भारावून टाकणारं हम्पी | The Miracles of Hampi | Author: Mohini Modak | Heritage Tourism | Incredible India
पाषाणांत दडलेलं एक साम्राज्य
तुंगभद्रेकाठी विसावलेलं निवांत निसर्गरम्य हम्पी. पाषाणांच्या कल्पनातीत रचनांमधून भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत वारसा सांगणारं हम्पी. रामायण आणि महाभारतातले संदर्भ, उपकथानकं कोरीव कामातून ल्यालेल्या मंदिरांचं शहर म्हणजे हम्पी. पाच सुलतानांच्या हल्ल्यानंतरही तग धरून राहिलेल्या, वैभवशाली विजयनगर साम्राज्याच्या ऐतिहासिक खुणा मिरवणारं हम्पी. जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेलं हम्पी. आपल्या भारतीयत्वाची पाळंमुळं किती खोल रुजलेली आहेत याचा प्रत्यय देणारं हम्पी. मित्रमंडळींनी शेअर केलेले नजरबंदी करणारे फोटो, थोडाफार हम्पी सिनेमाचा प्रभाव आणि काही अद्भुत व्हिडिओ पाहून मिळालेली माहिती यांच्या कोलाजमधून हम्पीबद्द्ल एक गूढ, अनामिक ओढ निर्माण झाली होती. आधी ’बदामी’ आणि तिथून हम्पीच्या वाटेवरचे ’पट्टदकल-ऐहोळे’ पाहिल्यावर तर ’आगाज़ ये है तो अंजाम क्या होगा’ याची उत्सुकता वाढली होती.
Hampi Ruins
१४, १५ व्या शतकात आणि १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे किमान २०० वर्षे कर्नाटकातलं ‘हम्पी’ समृद्ध स्थापत्यकलेचा ’आयकॉन’ होतं. याचे पुरावे देखण्या अवशेषांच्या स्वरुपात जागोजागी दिसतात. अपेक्षेपेक्षा हम्पीने कितीतरी जास्त, भरभरुन दिलं. भारुन टाकलं. चकित केलं. अंतर्मुख केलं. इथे प्रशिक्षित गाईड मिळत असले तरीही काही दुवे सुटल्यासारखे वाटत होते, काही प्रश्न अनुत्तरित राहिले होते. John Fritz आणि George Michell या दोन पुरातत्वतज्ञांनी हम्पी किमान वीस वेळा पालथं घातलं आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय चमूने इथे उत्खनन, संशोधन, अवशेषांचं परीक्षण आणि दस्तावेजीकरणाचं अत्यंत महत्वाचं काम केलंय. या दोघांनी लिहिलेलं ‘हम्पी’ हे पुस्तक वाचल्यावर सुटलेले अनेक दुवे जुळले. तत्कालिन कॉस्मोपॉलिटन ‘हम्पी’ अधिक वस्तुनिष्ठपणे समजून घेता आलं. दक्षिण भारतातील या सर्वात श्रीमंत राजधानीविषयी या पुस्तकात समाविष्ट असलेल्या तत्कालीन विदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या नोंदी बघितल्या तर तेव्हाच्या समाजव्यवस्थेची, जीवनशैलीची कल्पना येते. १५०१ मध्ये पहिल्या पोर्तुगीज आरमाराबरोबर भारतात आलेला बार्बोसा हा गोवामार्गे विजयनगरात दाखल झाला. त्याने या शहराचा उल्लेख Bisnagua असा केला आहे. इथे कुणालाही येण्याजाण्याची व आपापल्या समूहानुसार प्रेम करण्याची मुभा आहे मग तुम्ही ख्रिस्ती, ज्यू, मूर (मुस्लीम) किंवा हेदन (हिंदू) कुणीही असा, असे तो नोंदवतो. व्यापारी आणि श्रीमंत माणसांनी गजबजलेल्या या शहरातल्या बाजारपेठेचे वर्णन करताना बार्बोसा लिहितो. इथे हिऱ्याच्या खाणी आहेत. पेगू(बर्मा), सीलम (सिलोन) इथून येथे विक्रीसाठी रत्न येतात. चीनमधून आलेले दुय्यम प्रतीचे ब्रोकेड, धातू, विशेषत: तांबे, चांदी, याशिवाय केशर, गुलाबजल, चंदन, सुगंधी द्रव्ये आणि केरळमधून गाढवांवर लादून विक्रीला आलेले मिऱ्यांसारखे मसाले यांचा इथे मोठा व्यापार होतो. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सुवर्णमुद्रा विशिष्ट ठिकाणी तयार होतात, एकीतही खोट आढळत नाही.
