध भागांत पूजला जाणारा रावण यांच्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाल्मिकी रामायणात रावण हा पराक्रमी, विद्वान आणि शिवभक्त असला तरी त्याच्या अहंकारामुळे आणि सीतेच्या अपहरणामुळे त्याचा विनाश झाला, असे चित्रण आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रांतांतील लोककथा, आदिवासी परंपरा आणि स्थानिक श्रद्धा रावणाचे वेगवेगळे पैलू समोर आणतात. कुठे तो विद्वान आहे, कुठे पूर्वज, कुठे जावई, तर कुठे शिवभक्त. याचा अर्थ प्रत्येक समाज रावणाच्या सर्व कृतींचे समर्थन करतो असे नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विशिष्ट गुणांना महत्त्व देऊन स्थानिक समाजांनी आपापल्या परंपरा जपल्या आहेत.
विविधतेने नटलेला देश
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. एका ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करून प्रभू श्रीरामांच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच रावणाची आरती केली जाते. कुठे त्याला जावई मानले जाते, तर कुठे पूर्वज आणि कुलदैवत! या परंपरा आपल्याला एक गोष्ट शिकवतात. एखाद्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचे दृष्टिकोन काळ, प्रदेश, समाज आणि संस्कृतीनुसार बदलू शकतात. रावणाची विद्वत्ता मान्य करताना त्याचा अहंकार नाकारता येतो आणि श्रीरामांच्या आदर्शांचा गौरव करताना भारतातील स्थानिक श्रद्धांचाही आदर करता येतो. रामायणातील रावणाचा अंत झाला; पण भारतातील या गावांमध्ये त्याच्या आठवणी, कथा आणि परंपरा आजही जिवंत आहेत. म्हणूनच रावणाची ही मंदिरे म्हणजे केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेची, लोकश्रद्धेची आणि इतिहासाच्या अनेकविध दृष्टिकोनांची अनोखी सफर आहे!
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.


रावणाचा महल हा लंकेत आहे, त्या बद्दल सांगा
ReplyDeleteinteresting
ReplyDeleteGreat info 👍
ReplyDeleteGood information thank you
ReplyDelete