आदि कैलास यात्रा: श्रद्धा, साहस आणि निसर्गाचा अद्भुत संगम | Author: Dr. Prachi Deshpande | Mansarovar Yatra | Incredible India
कैलास मानस सरोवर यात्रेला भारतातूनच जाण्यासाठी हिमालयातून रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले तेंव्हापासूनच या रस्त्याने जावे असा विचार सुरू झाला. कोविड नंतरच्या काळात मात्र या रस्त्याचे बरेचसे बांधकाम काही पक्क्या तर काही कच्चा स्वरुपात झाले होते; आणि मग गुगलवरुन कैलासची माहिती घेतांना कैलास मानससरोवर, आदि कैलास, किन्नर कैलास, मणी महेश कैलास आणि श्रीखंड कैलास या पंच कैलासची माहिती मिळाली. ही पाचही कैलासाची ठिकाणे हिमालयात वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यापैकी कैलास मानससरोवराला अनेक व्यक्ती जाऊन आलेल्या आहेत. पण इतर ठिकाणे मात्र आपल्याकडे फारशी प्रचलित नाहीत. शिवाय ही ठिकाणे ॲडव्हेंचरस असल्याने जास्त लोक जात नाहीत. याच दरम्यान उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाचे कुमाऊँ मंडल विकास निगम (केएमव्हीएन) आणि ट्रीप टू टेम्पल यांच्यातर्फे नागपुरातील आम्ही आठ जणांनी ऑनलाईन बुकिंग केले. पुढे त्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनेनुसार फिटनेस सर्टिफिकेट, ॲफिडेव्हीड, परमीट, पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक पूर्तता करुन २४ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत आदि कैलास यात्रेच्या १३ व्या जत्थ्यात आम्ही समाविष्ट झालो. दिल्लीमार्गे काठगोदाम येथे पोहोचलो आणि तिथून आमच्या यात्रेला खरी सुरूवात झाली.
Kailasa
भीमताल, निम करोली बाबाचे मंदिर
काठगोदामपासून ३० कि.मी. अंतरावर एक मोठा तलाव आहे. इथे भीमाने गदा मारली त्या जागेवर पाणी निघाले म्हणून याला भीमताल म्हणतात. तलावाच्या मधोमध एक बेट आहे. येथील आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य आणि रात्रीच्या वेळेस लायटिंग व बोटिंग अतिशय विलोभनीय आहे. येथे अनेक सिनेमांचे शुटींग झालेले आहे. त्यानंतर पहाडीवर ३० किमी पुढे कैची धाम येथे निम करोली बाबाचे मंदिर आहे. या बाबांची आई हनुमानाची अवतार होती, अशी आख्यायिका आहे. इथल्या मेडिटेशन सेंटरमध्ये अनेक थोर व्यक्ती वास्तव्यास व ध्यानधारणेसाठी येऊन गेल्यात व आजही येतात; पण ते इतरांना भेटत नाहीत. त्यानंतर अल्मोडा येथे नवसाला पावणारे गोलू देवता मंदिर आहे. इथे लहान आकारापासून तर मोठमोठ्या आकाराच्या घंट्या नवसाच्या चिठ्ठ्या लावून बांधल्या आहेत म्हणून याला ‘घंट्ट्यांचे मंदिर’ असे म्हणतात. याच मार्गावर पुढे जागेश्वर धाम येथे उंचच उंच वृक्षांच्या खाली श्री महादेवाचे आणि श्री नागेशाचे हेमाडपंथी व पुरातन काळातील अत्यंत प्रसिद्ध असे मंदिर असून या ठिकाणी विवाह सिनेमाचे शुटिंग झालेले आहे.
Mansarovar Travel Experience
पहिला बेस कॅम्प पिथोरगड
यात्रेतील आमचा पहिला बेस कॅम्प होता पिथोरगड. तेथे पोहोचताच केएमव्हीएनच्या वतीने आमचे सर्वांचे हार घालून व ओवाळून स्वागत झाले. ओम नम: शिवाय यावर आम्ही सर्वांनी छान फेरा धरला. याच ठिकाणी आमचे पहिले ब्रिफिंग होऊन आम्हाला पुढल्या यात्रेची व त्यासंबंधी घ्यावयाच्या दक्षतेची माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी आम्ही भारताच्या नकाशावर असलेले शेवटचे गाव धारचुला येथे गेलो. तिथे मध्ये काळी नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला नेपाळ आहे. तेथील चेकिंग ऑफिसमध्ये आधारकार्ड जमा करुन हँगिंग झुल्याने आम्ही नेपाळमधील दारचुला येथे बाजारात गेलो. बाजारात फिरलो, खरेदी केली आणि संध्याकाळी परत आलो. गुंजी या मिलिटरी बेस कॅम्पला जाताना रस्त्यांचे काम सुरू असल्याने थांबावे लागले. आता बर्फाच्छादित पहाडांना सुरूवात झाली होती. त्यामुळे खूप थंडी होती. पण व्यवस्थाही अत्यंत चांगली होती.