बार्बोसाच्या रंजक नोंदी
तत्कालिन जीवनशैलीबद्दल बार्बोसाच्या नोंदी रंजक आहेत. राजाचे (राय) वास्तव्य बहुतांशी या शहरातच असते. इथले नागरिक हेदन (हिंदू) आहेत. पुरुष उंच आहेत. त्यांचे केस लांब आणि काळे आहेत. स्त्रिया देखण्या आणि धीट आहेत. त्या तलम, सुती किंवा गडद रंगाचे रेशमी कपडे वापरतात. कमरेभोवती (निऱ्या) व छातीवर (पदर) हे वस्त्र त्या अशा पद्धतीने गुंडाळतात ज्यात त्यांचा एक हात आणि तो खांदा उघडा राहील. डोक्यावर आच्छादन नसते. त्या केसांचा अंबाडा घालतात. त्यावर गजरे माळतात. त्यांच्या नाकात रत्न किंवा मोत्याची सुंकली असते. तसेच गळ्यात, कानात, हातात सोन्याचांदीचे दागिने असतात. चामड्याची सुशोभित पादत्राणॆ त्या वापरतात. (बार्बोसाने केलेले पुरुषांच्या पोशाखाचे वर्णन धोतराशी जुळणारे आहे.) डोक्यावर पगडी, टोपीसारखे प्रकार पुरुष वापरतात. विशेष प्रसंगी ते खांद्यापासून पायघोळ कपड्यात दिसतात. ते देखील रत्न, मोत्यांच्या दागिन्यांचा आणि सुगंधी द्रव्यांचा मुबलक वापर करतात. इथल्या स्त्रियांना नृत्य, गायन, वादन इ. कला लहानपणापासून शिकवल्या जातात. श्रीमंत पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करतात. राजालाही अनेक राण्या व दासी आहेत. राजा कामकाजासाठी नियमित दरबार भरवतो. अपराध्यास कठोर शासन तसेच आर्थिक दंड केला जातो. राजाजवळ सुमारे ९०० हत्ती आणि २०००० घोडे आहेत. सरदार, मनसबदारांनाही हुद्द्यानुसार घोडे दिले जातात. इथले स्थानिक घोडे फार जगत नसल्याने चांगल्या प्रतीचे उमदे घोडे आयात केले जातात. हत्तीघोड्यांबरोबरच राजा सैन्याची आणि पाच ते सहा हजार स्त्रियांचीही देखभाल करतो. या कलाकुशल स्त्रिया त्याच्या मिरवणुकीत सहभागी होतात. सैनिकांना युद्धावर जाताना त्यांच्या रंजनासाठी यातील निवडक स्त्रिया सोबत दिल्या जातात."लुडोविको द वर्थेमा हा १५०९ च्या सुमारास येथे आलेला इटालीयन प्रवासी तर या शहराचे ’मी पाहिलेला स्वर्ग’ अशा शब्दात वर्णन करतो.राजाकडची अलोट संपत्ती, हजारोंचे घोडदळ, रत्नखचित पोषाख ,दागिने याचे कौतुक करताना इतका श्रीमंत राजा मी जगात पाहिला नाही, असेही लिहितो.
आजचे ‘हम्पी’ तुंगभद्रा नदीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. एका बाजूला मंदिरे, आणि पूर्वीच्या विजयनगर शहराचे अवशेष आहेत तर दुसऱ्या बाजूला लहान हट्स व कॅफे आहेत. हा भाग हिप्पी लँड म्हणून ओळखला जातो. हम्पीतली प्रमुख स्थळं म्हणजे बहुतांशी मंदिरच आहेत. त्यांच्या बांधकामात ग्रॅनाइट आणि मऊ शिस्ट रॉकचा वापर केला गेला आहे. एकेकाळी जमिनीच्या पोटात असलेले हे पहाड भूकंपासारखी उलथापालथ होऊन वर आले आणि सुमारे ३ अब्ज वर्ष उन्ह, वारा, पावसाचे तडाखे सोसून दगडांच्या विविध आकारांच्या राशीत रुपांतरित झाले. हे दगड अलंकारिक बारीक कोरीव कामासाठी उपयुक्त असतात. यांचा वापर करून रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांपासून प्रेरित असलेल्या गाथा हम्पीमधल्या मंदिरांमध्ये सभामंडप, खांब, छत आणि भिंतींवर अशा सर्वत्र कोरलेल्या आढळून येतात.
रामायणातील किष्किंधा नगरी हीच
पौराणिक उल्लेखानुसार रामायणात वर्णिलेल्या किष्किंधा नगरीचा परिसर तो हाच. लोकप्रिय रामायणानुसार सीतेच्या शोधात असलेले राम आणि लक्ष्मण इथे पोचले. इथेच त्यांची भक्त हनुमानाशी प्रथम भेट झाली. हनुमानाने त्यांची सुग्रीवाशी भेट घडवली. वाली-सुग्रीवांच्यातील संघर्षाबद्दल सांगितले. सीतेला आकाशमार्गे रावण पळवून नेत असताना सुग्रीवाने पाहिले होते. राम व सुग्रीवाने एकमेकांना मदत करायचे ठरवले. रामाने वालीचा वध करुन सुग्रीवाला पुन्हा गादीवर बसवले तर सीतेला अशोकवनातून सोडवण्यासाठी सुग्रीवाने आपली वानरसेना रामाच्या मदतीला दिली. आजही या परिसरात प्रचंड माकडं आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
दिल्ली सुलतानाच्या आक्रमणापासून बचावलेल्या या भागात सुरुवातीला स्थानिक हुक्का (हरीहर १३३६-५६) आणि बुक्का(१३५६-७७) यांचे अधिपत्य होते. हा भूभाग त्यांना बहामनींच्या दहशतीमुळे फारसा वाढवता आला नाही. नंतर गादीवर आलेल्या संगम घराण्याच्या देवराय पहिला (१४०६-२२) दुसरा (१४२४-४) यांनी मात्र आपले राज्य पार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारले. पुढे कृष्णदेवराय (१५०९-२९) आणि अच्युतराय (१५२९-४२) यांनी यावर कळस चढवून राज्य अत्यंत भरभराटीला नेले. यानंतर सदाशिव व रामराय कारभार पाहू लागले. पुढच्या घटनांचे चटका लावणारे वर्णन सीझर फ्रेड्रिक या इटालियन प्रवाशाने (इ.स. १५६७) केले आहे. इ.स. १५६५ मध्ये तलिकोटाची लढाई हरल्याची बातमी पोचताच रामराय व त्याच्या बंधूंच्या कुटुंबीयांनी जीव मुठीत धरून शहरातून पलायन केले. पाठोपाठ बेरार, विजापूर, गोवळकोंडा व अहमदनगरच्या सुलतानांनी बेझेनगर (विजयनगर) काबीज केले. पुढील सहा महिने त्यांनी घराघरात शिरून लूट केली. आपल्या मूळ प्रदेशापासून दूर असलेले हे शहर सांभाळणे शक्य न झाल्याने ते आपापल्या प्रांतात निघून गेले. ते जाताच अड्यार घराण्यातील तिरुमला व वारसदारांनी ते शहर पुन्हा वसवून गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण शहरातला बराच भाग भग्न, उद्ध्वस्त झाला होता. घरे ओस पडली होती. त्यात चक्क जंगली श्वापदे वस्तीला आली होती. अखेर हे साम्राज्य हळूहळू लयाला गेले. पुढे १७-१८ व्या शतकात हैद्राबादचा निजाम, हैदर अली, टिपू सुलतान आणि मराठ्यांनीही विजयनगरावर स्वामित्वाचा दावा केला. १७९९ च्या ॲंग्लो-म्हैसूर युद्धानंतर हा भाग ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. आज कर्नाटक सरकार आणि पुरातत्त्वविभागाच्या प्रयासाने गतकालीन वैभवाची साक्ष देणारं हम्पी शक्य तितकं रिस्टोअर करून जागतिक वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात आलं आहे.
