भन्नाट: फर्टिलिटी टुरिझमचा अब्जावधींचा प्रवास | Fertility Tourism | International Tourism
उत्तर सायप्रसमध्ये आंतरराष्ट्रीय फर्टिलिटी टुरिझममधील सर्वात मोठा घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे अनेक पालकांचे धाबे दणाणले आहे. लोकांनी अपत्यप्राप्तीसाठी जे डोनर निवडले होते त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे डीएनए मुलांमध्ये आढळून आल्याने पालकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. ब्रिटनमधून मेडिकल टुरिझमअंतर्गत अनेक पालक उत्तर सायप्रसमध्ये आयव्हीएफ उपचारासाठी गेले होते. त्यांनी पसंत केलेल्याच स्पर्म आणि एग डोनरचाच वापर केल्याचा दावा क्लिनिककडून करण्यात आला होता, मात्र, मुलांच्या डीएनए चाचण्यांनंतर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. पालकांनी फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियासारख्या पश्चिम युरोपीय देशांमधील निरोगी डोनर निवडले होते. डोनरची मेडिकल हिस्ट्री, रूप-रंग, शिक्षण आणि छंद यांचा विचार करून त्यांची निवड केली होती, पण या मुलांचे डीएनए तुर्की आणि अरब देशांतील लोकांच्या डीएनएशी जुळत असल्याचे आढळून आले आहे.
Boom in Fertility Tourism
उत्तर सायप्रस हा तुर्कीच्या नियंत्रणाखालील भाग आहे. तिथल्या कायद्यांमधील त्रुटी आणि तुलनेने कमी खर्चामुळे फर्टिलिटी टुरिझमला येथे मोठी चालना मिळाली आहे. दरवर्षी सुमारे आठ हजार परदेशी जोडपी आयव्हीएफ उपचारासाठी इथे येतात. गेल्या दहा वर्षांत तब्बल ७० हजार परदेशी नागरिकांनी येथील क्लिनिकमध्ये आयव्हीएफ उपचार घेतले आहेत. यामध्ये ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्समधील नागरिकांची संख्या मोठी आहे. भारतात सुद्धा फर्टिलिटी टुरिझमसाठी पसंतीचा देश आहे. या घोटाळ्याच्या अनुषंगाने फर्टिलिटी टुरिझम म्हणजे नेमके आहे तरी काय? हे जाणून घ्यावे लागेल.
फर्टिलिटी टुरिझम म्हणजे नेमके काय? | What is Fertility Tourism
मूल हवंय... पण आपल्या देशात उपचार मिळत नाहीत, खर्च परवडत नाही किंवा कायदे आडवे येतात... मग दुसऱ्या देशात जाण्याचा मार्ग स्वीकारला जातो.आज हजारो नव्हे, तर जगभरातील मोठ्या संख्येने जोडपी अपत्यप्राप्तीसाठी देशाच्या सीमा ओलांडत आहेत. आयव्हीएफ, आयसीएसआय, एग डोनेशन, स्पर्म डोनेशन, एम्ब्रियो डोनेशन, सरोगसी आणि प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंगसारख्या उपचारांसाठी होणाऱ्या या प्रवासाला Cross-Border Reproductive Care (CBRC) किंवा प्रचलित भाषेत Fertility Tourism म्हटले जाते. मात्र, या वाढत्या उद्योगाची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. उपचारासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या जोडप्यांकडे स्वतः च्या देशापेक्षा वेगळे कायदे, वेगवेगळे वैद्यकीय निकष आणि कधी-कधी अपुरी नियामक यंत्रणा असते. अशा परिस्थितीत रुग्णाचा विश्वास, डोनरची ओळख आणि मुलाच्या जैविक वंशावळीशी संबंधित माहिती यांचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो.उत्तर सायप्रसमधील कथित डोनर-डीएनए गैरप्रकाराची चर्चा याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते.
