रायझिंग ड्रॅगन: व्हिएतनाममधील अविस्मरणीय प्रवास अनुभव | Travel Experience in Vietnam in Marathi Part 1
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आमंत्रणावरुन ‘लिडरशीप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ कम्युनिकेशन’या विषयावरील कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व्हिएतनामला रवाना होत असताना मी एकटीच होती. या कार्यशाळेत आणखी कोणी भारतीय सहभागी होणार आहे किंवा नाही याची कुठलीही कल्पना नव्हती. पूर्णपणे अनोळखी अशा देशात एकटे जायचेय. त्यामुळे एखादी तरी भारतीय व्यक्ती तेथे आपल्याला भेटावी असे निघताना मनापासून वाटले होते. पण तिथे पोहोचल्यानंतर मनातील ही भीती किंवा रुखरुख केव्हाच संपली होती.
‘सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक’ असे समर्थांनी म्हटले होते. व्हिएतनामच्या या भेटीतही असे अनेक लोक भेटले. त्यांची आपुलकी, जिव्हाळा अनुभवला. तेव्हा हे जग फार छोटे आहे, यावर विश्वास बसला.
थुई, पास्कल, ओहाय, हुआंग, थाँग, पॉल ही नावं तर मी यापूर्वी कधी ऐकलीही नव्हती. कोण ही मंडळी? ऑस्ट्रेलियातून व्हिएतनाममध्ये फिरायला आलेल्या सॅन्डिया, गेली, लिंडा या तिघी चुलत बहिणींशी माझा काय संबंध होता? पण हनोईत दोन दिवस पर्यटन स्थळे बघत असताना आम्ही सर्व जणुकाही एकाच कुटुंबातील आहोत असाच भास होत होता. संस्कृती, धर्म, भाषा, देश वेगळा असला तरी माणूस आणि त्यातील माणुसकी बदलत नसते. याची सुखद अनुभूती या दौऱ्यात आली. देशोदेशींच्या अनोळखी लोकांना भेटताना, त्यांच्यात मिसळून राहताना मिळणारा आनंद आगळावेगळा होता. व्हिएतनाममधील वास्तव्यात स्थानिक लोकांसोबत हितगुज करण्याची संधी मिळालीच परंतु येथे येणाऱ्या अनेक विदेशी पर्यटकांसोबतची संवाद साधायला मिळाला.
व्हिएतनाम - भाग एक | Travel in Vietnam Part 1
‘माझ्या देशात सुगंधाच्या नद्या वाहात होत्या.येथील भव्य पर्वतरांजींवरुन उगवणारा चंद्र शांत अमृताची बरसात करीत असे. येथील सरोवराची गूढता कवी व साहित्यिकांची प्रतिभा जागवत असे. ही नदी,हे पर्वत आजही हजारो वर्षांनंतर जसे होते तसेच आहेत. आपली सुंदर भूमी भरजरी वस्त्रासारखी वैभवाची साक्ष देतेय. मग चिंता कसली? याच क्षणापासून आपण आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न साकार करु या!’
Vietnam
अनेक वर्षांपूर्वी एका व्हिएतनामी कवीने त्याच्या कवितेत बघितलेले हे स्वप्न साकारल्याचा आनंद या देशातील जनता साजरा करीत होती. व्हिएतनामचा निरोप घेतला त्या दिवशी या देशाची राजधानी हनोई रोषणाईने झगमगत होती. चौकाचौकात राजधानीला सलाम करणारे घोषवाक्य दृष्टीस पडत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे जमा झाले होते ते आपल्या देशाच्या राजधानीचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी. १० दिवसांच्या थांगलाँग हनोई फेस्टिव्हलला प्रारंभ झाला होता. न्ही, थुआंग, वान, फु सर्वच जण मला आणखी दहा दिवस येथे थांबण्याचा आग्रह करीत होते. या उत्सवात मी सहभागी व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
१०१० मध्ये किंग ली थाई तो यांनी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे हलविली आणि तिला थांगलाँग असे नाव दिले. या शहरातून एक मोठी नदी वाहते. ‘लाल नदी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नदीवरुन एका ड्रॅगनला झेप घेताना बघितल्याचा दावा त्यांनी केला.त्यामुळेच हनोईला थांगलाँग हे नाव देण्यात आले. थांगलाँगचा अर्थ झेपावणारा ड्रॅगन असा होतो. व्हिएतनामी लोकांची चिकाटी, जिद्द आणि संघर्षाच्या अनेक कथा यापूर्वी ऐकल्या होत्या. परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव थांगलाँग महोत्सवासाठी सुरु असलेली तयारी, नागरिकांचा उत्साह आणि देशप्रेम बघून येत होता.