विजय विठ्ठल मंदिर संकुल | Vitthal Temple of Hampi
इथे सर्वप्रथम पर्यटकांना पाहायचं असतं ते विजय विठ्ठल मंदिर संकुल. पार्किंगपासून आतपर्यंत जायला बॅटरी कार असतात. स्थानिक प्रशिक्षित महिलाच या कार चालवतात. देवराय द्वितीयच्या कारकीर्दीत (इ.स.१४२२-१४४६) निर्मिलेल्या या मंदिरातील विष्णूचे कानडा ओ विठ्ठ्लू रुप तो मूळचा कर्नाटकूच असल्याची साक्ष देते. पौराणिक कथांनुसार, हे त्याचे विश्रांतीस्थान होते. गोपुरातून आत शिरताच उजळून निघणारे मंदिराचे सौंदर्य स्तिमित करते. विठ्ठलासमोर गरुडदेवाचा अप्रतिम कोरीवकला दर्शवणारा रथ आहे. आपल्या ५० रु.च्या नोटेवर याची प्रतिकृती आहे. मुळात रथाला घोडे जोडले होते. नूतनीकरणानंतर आता तिथे हत्ती दिसतात. इथले ५६ संगीतस्तंभ हे तर एक आश्चर्यच आहे. चंदनाच्या काठीने एकेकावर एक प्रहार करताच वेगवेगळा सूर ऐकता येतो. या स्तंभाच्या आत धातू असल्याशिवाय संगीतमय ध्वनी निर्माण होणार नाही असे इंग्रजांना वाटले. त्यामुळे त्यांनी दोन स्तंभ पाडले. परंतु स्तंभाच्या आत असे काही आढळले नाही. पर्यटकांनीही हे खांब बडवून पाहिल्याने आता आत प्रवेश करायला मनाई आहे. बाजूला कल्याणम् (लग्न) मंडप आहे. इथे विवाह होत असत. राउडी राठोडसारख्या काही मसाला हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण इथे झालेले आहे.
जनाना उर्फ राणीमहल किंवा कमल महल आणि भव्य हत्तीशाळा: हे एकाच प्रांगणात आहे. त्या अर्थी हा राणीमहालच नसून सरदार निवास असावा. या महालाचा आकार कमळासारखा आहे. हा महाल दोन मजली असून त्याचे बांधकाम दगडांऐवजी चुना आणि वीट वापरून केलेले आहे. या महालाच्या बांधकामाची शैली ही इंडो- अरेबिक आहे किंवा बहामनींच्या मुस्लिम स्थापत्यकलेचा प्रभाव या तीनही स्थळांच्या रचनेवर असावा. विशेषत: कमानी आणि घुमट. कमलमहल मध्ये नृत्य केले जाई, राण्या विश्राम करत असं गाईड म्हणतात पण पुस्तकानुसार इथे महत्वाच्या राजकीय बैठका होत. भव्य हत्तीशाळा पाहून हत्तींची किती काळजी घेतली जाई हे लक्षात येतं. यानंतरचा टप्पा म्हणजे राणी बाथ. एक आकर्षक दगडी चौकोनी पायऱ्यांचा तलाव. नैसर्गिक उतार वापरून यात दगडी कालव्यांमधून आणलेलं पाणी सोडलं जाई. हे सुद्धा सरदार, मनसबदारांच्या बायकांच्या स्नान, विश्रामासाठी बांधलं होतं. शाही स्त्रियांची विशेष काळजी घेतली जाई हा उल्लेख वर आला आहेच.
पहिला देव ‘राय’ गादीवर बसला त्याच सुमारास हम्पीला पोचलेला इटालियन प्रवासी निकोलो कोन्टी. तो लिहितो , ‘राजाच्या मिरवणुकीत हजारो स्त्रिया त्याच्या विजयरथासह चालत जात असत. (त्या सगळ्या राण्या किंवा राणीवेशातील स्त्रिया असत) धार्मिक समारंभात रथ ओढले जात त्यापुढे नागरिक स्वत:ला झोकून देत असत.’ ही त्यांची आपल्या दैवताबद्द्ल श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याची काहीशी चमत्कारिक पद्धत असावी.
