गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra
चंद्रपूर जंगल क्षेत्र म्हटलं की महादेवाची पिंड गर्द जंगलात सुद्धा दिसून येतात. त्यांची नावे सुद्धा वेगवेगळी आणि स्थानिक संस्कार दिसून येतात - जसे पातळेश्वर, गुप्तेश्वर, मार्कंडेश्वर इत्यादी. गोंड या संरचनेत पेरसापेन महादेव अशी नावे आहेत. गायमुख हा प्रकार सुद्धा अशाच संरचनेचा भाग आहे. भारत देशात विशेषतः महाराष्ट्रात गायमुख संरचना कोकण ते पूर्व विदर्भ दिसून येतात. गायमुख बाबत पौराणिक कथा :-यास अनेक स्रोत दिसून येतात त्यापैकी एक अख्यायिका खाली दिलेली आहे.
महाभारतातील युद्धामध्ये अनेक अस्त्र/ शस्त्रांचा वापर करण्यात आला विशेषतः ब्रह्मास्त्र आणि त्यामुळे सृष्टीची खूप हानी झालेली होती. ती भरून काढण्याकरिता ऋषीं मुनींनी तपश्चर्या करून भगवान महादेवाना प्रसन्न करून सृष्टीची हानी भरून काढण्याची विनंती केली. याकरिता भुगर्भ पाण्याचे झरे निर्माण केले आणि गाईच्या मुखातून पाणी येईल अशी व्यवस्था केली. यालाच गायमुख संरचना म्हटली जाते.
गायमुख श्री महादेव मंदिर
चंद्रपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या चिचपल्ली वन परिक्षेत्रातील उथळपेठ या गावाच्या शेजारी डोंगराळ परिसरात गायमुख हे प्रसिद्ध व ऐतिहासिक स्थळ आहे. गायमुख येथे हेमाडपंथी व काळ्या दगडातील बांधकाम केलेले सुमारे ७०० वर्ष जुने शिवमंदिर आहे. उथळपेठ येथील डोंगरातून नैसर्गिक झरे बाराही महिने सातत्याने वाहत असतात. शिव मंदिराच्या पायथ्याशी पुरातनकालीन कुंड बांधण्यात आले आहे. त्या कुंडाला गायमुखी आकार देण्यात आला असल्याने या स्थळाला गायमुख म्हणून परिसरात ओळखण्यात येते.
भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत (भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकाळात इ.स. १२६० ते इ.स. १३०९ हेमाद्री पंडित (उपनाव- हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी मोडी लिपीचा वापर सुरू केला असे मानले जाते. त्यांनी त्याकाळी अनेक देवळांच्या बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना हेमाडपंती प्रकारातले मंदिर असे म्हणतात) यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. याला शुष्कसांधी स्थापत्यशैली असे देखील म्हणतात. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत हे दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते.
उथळपेठ निसर्गरम्य परिसराला जैविविधता भरभरून लाभलेली आहे. विपुल वनराई आणि दुर्मिळ वनस्पतीचा अधिवास आहे. उंबर, वड, पिंपळ, तेंदू, साग, हळदु, कुडा, कळंब, कडुनिंब, रोहन, भेरा, बांबू आणि गवताच्या विविध प्रजाती येथे दिसून येतात. वन्य प्राण्याच्या प्रजाती जसे वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, गवा, चांद अस्वल, विविध पक्षी येथे दिसून येतात.
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

.png)
Amazing article sir
ReplyDelete