फर्टिलिटी टुरिझम ज्या व्यापक IVF/ART उद्योगाचा भाग आहे, त्याची वाढ स्पष्टपणे दिसते. युरोपमध्येच २०१० मध्ये सुमारे ५.५० लाख ART उपचार चक्रे नोंदली गेली होती. २०१९ पर्यंत हा आकडा वाढून १०.७८ लाख चक्रांवर पोहोचला. म्हणजे जवळपास दुप्पट वाढ. कोविड काळात २०२० मध्ये उपचारसंख्या घटून ९.२३ लाख झाली. त्यानंतर २०२१ मध्ये युरोपमध्ये पुन्हा सुमारे ११.०३ लाख ART cycles नोंदवली गेली.म्हणजेच गेल्या दशकात प्रजनन तंत्रज्ञानावरील अवलंबित्व झपाट्याने वाढलं आहे.
जगभरात वर्षाला किती IVF उपचार होतात?
उपलब्ध आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक ART cycles नोंदवले जातात. मात्र, अनेक उपचारांची नोंद होत नसल्यामुळे प्रत्यक्ष संख्या सुमारे ४० लाख cycles प्रति वर्ष असू शकते, असा ESHRE चा अंदाज आहे. यामधून सुमारे १० लाख बाळांचा जन्म होतो, असा अंदाजही दिला जातो. चीनमध्येच वर्षाला सुमारे १० लाख ART cycles होत असल्याचा ICMART-आधारित अंदाज आहे. अमेरिकेतही परदेशी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे ताज्या संशोधनातून दिसते. २०१४ ते २०२२ दरम्यान अमेरिकेत २२.७५ लाख ART cycles चा अभ्यास करण्यात आला; त्यापैकी ५९,२४६ cycles म्हणजे २.६% cycles परदेशी रहिवाशांसाठी होते. हे रुग्ण तब्बल १८२ देशांतून आले होते.
IVF Treatment Financial Guide
जोडपी परदेशात का जातात?
फर्टिलिटी टुरिझमच्या मागे फक्त कमी खर्च हे एकमेव कारण नाही. वैद्यकीय अभ्यासांमध्ये मुख्यतः चार मोठी कारणे समोर आली आहेत. कायदेशीर मर्यादा, खर्च, उपचारांची उपलब्धता/गुणवत्ता आणि गोपनीयता किंवा सांस्कृतिक सोय.
१. कायदे: काही देशांमध्ये कायदे विशिष्ट प्रकारचे fertility treatment प्रतिबंधित किंवा कठोर नियमांच्या अधीन असतात. उदाहरणार्थ, डोनर गॅमेट्स, एग डोनेशन, सरोगसी किंवा विशिष्ट वयातील महिलांसाठी उपचार यावर वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे नियम आहेत. यामुळे रुग्ण कायदेशीर अडथळे टाळण्यासाठी दुसऱ्या देशाचा पर्याय निवडतात. युरोपातील एका मोठ्या अभ्यासात इटली, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे आणि स्वीडनमधून परदेशात जाणाऱ्या रुग्णांसाठी कायदेशीर कारणे महत्त्वाची होती, असे आढळले होते.
२. खर्च कमी असणे: IVF ही महागडी उपचारपद्धती आहे.अनेक विकसित देशांच्या तुलनेत काही देशांमध्ये IVF, डोनर एग किंवा इतर assisted reproductive treatments तुलनेने कमी खर्चात उपलब्ध होतात.त्यामुळे उपचाराचा खर्च, प्रवास आणि निवास यांचा एकत्रित खर्च करूनही काही रुग्णांना परदेशातील उपचार आर्थिकदृष्ट्या आकर्षक वाटतात.फर्टिलिटी टुरिझमच्या वाढीमागे शेजारील किंवा इतर देशांमध्ये कमी उपचारखर्च हा महत्त्वाचा घटक असल्याचे बाजार अभ्यासांमध्येही नमूद करण्यात आले आहे.
३. उपचारांची उपलब्धता आणि यशाचे प्रमाण: काही देशांमध्ये IVF clinics ची संख्या मोठी आहे आणि काही विशिष्ट उपचारांमध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली आहे. स्पेन, अमेरिका, ब्रिटन, झेक रिपब्लिक, भारत, तुर्की यांसारख्या देशांमध्ये विविध प्रकारच्या assisted reproductive technologies उपलब्ध आहेत.त्यामुळे “आपल्या देशात उपचार मिळत नाही” किंवा “इथे waiting list खूप मोठी आहे” या कारणांनीही रुग्ण परदेशात जातात.