महानवमी (डिब्बा) मंच: कृष्णदेवरायनी उदयगिरी (ओरिसा) जिंकल्यावर विजयाचं प्रतीक म्हणून हा आयताकृती विशाल मंच बांधला. रामाने रावणाशी होऊ घातलेल्या युद्धात विजय मिळावा म्हणून दुर्गेची पूजा केली. याच तत्त्वाने पावसाळा संपल्यावर म्हणजे पीक पाणी आटोपले की सैन्याच्या मोहिमा सुरु होण्याआधी या मंचासमोर दरवर्षी दुर्गापूजा आणि महानवमी उत्सव साजरा होऊ लागला. ‘बाहुबली’ सिनेमातील एका प्रसंगामध्ये अशा प्रकरचा डिब्बा (मंच) वापरला आहे. महानवमी उत्सवाला व्यापारी संबंध असलेल्या देशातील पाहुणे व कलाकार येत. तुर्की नृत्यकलाकारांच्या प्रतिमा मंचाच्या बाजूने कोरलेल्या दिसतात. १४४३ मध्ये म्हणजे देवराय द्वितीयच्या कार्यकाळात राजकीय दौऱ्यावर आलेला पर्शियन सरदार अब्दुल रझाक. या उत्सवाचे वर्णन करताना तो लिहितो, ‘मी जगात कुठेही इतकं अद्भुत शहर पाहिलेलं नाही. अर्धे जमिनीत गाडलेले पुरुषभर उंचीचे चिरे एकमेकांना आणि एकमेकांवर जोडल्याने इथल्या किल्ल्यांची तटबंदी इतकी अभेद्य झाली आहे की ती पार करणे सैनिकालाच काय एखाद्या दमदार घोड्यालाही अशक्य आहे.’ मेघडंबरी, छत्रचामरे व सर्व लवाजमा घेऊन महानवमी उत्सवात आगमन केलेला राजा मंचावरील अधिकारी व पाहुण्यांसमोर आपल्या वैभवाचे व सैन्याचे शक्तीप्रदर्शन करत असे. सरदार, मनसबदारांसह हजारो हत्ती त्याला सलामी देत. राजा रत्नखचित सुवर्णसिंहासनावर बसत असे. मंचासमोर कुशल कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करत असत. मल्ल कुस्ती खेळत. तलवारबाजी होई. परदेशी पाहुण्यांमार्फत जगभरात या शक्तीप्रदर्शनातून योग्य तो ‘संदेश’ पोचत असावा. मंचाच्या शेवटच्या प्रतलावर जाऊन सभोवतालचे हम्पी डोळे भरुन पाहता येते. मागच्या बाजूने खाली उतरून मंचाला प्रदक्षिणा घालताना दिसणारी भिंतीवरची कारागिरी अप्रतिम आहे. महानवमी मंचालगत एक आकर्षक पायऱ्या पायऱ्यांची पुष्करणी आहे. पार जमिनीखाली गेलेली ही पुष्करणी १९८० साली पुरातत्त्वविभागाला सापडली मग पूर्ण खोदकाम करून रिस्टोअर करण्यात आली. तुंगभद्रा नदीचेच पाणी यात खेळवले जात असे. याच नदीपासून काढलेला चिरेबंदी कालवा लगतच होता. सैनिकांच्या भोजनासाठी, खळगे केलेल्या भल्यामोठ्या दगडी थाळ्यांची रांग त्याला लागून होती. पुढे पायऱ्यांच्या विहिरीसारखे काही होते. आत पाहिले तर खाली एका भुयाराचे बंद दार दिसत होते. ते भुयार कुठे उघडते हे राजघराण्यातील निवडक व्यक्तींनाच माहित असायचे असे गाईड सांगतात. आत्यंतिक समृद्धी असल्याने सतत आक्रमणाच्या भीतीच्या छायेखाली वावरत असलेल्या राज्यात सुरक्षिततेसाठी अशा गुप्त जागांची आवश्यकता असणारच.