हो-ची-मिन्ह भवन, म्युझिअम ऑफ वॉर, म्युझिअम ऑफ रिव्होल्युशन; व्हिएतनामी जनतेच्या स्वाभिमानाशी, त्यांच्या अस्मितेशी जुळलेल्या या सर्वच वास्तु विदेशी शक्तींच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची, सोसलेल्या यातनांची कहाणीच सांगत होत्या.
परतीच्या प्रवासासाठी आमच्या विमानाने हनोई येथून बँकॉकसाठी ‘टेक ऑफ’ घेताच माझ्याही मनात मागील १२ दिवसांच्या कालावधीत व्हिएतनाममधील वास्तव्यात आलेले अनुभव आणि आठवणींनी टेक ऑफ घेतला होता. व्हिएतनाम साऱ्या जगाला परिचित आहे तो अमेरिकेसोबतच्या युद्धामुळे. परंतु अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीसोबत प्रदीर्घ संघर्ष करणाऱ्या व्हिएतनामने गेल्या काही वर्षात वाखाणण्याजोगी प्रगती केली आहे. म्हणूनच येथील जनता आपल्या देशाचा उल्लेख आता रायझिंग ड्रॅगन असा करायला लागली आहे. विशेषत: पर्यटनाच्या क्षेत्रात हा देश समोर येत आहे. फ्रांस, स्वित्झर्लड, अमेरिका,ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून मोठ्या संख्येत पर्यटक येथे येत आहेत. व्हिएतनामबद्दल त्यांना असलेले आकर्षण त्यांच्याशी बोलताना स्पष्ट जाणवत होते. परंतु या उगवत्या ड्रॅगनचा भूतकाळ किती संघर्षमय राहिला याची प्रचिती येथील विविध वस्तुसंग्रहालये बघितल्यानंतर आली. आमचा गाईड डाँग मोठ्या स्वाभिमानाने यासंदर्भात लहानसहान माहिती देत होता.
हो-ची-मिन्ह आजही जनतेच्या हृदयात.
महान नेते हो-ची-मिन्ह
ज्यांनी आपल्या रक्ताने आधुनिक व्हिएतनामचे भविष्य लिहिले ते महान नेते हो-ची-मिन्ह आजही येथील जनतेच्या हृदयात वसले आहेत. एका गरीब विणकराच्या घरात जन्मलेल्या या आयुर्वेद वैद्याची ही रोमहर्षक जीवनगाथा खरोखरच प्रेरणादायी आणि अंगावर काटा उभा करणारी होती. या देशात फिरत असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हो-ची-मिन्ह हे नाव हमखास ऐकायला मिळते. आपल्या या लाडक्या नेत्याचे पार्थिव अजूनही या लोकांनी जपून ठेवले आहे. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने हे पार्थिव ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु लोकांनी ते एका गुफेत लपवून ठेवले होते. त्यामुळे ते अमेरिकेच्या हाती लागले नव्हते. हे पार्थिव आजही हो-ची-मिन्ह भवनात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मध्य व्हिएतनाम प्रांतात १८९० साली हो-ची-मिन्ह यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव ‘नगुयेन वान थान्ह’ होते. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी व्हिएतनामवर राज्य करीत असलेल्या फ्रांस राजवटीविरुद्ध लढा उभारला होता. यासाठी त्यांनी व्हिएतनामी जनतेच्या मदतीने आपले सैन्य उभारले. ‘पब्लिक मिलिटरी’ ही संकल्पना आजही तेथे अस्तित्वात आहे. अनेक सामान्य लोक स्वेच्छेने अडीच वर्षे लष्करात प्रशिक्षण घेतात. १९४६ साली फ्रांसविरुद्धच्या युद्धास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. हे युद्ध ‘व्हिएतमिन्ह’ या नावाने इतिहासात ओळखले जाते. त्यावेळी हो-ची-मिन्ह यांच्या नेतृत्वातील जनतेने तब्बल आठ वर्ष फ्रांस राजवटीशी झुंज दिली. अखेर १९५४ साली फ्रांसला या लोकलढ्यापुढे गुडघे टेकावे लागले. दोन तुकड्यात विभागलेल्या व्हिएतनामला एकसंघ करण्यासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु १९६९ साली फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा व्हिएतनामच्या इतिहासात एक नवा दु:खद अध्याय सुरु झाला होता. अमेरिका दक्षिण व्हिएतनामच्या मदतीसाठी पुढे आला. अमेरिकेसोबतचे हे युद्ध व्हिएतनाम युद्ध म्हणून जगात ओळखले जात असले तरी येथील जनता त्याला अमेरिकेविरुद्धचे युद्ध असेच संबोधते. ते १९५७ ला सुरु होऊन १९७५ ला संपले. अमेरिकेकडून व्हिएतनामसोबत संबंध सुधारण्यासाठी आज सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु येथील लोकांशी याविषयी बोलत असताना अमेरिकेबद्दल त्यांच्या मनात असलेला रोष स्पष्ट जाणवतो. अमेरिका आणि चीन हे आपले नंबर एकचे शत्रु आहेत असे हे लोक आजही मानतात. व्हिएतनाम युद्धाचे अनेक टप्पे होते. अखेर ३० एप्रिल १९७५ला दक्षिण व्हिएतनामने आत्मसमर्पण केले. आणि उत्तर व्हिएतनामचे लष्कर दक्षिण व्हिएतनामची राजधानी सैगोन येथे दाखल झाले. आज या सैगोन शहराचे नामकरण हो-ची-मिन्ह सिटी असे करण्यात आले आहे. येथे येणारे विदेशी पर्यटक या हो-ची-मिन्ह सिटीला हमखास भेट देतात. असे सांगितले जाते की या विनाशकाळात लष्करी कारवाईत १३लाख लोक मृत्युमुखी पडले. संपूर्ण व्हिएतनाम उद्ध्वस्त झाला होता.
हे दोन युद्ध जगाला परिचित असले तरी व्हिएतनामी जनतेसाठी विदेशी हल्ले काही नवीन नव्हते. अनेक शतकांपूर्वीही या देशावर असे हल्ले झाले होते आणि व्हिएतनामी जनतेने चिव्वट झुंज देत सर्वशक्तीनिशी हे हल्ले हाणून पाडले होते.
देशाच्या संरक्षणासाठी लढवय्यांसारखी उभी असलेली बेटं
‘का दाओ व्हिन हा लाँग बे ’ संघर्षाचा साक्षीदार
अथांग समुद्र, देशाच्या संरक्षणासाठी लढवय्यांसारखी उभी असलेली बेटं आणि घनदाट वृक्षांनी समृद्ध ‘का दाओ व्हिन हा लाँग बे ’या संघर्षाचा साक्षीदार आहे. ‘लिडरशीप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ कम्युनिकेशन’ या विषयावरील आमची कार्यशाळा या हा लाँग उपसागराच्या किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्येच होती. त्यामुळे व्हिएतनामच्या संघर्षात या परिसराचे योगदान जाणून घेण्याची संधी मिळाली. चीनी ड्रॅगनचा येथेही प्रचंड प्रभाव आहे. ड्रॅगन म्हणजे येथील लोकांचा देव. समुद्रातून जन्माला आलेला हा ड्रॅगन आणि सभोवतालची सुंदर बेटं (म्हणजे देवता) हेच आपले पूर्वज असल्याची मान्यता येथे आहे. ड्रॅगन म्हणजे ‘लॅक लाँग क्वान’ आणि ही देवता म्हणजे ‘अु को’ विदेशी हल्ले झाले त्यावेळी या उपसागर क्षेत्रातील लोकांच्या