४. डोनरची उपलब्धता: हा फर्टिलिटी टुरिझममधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्या देशांमध्ये एग किंवा स्पर्म डोनरची उपलब्धता कमी आहे किंवा डोनर निवडीवर कडक नियम आहेत, तिथून रुग्ण अशा देशांकडे वळतात जिथे डोनर प्रोग्राम अधिक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.आणि याच ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो; डोनरची माहिती खरोखरच खरी आहे का?
फर्टिलिटी टुरिझमचा बाजार किती मोठा? | How big is the Fertility Tourism Industry?
इथे पुन्हा आकडेवारीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. विविध market-research कंपन्या fertility tourism च्या बाजाराचे वेगवेगळे अंदाज देतात. उदाहरणार्थ, एका २०२६ च्या बाजार अभ्यासानुसार २०२५ मध्ये जागतिक fertility tourism market सुमारे १.७१ अब्ज डॉलरचे होते आणि २०३५ पर्यंत तो १९.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजार अभ्यासात २०२५ चा बाजार सुमारे १.१६ अब्ज डॉलर असल्याचा आणि २०३४ पर्यंत तो १३.५८ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण दोन्ही अंदाज एक गोष्ट सांगतात, हा उद्योग पुढील दशकात वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.
कोणते देश ठरले आहेत Fertility Tourism चे हब?
जगभरातील रुग्णांच्या प्रवाहात काही देश विशेष महत्त्वाचे ठरले आहेत.
स्पेन: एग डोनेशन आणि IVF साठी युरोपमधील महत्त्वाचे destination.
झेक रिपब्लिक: तुलनेने उपलब्ध उपचार, donor programs आणि cross-border patients यामुळे युरोपमध्ये लोकप्रिय.
अमेरिका: अत्याधुनिक fertility treatment, donor eggs, genetic testing आणि gestational surrogacyसारख्या उपचारांसाठी मोठे destination.
तुर्की: तुलनेने कमी खर्च आणि मोठ्या वैद्यकीय पर्यटन उद्योगामुळे reproductive care च्या क्षेत्रातही महत्त्वाचा देश.
भारत: कमी खर्च, मोठ्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमुळे IVF आणि fertility treatment साठी आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करणारा देश.
सायप्रसचा उत्तरी भाग: तुलनेने सुलभ नियम, विविध donor options आणि आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी fertility clinics यामुळे उत्तर सायप्रसही या बाजारात चर्चेत राहिला आहे.
फर्टिलिटी टुरिझम : आशेचा उद्योग की नियमनाच्या पलीकडचे जग?
आज जगभरात वर्षाला लाखो ART cycles होत आहेत. युरोपमध्ये एका दशकात उपचारचक्रांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. अमेरिकेत परदेशी रुग्णांचा ART मध्ये लक्षणीय वाटा आहे. जागतिक fertility tourism market देखील पुढील काही वर्षांत वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच फर्टिलिटी टुरिझम आता केवळ वैद्यकीय उपचार नाही.तो एक जागतिक वैद्यकीय उद्योग बनला आहे. पण या उद्योगाच्या केंद्रस्थानी पैसा, पर्यटन किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान नसून एक गोष्ट आहे...पालक होण्याची आशा.आणि जिथे एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी भावनिक इच्छा असते, तिथे फसवणुकीची शक्यता सर्वाधिक धोकादायक ठरते. म्हणूनच भविष्यात फर्टिलिटी टुरिझम वाढणार असेल, तर त्याच्यासोबत जागतिक नियमन, donor tracking, DNA verification, informed consent आणि मुलांच्या genetic identity चं संरक्षण यांनाही तितकेच महत्त्व द्यावे लागेल.कारण IVF मध्ये चुकीचा embryo बदलला, चुकीचा donor वापरला किंवा चुकीची माहिती दिली तर त्याची किंमत केवळ पैशांत मोजता येत नाही.त्या चुकीची किंमत एखाद्या मुलाला आयुष्यभर मोजावी लागू शकते.