![]() |
| आदि कैलास |
शिवमंदिर, पार्वती सरोवर आणि आदि कैलास
दुसऱ्या दिवशी पहाटेच सहा वाजता बोलेरो चार सीटर्स गाड्यांनी निघालो. पांडव गुफा तसेच हिमालयातील शंकर, पार्वती, गणपती, पंच नागाच्या व इतर अनेक देवदेवतांच्या प्रतिमा पहात पहात तसेच नेपाळ, तिबेट आणि चीन सीमवरील परमीट घेऊन सकाळी १० वाजता जॉलिंग काँग या कॅम्पला पोहोचलो आणि तिथून ६ किमी अंतरावर घोड्याने आणि काही लोकांनी पायी सुद्धा पहाड तसेच झरे पार करीत शिवमंदिर, पार्वती सरोवर आणि आदि कैलास या स्थळांचे दर्शन घेतले. तेथील अप्रतिम निसर्ग साैंदर्य म्हणजे जणू स्वर्गच. यात्रेतील पुढला टप्पा होता गौरीकुंडाचा. ३ किमी अंतरावर १२,५०० फूट उंचीवर असलेल्या या गौरीकुंडापर्यंत पोहोचणे म्हणजे धाडसच. आमच्यापैकी काही लोकच तेथवर पोहोचू शकले. प्राणवायूची कमरता असल्याने श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. अर्थात येथील लष्करी रुग्णालय सुसज्ज असून तेथे चोख व्यवस्था आहे. तरीही येथे जाताना मानसिक आणि शारीरिक धैर्याची गरज मात्र निश्चितच जाणवते. साधारणत: दुपारी २ वाजतानंतर येथे आभाळ,वादळ, पावसाला सुरुवात होत असल्याने लवकरच बेसकॅम्पला परतावे लागले.
Kailasa Parvat
ओम पर्वत
आमचे या यात्रेतील खरे आकर्षण केंद्र होते ते म्हणजे ओम पर्वत. सकाळी ६ वाजताच आम्ही उत्साहाने गाड्यांनी निघालो. काही ठिकाणी बांधकामामुळे रस्ते बंद होते तर काही ठिकाणी खूप पाण्यामधून जावे लागले. बऱ्याच भागात पहाडाचे सुळखे खूप खाली असल्याने हे ५०-६० किमीचे अंतर पार करण्यास वेळ लागला. १० वाजता आम्ही ओम पर्वतावर पोहोचलो. हा पर्वत चीनमध्ये असून त्याचे बर्फाच्छादित ‘ओम’ लिहिलेले नाव भारताच्या दिशेला आहे. उत्तर भारत-चीन सीमेवर हा पर्वत आहे. नशिबाने आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे धुके,वादळवारा, पाऊस काहीच नव्हते. आम्ही तिथे होम करुन ओम नम: शिवायचा जप केला. त्यावर सुंदर फेरा धरला. फोटो सेशन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता अचानक इतके ढग दाटून आले की पर्वतच दिसेनासा झाला. अंधारुन आले आणि त्याच जागेवर निसर्गाचा एक वेगळाच अविष्कार पहावयास मिळाला. आम्ही व्यास गुफा, काली माता मंदिर, नाग पर्वत, नाभी पर्वत पाहून नाभी येथे गेलो. तिथे आमच्या स्वागतात एक कार्यक्रमही झाला.
![]() |
| पाच पांडव पर्वत |
लॅण्ड स्लाईडींगचा थरारक अनुभव
पुढल्या दिवशी आम्हाला नाभीवरुन धारचुलाला जायचे होते. पण आदल्याच दिवशी पांगळा गावात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने रस्ता बंद होता. दोन तास थांबल्यावर रस्ते मोकळे झाले आणि १२ गाड्यांमध्ये आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. अर्ध्या तासानंतर मार्गात मलघट्टा या ठिकाणी भीषण लॅण्ड स्लाईडींग झाले. रस्त्यावरच दगडांच्या टेकड्या उभ्या झाल्या होत्या. आम्ही पुन्हा अडकलो. १५ मिनिटांनी लष्कराने येथे लॅण्ड स्लाईडींगचा धोका असल्याची सूचना दिली आणि इथे थांबू नका असा सल्ला दिला. तेव्हा आम्ही सर्वच सॅक बॅग घेऊन धावतच पुढल्या दगडी पार करु लागलो. सुरुवातीला वाटले की पहिले वळण पार केले की झाले. पण कसचे काय? जवळपास अर्धा किमीचा रस्ता बंद असल्याने ८ ते १० फूट उंचीचे मोठेमोठे दगड तेही घसरणारे दगड आम्ही पार केले. आणि सर्वजण सुखरुप आलो. एकीकडे खोल दरी, नदी आणि दुसरीकडे कोसळलेले पहाड व दगड यातून आम्हाला बाहेर काढण्यास खरी मदत केली ती वाहनचालक आणि स्थानिक लोकांनी. त्यांनी विशिष्ट पद्धतीने एकएक करुन सर्वांना बाहेर काढले. पण काय? पुढल्या दहा मिनिटांच्या आताच आमच्या समोर पुन्हा जोरदार लॅण्ड स्लाईडिंग झाले. मग मात्र आम्ही धावतच पुढला टप्पा गाठला आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचलो. तीन बॅग या लॅण्ड स्लाईडिंग मध्ये राहिल्या होत्या. त्या जळून गेल्या. यावरुन त्या अपघाताची कल्पना आली. आम्ही सर्वांनीच श्री आदि कैलासला नमस्कार केला. तेथील लोकांचे आभार मानत त्यांना पैसे दिले. पण ते देतांना त्या पैशांपेक्षा आपल्या जीवाचे मोल किती जास्त आहे, हे प्रत्येकालाच जाणवत होते.