१५२० च्या सुमारास म्हणजे कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगरात आलेला पोर्तुगीज घोडेव्यापारी दोमिंगो पेसने तत्कालिन स्थितीचे सर्वात प्रदीर्घ वर्णन केले आहे. पर्वतांनी आणि दगडांच्या राशींनी वेढलेल्या या शहरात प्रवेश करताना उतारापासून आतपर्यंत भातशेती आणि अनेक भाज्या, फळांची लागवड केलेली आहे. मी आत आलो ते भक्कम तटबंदी असलेल्या गोव्याच्या बाजूकडील प्रवेशद्वारातून. सिंचनासाठी तयार केलेल्या एक भव्य तळ्याचा बांध काही ना काही कारणाने फुटून जाई म्हणून पुरोहितांच्या सल्ल्यानुसार राजाने काही पशुंसह नरबळी दिले होते. जवळच राजाने लाडकी राणी तिरुमलादेवीसाठी नगर वसवले (आजचे होस्पेट) या मार्गावर राजाने अनेक झाडे लावून घेतली व मंदिरांची निर्मितीही केली. राजा पहाटे उठून तूप प्राशन करत असे आणि अंगालाही तुपाचे मर्दन करून ते जिरेपर्यंत युद्धकलेचा सराव करत असे. नंतर सुस्नात होऊन राजा दरबारी कामकाजासाठी (लिस्बनच्या राजवाड्यापेक्षाही भव्य) प्रासादात जात असे. बैलांवर माल लादलेल्या बाजारपेठात व्यापार्यांची गर्दी असे. इथे धान्य, भाजीपाल्याबरोबर पशु-पक्ष्यांचीही भरपूर विक्री होत असे. शहराला लागून सुंदर आणि विशाल देवस्थाने होती. (विरुपाक्ष मंदिर, विठ्ठ्ल मंदिर इ.चे यात सविस्तर वर्णन आहे) नदीपल्याड अनागोंदी गाव होते जी यापुर्वीची राजधानी होती असे लोक म्हणत. एका वेळी १५-२० माणसे तर कधी घोडे किंवा बैल घेऊन देखील बांबूच्या टोपलीसारख्या नावांमधून (कोरॅकल) तिकडे जाता येई. ‘कोरॅकल राईड’ हा अनुभव तिथे आजही घेता येतो. विविध आकाराच्या निश्चल शिळांनी वेढलेल्या, तुंगभद्रेच्या चिंचोळ्या पण खोल पात्रातून ही तबकडी पुढे जात असते. मावळतीच्या केशरट उजेडात आकाशाचा आणि पाण्याचा रंग सारखाच दिसतो. वाटेवर खडकालगत छोटीशी दगडी मंदिरे आहेत. नाव पार्क करुन काही जण त्यात शिरून फोटो काढायचा मोह टाळू शकत नाही. थोडे थ्रिल म्हणून किनारा आणि एका मोठ्या खडकाच्या मधल्या फटीतून नाव आत घालतात आणि मध्यावर आल्यावर एकदा वेगाने गोल गोल फिरवतात. अर्थात लाईफ जॅकेट असतात. भीती वाटू नये म्हणून कुणी डोळे मिटले तरी भोवतालचा अद्भुत निसर्ग ते उघडायला भाग पाडतो. अस्ताला चाललेल्या सूर्याची किरणं पाण्यावर पसरतात तेव्हा बाजूच्या खडकांवर माकडांचा मुकाट बसलेला जथ्था हमखास दिसतो.
प्रसिद्ध आणि प्राचीन विरुपाक्ष मंदिर | Virupaksha Temple, Hampi
लांबून दिसणारे मंदिराचे मनोहर १०५ फुटी गोपूर केरळच्या पद्मनाभम् मंदिराच्या गोपुराची आठवण करून देते. जैन आणि हिंदू अशी संमिश्र स्थापत्यकला झळकवणाऱ्या या मंदिराच्या प्रांगणात १२ व्या शतकातली लहान मंदिरेही आहेत. कर्नाटकातल्या अनेक पट्टदकल (म्हणजे जिथे राज्याभिषेक सोहळे घडत) मंदिरांपैकी हे एक पण विशेष विख्यात. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर ७ व्या शतकात दक्षिण भारतीय शैलीच्या वास्तुकलेनुसार बदामीच्या चालुक्यांनी बांधले. मंदिराच्या भिंतींवर कोरीवकामातून शिव आणि विष्णूसंबंधी गाथा साकारलेल्या आहेत. प्रवेशद्वाराशी विष्णूचा वराहअवतार कोरलेला आहे. मुस्लिमांमध्ये डुक्कर हराम असल्याने आक्रमणकर्ते इथून परत फिरले म्हणून विरुपाक्ष मंदिर टिकून राहिले असे म्हणतात. हम्पी हे पूर्वी पंपाक्षेत्र म्हणून ओळखले जाई. पुराणानुसार पंपा ही ब्रह्मदेवाची मानसकन्या. शंकर प्रसन्न व्हावा म्हणून तिने हेमकुटावर तपश्चर्या केली आणि त्याला प्राप्त केले. विरुपाक्ष म्हणजे या पंपापती शिवाचे मंदिर. त्याचा तिसरा डॊळा म्हणून विरुप-अक्ष. इथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात विरुपाक्ष आणि पम्पा यांचा लग्नाचा समारंभ आयोजित केला जातो तसेच विरुपाक्ष देवाचा वार्षिक रथोत्सव फेब्रुवारी महिन्यात असतो. मंदिराचे गोपुर आणि आतली लहानशी मंदिरं दिवसा आणि दिवेलागणीनंतरही उजळून निघालेली दिसतात. मुख्य सभामंडपाच्या छतावरची नैसर्गिक रंगाचा वापर करून केलेली कलाकारी नजरबंदी करते. बाजूलाच पंपादेवी आणि भुवनेश्वरीची लहान मंदिरे आहेत. आतले पुजारी कुणी दर्शनाला आले की मोठ्याने श्लोक म्हणून गजर करु लागतात. आतमध्ये सोंडेने आशीर्वाद देणार्या हत्तीभोवती पर्यट्क, दर्शनाला आलेली जोडपी आणि इतर भक्तांची कायम गर्दी असते.