मदतीला ही ड्रॅगन देवता आणि तिच्या मुलांना पाठविण्यात आले होते. त्यांनी आपल्या मुखातून मोत्यांचा वर्षाव केला. त्या मोत्यांमधूनच येथील बेटांची निर्मिती झाली आणि ही बेटं एखाद्या लढवय्यासारखी देशाच्या संरक्षणासाठी उभी राहिली,असा लोकांचा विश्वास आहे. उपसागरात एकूण १९६९ बेटं आहेत. या बेटांचा आकारही आगळावेगळाच आहे. उपसागरातील जहाजावर एका रात्रीच्या वास्तव्यात ही बेटं जवळून न्याहाळताना गूढ वाटली. या बेटांमध्येच ३० मोठमोठ्या गुफा आहेत. या बेटांमध्ये पाण्यातूनच रस्ते आहेत. या नैसर्गिक पुलांखालून नावेतून जाताना मोठी गंमत वाटते. खरच निसर्गाने व्हिएतनामला भरभरुन दिलयं. नवख्या व्यक्तीसाठी हा सगळा भुलभलैय्या असला तरी या उपसागरात वसलेल्या फिशिंग व्हिलेजमधील लोकांना मात्र ही बेटं संरक्षण वाटतात.
फिशिंग व्हिलेज
फिशिंग व्हिलेज | Fishing Village in Vietnam in Marathi
न्यूयाँग थी किमकडून हा लाँगबद्दल बरीच रोचक आणि रोमांचक माहिती मिळाली होती. आणि उपसागरात तरंगणारी ही छोटीछोटी खेडी प्रत्यक्षात बघितल्यानंतर आश्चर्य वाटले. या फिशिंग व्हिलेजमध्ये हजारावर लोक राहतात. आम्ही भेट दिली ते खेडे 300 लोकवस्तीचे होते. येथे छोट्याछोट्या नावा आणि तराफ्यांवर लोकांनी संसार थाटले आहेत. शाळा आणि दवाखाना सुद्धा नावेतच आहे.
उपसागरालगतच्या या शहरामध्ये व्हिएतनामची प्राचीन संस्कृती बघायला मिळते. पुरातत्व विभागाला येथे सॉय न्ह्यु संस्कृती (ख्रिस्तपूर्व ६०००-५०००), कायबेओ (ख्रिस्तपूर्व ५०००-३०००) आणि हा लाँग संस्कृतीचे अनेक अवशेष सापडले आहेत. या क्षेत्राचे प्राचीन महत्व लक्षात घेऊनच १९९४ साली हा लाँग उपसागराचा जागतिक वारसा क्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात आला.
आपल्या २७०० वर्षांच्या इतिहासात व्हिएतनामला अनेकदा संघर्ष करावा लागला. एकोणवीसाव्या शतकापर्यत येथील लोकांनी चीनच्या सांस्कृतिक, राजकीय आणि लष्करी प्रभावाचा मोठ्या चिकाटीने सामना केला.एकोणवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांना फ्रेंच वसाहतवादाशी झगडावे लागले. १९५४ च्या बहुचर्चित दिआन बे फू युद्धानंतर स्वातंत्र्याची पहाट अनुभवता येईल,अशी आशा व्हिएतनामी लोकांना होती. परंतु हे युद्ध १९७५ पर्यत चालले. आजही काही विदेशी शक्ती येथे वेगळ्या मार्गाने आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा कुठल्याही प्रभावाला बळी न पडता आपल्या देशाचा विकास साधण्याकरिता येथील जनता एकजुटीने कठोर परिश्रम घेत आहे. केवळ अमेरिकेला पराभूत करणारा देश अशीच ओळख न राहता विकासाच्या क्षेत्रात आगेकूच करणारा देश म्हणून जगभरात नाव कमविण्याची व्हिएतनामी लोकांची इच्छा आहे.
मुख्य संपादक
What’s Up मराठी
संपर्क
कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

Comments
Post a Comment
🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.