With Friends & Family
दोन तासानंतर वातावरण थोडफार शांत झाले. दुसऱ्या बाजूने काही गाड्या आल्या. आणि आदि कैलासचा जयजयकार करुन आम्ही बेसकॅम्पला आलो. तिथे आमचे स्वागत झाले. टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी आमच्या मुलाखती घेतल्या. दुसऱ्या दिवशी केएमव्हीएनच्या वतीने सत्कार करुन प्रमाणपत्र देण्यात आले. मग पुढचा प्रवास आनंदात झाला. त्यानंतर मात्र सतत लॅण्ड स्लाईडिंग होत असल्याने या यात्रेसाठीचा यात्रेकरुंचा परवाना रद्द करण्यात आल्याने आमची त्याकाळातील शेवटची यशस्वी बॅच राहिली, हे आमचे सुदैव आहे. आणि मग खऱ्या अर्थाने पटले की, ‘आदि कैलास यात्रा ही पैशाची नसून नशिबाची आहे.’
कैलास मानसरोवर यात्रा मार्गदर्शक | Kailash Mansarovar Yatra Marathi Travel Guide
१. प्रवासासाठी सर्वोत्तम कालावधी
मे ते सप्टेंबर हा यात्रेसाठी योग्य काळ आहे. जून ते ऑगस्ट या महिन्यांत सर्वाधिक यात्रेकरू जातात.
२. प्रमुख प्रवासमार्ग
अ) भारत सरकार मार्गे उत्तराखंडमधील लिपुलेख दर्रासिक्कीममधील नाथूला
कालावधी: साधारण २१ ते २५ दिवस
ब) नेपाळमार्गे काठमांडू येथून रस्ता किंवा हेलिकॉप्टरद्वारे
कालावधी: निवडलेल्या पॅकेजनुसार १० ते १६ दिवस
३. आवश्यक कागदपत्रे
- किमान ६ महिने वैध असलेला पासपोर्ट
- चीन (तिबेट) प्रवेशासाठी आवश्यक व्हिसा व परवानग्या
- वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र
- अधिकृत टूर ऑपरेटरमार्फत नोंदणी
४. शारीरिक तयारी
यात्रेदरम्यान ४,५०० ते ५,६०० मीटर उंचीवर प्रवास करावा लागतो. दररोज ५ ते १५ किमी चालण्याची तयारी असावी. हृदयविकार, दमा किंवा इतर गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
५. अंदाजे खर्च
- नेपाळमार्गे: सुमारे २ लाख ते ४ लाख
- (पॅकेजनुसार) भारत सरकारमार्गे: शुल्क त्या वर्षाच्या नियमांनुसार बदलू शकते
६. प्रवासासाठी आवश्यक साहित्य
उबदार कपडे, जॅकेट, हातमोजे, माकडटोपी, ट्रेकिंग शूज, सनग्लासेस आणि सनस्क्रीन, वैयक्तिक औषधे, पाण्याची बाटली, टॉर्च, पॉवर बँक,आवश्यक ओळखपत्रे व कागदपत्रांच्या प्रती
७. महत्त्वाच्या सूचना
उंच प्रदेशातील हवामान क्षणाक्षणाला बदलू शकते. पुरेसे पाणी प्या आणि शरीराला उंचीशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्या.स्थानिक प्रशासन आणि मार्गदर्शकांच्या सूचनांचे नेहमी पालन करा. पर्यावरण स्वच्छ ठेवणे आणि धार्मिक स्थळांचा आदर करणे ही प्रत्येक यात्रेकरूची जबाबदारी आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही केवळ पर्यटन नसून श्रद्धा, संयम, आत्मिक साधना आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव देणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा आहे.
कमेंट्स मध्ये आपले मत / अनुभव नक्की कळवा! 😊😊
डॉ. साै. प्राची दिलीप देशपांडे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख (सेवानिवृत्त)
महिला महाविद्यालय
नंदनवन, नागपूर





.png)
great article
ReplyDeleteही यात्रा अनोखी आहे
ReplyDeletenicely written
ReplyDeletegreat
ReplyDeleteनशीब बलवत्तर
ReplyDeleteखूप छान अविस्मरणीय अनुभव
ReplyDeleteमॅडम, छान लिहिलं
ReplyDelete