Virupaksha Temple, Hampi
हम्पी मार्केट
मंदिरासमोरच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणजे हम्पी मार्केट आहे. ते परदेशी पर्यटकांनी ओसंडून वाहत असते. कोरोनाकाळात थंडावलेले हे मार्केट पुन्हा फुलू लागले आहे. मण्यांच्या माळा, पाश्चत्य कपड्यांना भारतीय कलांचा स्पर्श लाभलेले चित्रविचित्र कपडे, पिशव्या, पर्सेस, आठवण म्हणून न्यायची चिन्हे, मूर्ती असे कितीतरी प्र्कार इथे मिळतात. युट्यूब-फेम ’मँगो ट्री’ हे रेस्टॉरंट या मार्केट परिसरातच आहे. बाजाराच्या चिंचोळ्या गल्लीतून तिथे पोचल्यावर नावाच्या पाटीला ताज्या फुलांचा हार घातलेला दिसतो. दारात सुबक रांगोळी रेखलेली असते. बाहेर एका बाजूला बेसिन व चप्पलस्टँड. आतली रचना फार दिलखेचक नसली तरी आरामदायी आहे. पत्र्याला ग्रीन नेट लावून भिंती तयार केलेल्या आहेत. जपानी पद्धतीच्या बैठ्या टेबलांची रचना होती. आपण या टेबलाशी तक्क्याला टेकून निवांत बसायचे. दक्षिण भारतीय थालीपासून लेबॉनीज पदार्थापर्यंत बरेच पदार्थ मेनूकार्डावर आहेत. सोबतीला गाण्याचे सूर आणि केळीच्या पानावर वाढप करणारे अतीतत्पर वेटर. आता कर्नाटक म्हटल्यावर मसाला डोसा, सांबार, चटणी हेच पटकन आठवते. परंतु या भागात लुसलुशीत आप्पे, तांदळाच्या पिठात भाज्या घालून थापलेली थालिपीठासारखी अक्की रोटी , मऊसूत नीर डोसा हे ही लोकप्रिय स्थानिक पदार्थ आहेत. आलुगेड्दा ही अख्ख्या बटाट्यांची चटपटीत भाजी, बिसी बेळी भात ,चित्रान्न, तट्टे इडली, कुरकुरीत मुद्दुर वडा हे देखील चाखून पाहायला हवेत. मांसाहारींसाठी करीचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्वारीच्या पातळ भाकरीबरोबर काजू घातलेले सागू विशेष रुचकर लागते. तुपात माखलेला म्हैसुरपाक किंवा तांदळाची दाट खीर, शिऱ्यासारखा लागणारा रवा केसरी याचीही चव उत्तम असते. कोणत्याही स्थानिक रेस्टॉरेंट्समध्ये किंवा एखाद्या होम स्टे मध्ये बैठ्या टेबलवर केळीच्या पानात याचा आस्वाद घेतला तर हेच पदार्थ अधिक समाधान देऊन जातात. हम्पीत गुहा-जंगलवाटा शोधायला, संशोधन करायला, नुसतं भटकायला जे परदेशी प्रवासी महिनामहिना येऊन राहतात. ते स्थानिक पदार्थांना प्राधान्य देताना दिसतात.
अंजनेद्री किंवा अंजनेय टेकडी
उन्हाचा त्रास नको म्हणून सकाळी लवकर ही टेकडी चढायला सुरुवात केलेली बरी. हनुमंताचे हे जन्मस्थान मानले जाते. खालून वाटते तितके उंच आणि तिरक्या ५७५ पायऱ्या चढणे सोपे नसले तरी पट्टीचे परदेशी प्रवासी, ट्रेकर, लहान मुले तुरुतुरू चढत उतरत असताना पाहून उत्साहाचे वातावरण निर्माण होते. कित्येक जण श्रीराम आणि हनुमानाचा जयजयकार आणि कलकलाट करत चढत असतात आणि एकमेकांना प्रोत्साहित करत असतात. माथ्यावरच्या मंदिरात प्रवेश केला की भाविकांची, पर्यटकांची गर्दी आणि नारळांच्या ढिगासह एकूणच खूप पसारा असल्याचे जाणवते. रामसेतूमधला पाण्यावर तरंगणारा दगड बाजूला एका पेटीत (पाण्यात तरंगत) ठेवलेला आहे. आत सगळं काही शेंदरी रंगात रंगवलेलं. स्पीकरवर गाणी, भजनं सुरु असतात. हनुमंत आणि अंजनीमातेचं दर्शन घेऊन बाहेर पठाराच्या रेलींगपाशी आल्यावर दिसणारं हम्पीचं विहंगम आणि विलोभनीय दृश्य पाहून चढून आल्याचे चीज झाल्यासारखे वाटते. लख्ख उन्हात पांढरट दिसणाऱ्या शिळांच्या वेढ्यात तुंगभद्रेची निळसर रेष लवलवताना दिसते. मंदिरांचे बदामी, राखाडी कळस उन्हात शुभ्र दिसतात. खाली उतरेतो पायथ्याशी माकडांना चुकवत पूजासामान, हनुमानमूर्ती विकणाऱ्यांची गर्दी वाढलेली असते. किरकोळ विक्रेत्यांमध्ये बहुसंख्येने बायकाच आढळतात.