रॅचेलची कहाणी: १३ वर्षांनी उलगडलं सत्य
या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक कहाणी ब्रिटनमधील रॅचेलची आहे. २०१२ मध्ये तिने उत्तर सायप्रसमधील क्लिनिकमध्ये IVF उपचार घेतले. तिने डेन्मार्कमधील एका sperm donor ची निवड केली होती. डोनरची माहिती, वैद्यकीय पार्श्वभूमी आणि भविष्यात मुलाला त्याच्या जैविक वडिलांविषयी माहिती मिळण्याच्या शक्यतेचा विचार करून ही निवड करण्यात आली होती.मात्र, रॅचेलला उपचारानंतर क्लिनिककडून अपेक्षित मेडिकल कागदपत्रे मिळाली नाहीत.वर्षं गेली. मुलगा मोठा झाला.आणि अखेर DNA test करण्यात आली. निकालाने धक्का बसला. मुलगा रॅचेलचाच जैविक मुलगा होता; पण तिने निवडलेला डोनर त्याचा जैविक पिता नव्हता. रॅचेलसाठी हा फक्त आर्थिक गैरप्रकार नव्हता. कारण तिच्या मुलाने भविष्यात आपल्या biological father ला शोधण्याचा प्रयत्न केला तर? त्याच्याकडे असलेली donor ची माहितीच चुकीची असेल तर? त्याची स्वतः ची ओळख त्याच्यापासून लपवली गेली असेल तर? हा प्रश्न या प्रकरणाला वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो.
फर्टिलिटी टुरिझमची पुढची लढाई कायद्याची नाही, विश्वासाची
आज जगभरातील जोडपी मूल मिळवण्यासाठी सीमा ओलांडत आहेत. कुठे खर्च कमी आहे. कुठे उपचार लवकर मिळतात. कुठे कायदे अधिक उदार आहेत. कुठे donor उपलब्ध आहेत.आणि कुठे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक गोष्ट आहे विश्वास.पालक डॉक्टरांवर विश्वास ठेवतात.डॉक्टर क्लिनिकच्या laboratory वर विश्वास ठेवतात. रुग्ण donor database वर विश्वास ठेवतो.आणि अखेरीस एक मूल आपल्या जन्माच्या कथेबाबत त्या सगळ्या व्यवस्थेवर विश्वास ठेवत मोठे होते.हा विश्वासच जर चुकीच्या माहितीवर उभा असेल तर? मग IVF मधून जन्मलेले मूल केवळ एका कुटुंबाचा भाग राहत नाही; ते एका चुकीच्या नोंदीचे आयुष्यभराचे परिणाम भोगणारे व्यक्तिमत्त्व बनते.
शेवटचा प्रश्न : मूल मिळवणे महत्त्वाचे की सत्य?
अपत्यप्राप्तीची इच्छा मानवी आयुष्यातील सर्वात नैसर्गिक इच्छांपैकी एक आहे. त्यासाठी आधुनिक विज्ञानाने अभूतपूर्व शक्यता निर्माण केल्या आहेत. IVF मुळे लाखो कुटुंबांना पालक होण्याची संधी मिळाली आहे.पण तंत्रज्ञान जितके पुढे जातेय, तितकेच त्याला कायदा, नैतिकता आणि पारदर्शकता यांची साथ मिळणे गरजेचे आहे. उत्तर सायप्रस प्रकरणाने एक कटू प्रश्न समोर आणला आहे. पालकांना मूल मिळाले, पण त्या मुलाला त्याचे खरे जैविक सत्य मिळाले नाही तर त्या उपचाराला यश म्हणायचे तरी कसे?
फर्टिलिटी टुरिझम पुढील दशकात आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाजाराचे विविध अंदाज त्याकडे निर्देश करतात आणि ART उपचारांची जागतिक मागणी आधीच मोठी आहे. म्हणून आता गरज फक्त अधिक IVF क्लिनिक्सची नाही.गरज आहे ती अधिक पारदर्शकतेची.अधिक कडक donor tracking ची. स्वतंत्र DNA verification ची. आंतरराष्ट्रीय नियमनाची. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत त्या मुलाच्या “सत्य” जन्मकथेचे संरक्षण करण्याची.


interesting
ReplyDeleteNew topic
ReplyDeleteऐकावे ते नवलच
ReplyDelete