पंपा सरोवर आणि शबरी गुहा
पंपासरोवर हे हिंदू धर्मातल्या पाच पवित्र मानल्या जाणाऱ्या सरोवरांपैकी एक आहे. (मानसरोवर, बिंदू सरोवर, नारायण सरोवर, पुष्कर सरोवर आणि पंपा सरोवर) भागवत पुराणात तसा उल्लेख आहे. इथे शंकर तपश्चर्येला बसत असल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये असतो. हे सरोवर हम्पीजवळच कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडी रस्त्यावर आहे. अनागोंदी शब्दाचा उगम इथल्या तत्कालिन गोंधळ आणि दुरवस्थेतून झाला आहे असं म्हणतात. पंपासरोवराचे रिनोवेशन सुरु असल्याने आत उतरायची परवानगी नव्हती. एक दोन तीर्थयात्रेची बसेस इथे नेहमी दिसतात. कर्मचारी बसच्या डिकीतून मोठी पातेली, बर्नर, पोती वगैर काढून यात्रेकरुंच्या स्वयंपाकाची थोडी मोकळी जागा बघून तयारी करत असतात. रामायणातल्या उल्लेखानुसार मातंग ऋषींची शिष्या रामभक्त शबरी पंपा सरोवरापाशी येऊन रामाचे स्मरण करत असे. तू लवकरच रामाला भेटशील, असे तिला मातंग ऋषींनी सांगितले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आश्रमात राहून रामाची वाट पाहता पाहता शबरी वृद्ध झाली. अखेर सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करत आलेल्या राम व लक्ष्मणाची पंपासरोवराजवळच्या गुहेत शबरीशी भेट झाली. ती गुहा शबरीगुहा म्हणून प्रख्यात आहे. आपल्याला माहित असलेली शबरीच्या बोरांची प्रसिद्ध कथा या गुहेतच घडल्याचे गाईड सांगतात. तिथून आत एक थंड अंधारी घळी दिसते. ती किती काळॊखी आणि खोल असेल याचा अंदाज येत नाही. अशा अनेक कपारी, घळी, गुहा हम्पीला वेढणाऱ्या शिळांमधून दडलेल्या आहेत. त्यातली एक एक सापडत जाते तसतसा मानवी इतिहासाचा एक एक पट त्याबरोबर संशोधनाअंती उलगडत जातो.
लक्ष्मी नृसिंह मंदिर | Laxmi Narsimha Temple, Hampi
मंदिराच्या वाटेवर दुतर्फा हिरवीकंच भातशेती, त्याच्यामागे आणि बांधावर डोलणाऱ्या नारळी पोफळी, त्यांच्याही मागे राखाडी बदामी शिळांच्या रांगा आणि निरभ्र आकाश. मंदिराकडे चालत जाताना मुख्य चौकात कृष्णमंदिराजवळचा कृष्णा बाजार दिसतो. हल्ली मोठ्या भाजी बाजारात गाळे असतात तशी एकमजली बिनभिंतींच्या खांबांची दगडी रचना हम्पीत अनेक ठिकाणी दिसते. प्रत्येक मंदिराजवळचे हे तत्कालिन बाजार आहेत. आता भग्नावस्थेत आहेत. नृसिंह मंदिराकडे जाताना दगडी कालव्यातून पाण्याचा प्रवाह रस्त्याच्या समांतर खळाळत जातो. लक्ष्मी नृसिंह मंदिराला वेगळे आवार नाही. गाभाऱ्यात फक्त उग्र नृसिंह आहे. मूळ मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती होती. आता तिचा हात तेवढा आहे. विध्वंसकांनी देवीलाही (स्त्री म्हणून !) सोडले नसावे.
Narsimha Temple, Hampi
शेषनागावर बसलेल्या विष्णूची ही उग्र अवतारातील हम्पीतील सर्वात मोठी म्हणजे ६.७ मीटर उंच मूर्ती आहे. मोनोलिथ म्हणजे एकाच शिळेतून घडवलेली. कृष्णदेवराय यांच्या राजवटीत १५२८ मध्ये ही मूर्ती इथे स्थापण्यात आली असे म्हटले जाते. लगतच बडावीलिंग किंवा शिवमंदिर आहे. बडवा म्हणजे ‘गरीब’ आणि लिंग म्हणजे अर्थातच ‘शिव’. याची स्थापना एका शेतकरी महिलेने केली होती असे म्हणतात. हे लिंग सुद्धा अखंड शिळेतून घडवले आहे. हे शिवलिंग अर्धवट पाण्यात बुडलेले असते. आत काळॊख असला तरी संपूर्ण मंदिर नेहमी दिवसाच्या प्रकाशाने उजळलेले असते. सूर्यास्त पाहायला इथून जवळच्या मातंग टेकडीवर जाणे हा सर्वोत्तम पर्याय पण पुन्हा एवढे चढणे शक्य नसल्यास लगतच्या, तुलनेने कमी उंचीच्या हेमकुटावरून सूर्यास्त पाह्ण्याचा आनंद अनुभवता येतो.
हेमकुटा
तुकतुकीत राखाडी दगडाची सलग चढण चढून गेल्यावर एक प्रशस्त दगडी पठार लागते. तेच हेमाकुटा. यात प्रवेश करताच ‘सासिवेकालू’ गणेशाचे दर्शन होते. सासिवेकालू याचा अर्थ मोहरीचे दाणे. हा एक विशाल ८-फूट उंच, अखंड गणेश आहे, त्याच्या पोटाभोवती साप आहे. गणपतीला अन्न खूप आवडते, भोजनानंतर एके दिवशी त्याचे पोट फुटले. ते आवळून ठेवण्यासाठी त्यानी पोटाभोवती साप बांधला अशी आख्यायिका आहे. गणेशावर मोहरीच्या दाण्यांसारखे बारीक नक्षीकाम खूप सुंदर केले आहे. हेमकुटावर बाकी बहुतेक सगळी शिवमंदिरं आहेत. पम्पादेवीने इथे शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या केल्याचा उल्लेख वर आला आहेच. पठाराच्या टोकाशी गेल्यावर लक्षात येते की तिथून खाली जाणारा रस्ता थेट विरुपाक्ष मंदिराजवळ पोचतो. इथे अनेक लोक पक्षीनिरीक्षणाला आणि विशेषत: सूर्यास्त पाहायला येतात. मावळतीच्या प्रकाशात हेमकुटा चढताना मध्ये थांबून विस्तीर्ण दगडावर पर्यटक पहुडलेले दिसतात. संध्याकाळचा विरुपाक्ष मंदिराकडे वाहणारा गारसर वारा, निवलेल्या दगडाचा थेट आणि उबदार स्पर्श, थोडेसे ढगाळ आकाश, एकूणच निसर्गाची शांत सोबत प्रत्यक्षच अनुभवायला हवी. अजून वरच्या दगडी पठारावर गेल्यावर निवांत सूर्यास्त बघता येतो. निर्विचार मन, स्वच्छ शुद्ध नितळ शांतता, समोर ढगाच्या आत बाहेर करत अस्ताला जाणारा तेजोनिधी. मध्ये कुणाचाही अडसर नाही अगदी स्वसंवादाचा सुद्धा. शक्य असतं तर रात्री तिथेच मुक्काम करावा इतकं बरं वाटतं पण सूर्य अस्तंगत होतो, माकडांचा उपद्रव सुरु होतो तेव्हा नाईलाजाने निघावं लागतं.
हम्पी बघायला कितीही वेळ असला तरी अपुरा आहे. ‘पैसे है तो तिरुपती जाना पैर है तो हम्पी’ असे हम्पीबद्दल इथले गाईड का म्हणतात त्याची प्रचिती भटकंती संपत आल्यावर येते. वर उल्लेख केलेल्या ख्यातनाम स्थळांशिवाय हजारा राम मंदिर, सरस्वती मंदिर, वीरभद्र मंदिर, चंद्रमौलीश्वर मंदिर, अच्युतराय मंदिर अशी अनेक मंदिरं इथे आहेत पण हातातला वेळ संपतो तेव्हा काही ना काही सोडून द्यावं लागतं. मुळात हम्पी हा बाहेरून आतला प्रवास आहे. भारतीयत्वाशी नाळ जुळणे म्हणजे काय याचे उत्तर अशा ठिकाणी सापडते. अशा अनोख्या अनुभवांचं संचित मनाच्या तळाशी साठत जातं. आपले रोजचे आयुष्य सुकर करायला असं इंधन पुढचे कितीतरी दिवस पुरतं. झाडांच्या हिरवाईनी आणि समुद्राच्या निळाईनी मोहिनी घातल्याचा अनुभव बहुतेकांनी घेतलेला असतो परंतु पाषाणही गारुड करू शकतात हा अनुभव हम्पी देतं. जगाला देण्यासारखं आणि दाखवण्यासारखं आपल्या देशाकडे इतकं काही आहे याचं अनामिक समाधान वाटतं. प्रत्येक उत्पत्ती आणि निर्मितीला लयाचा शाप असतो. त्याआधी आपल्या माणसांना आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हा अनुभव घेता यावा. काही शतकांनी हम्पीतली जागतिक वारसा म्हणून जतन केली गेलेली स्थळं राहतील न राहतील. मानवाच्या कलाकर्तृत्वाची पताका फडकत राहील न राहील, पाषाण मात्र चिरंतन सत्यासारखे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कायम राहतील.
Tungabhadra River, Hampi
कसे पोहोचाल | How to plan a trip to Hampi?
हम्पी हे कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यात (पूर्वीच्या बेल्लारी जिल्ह्यात) तुंगभद्रा नदीकाठी वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. नागपूरहून हम्पीला जाण्यासाठी रेल्वे (Train), विमान (Flight) आणि रस्ता मार्ग (Road) हे तीन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत.
रेल्वे: हम्पीचे सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन हॉस्पेट जंक्शन (Hosapete Junction - HPT) असून ते हम्पीपासून साधारण १३ किमी अंतरावर आहे. नागपूरहून हॉस्पेटसाठी थेट ट्रेन उपलब्ध आहे. या प्रवासाला साधारण १८ ते साडे अठरा तास लागतात. हॉस्पेट जंक्शनला उतरल्यानंतर तुम्ही स्थानिक बस किंवा ऑटो-रिक्षाने सहज हम्पीला पोहोचू शकता.
विमान: नागपूरहून हुबळी (Hubli - HBX) विमानतळासाठी कनेक्टिंग किंवा थेट विमाने उपलब्ध आहेत. हुबळीवरून हम्पी साधारण १६६ किमी अंतरावर आहे. तुम्ही टॅक्सी किंवा बसने ३-४ तासांत हम्पीला पोहोचू शकता. नागपूरवरून विमानाने बेंगळुरू (BLR) किंवा हैदराबाद (HYD) येथे जाऊन तिथून जिंदाल विजयनगर विमानतळ (Vidyanagar - VDY) साठी कनेक्टिंग फ्लाईट घेऊ शकता. ते हम्पीपासून अवघ्या ३५ किमी अंतरावर आहे.
रस्ता मार्ग: नागपूर ते हम्पी हे अंतर रस्ता मार्गे साधारण ८५० ते ९०० किमी आहे. तुम्ही NH 361 आणि NH 50 महामार्गावरून हैदराबादमार्गे साधारण १६ ते १७ तासांत हा प्रवास करू शकता.
नागपूर ते हम्पी अशी थेट बस सेवा नाही. परंतु, तुम्ही नागपूरहून प्रथम हैदराबादसाठी बस पकडू शकता आणि तिथून हम्पी किंवा हॉस्पेटसाठी दुसरी कनेक्टिंग बस घेऊ शकता. या प्रवासाला साधारण १९ ते २० तास लागतात.
केव्हा जायचे
हम्पीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा, म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च हा महिना होय. या काळात येथील हवामान अतिशय आल्हाददायक आणि फिरण्यासाठी उत्तम असते.


amazing
ReplyDeletebeautiful place hampi
ReplyDeleteएकदातरी हम्पी बघितलं पाहिजे. मॅडम खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteVery good article madam.keep writing
ReplyDelete