पवनारच्या मातीतील विनोबांचा विचारसुगंध | Author: Sakhi | Vinoba Bhave Ashram, Paunar | Heritage Tourism | Maharashtra Tourism
काही ठिकाणांची माती ही केवळ माती नसते; तिच्यात इतिहासाच्या पाऊलखुणा, संघर्षाची स्मृती आणि एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा सुगंध सामावलेला असतो. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनारची माती अशीच आहे. धाम नदीच्या शांत काठावर वसलेल्या या परिसरात पाऊल ठेवताच जाणवते की, आपण केवळ एका गावात किंवा आश्रमात आलेलो नाही, तर एका समृद्ध विचारपरंपरेच्या सान्निध्यात आलो आहोत. पवनार म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहतात आचार्य विनोबा भावे. साधेपणाला जीवनमूल्य मानणारे, गांधीविचारांना कृतीची जोड देणारे आणि भूमिहीनांच्या वेदनेला स्वतःची वेदना मानून देशभर पायी फिरणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ ज्या भूमीत गेला, त्या भूमीला भेट देणे म्हणजे त्यांच्या जीवनकार्याची केवळ माहिती घेणे नव्हे; त्यांच्या विचारांना जवळून अनुभवण्याचा एक प्रयत्न आहे.
आश्रमात पाऊल ठेवताना...
पवनारच्या आश्रमात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती साधेपणाची अनुभूती. भव्य वास्तू, अलंकार किंवा दिखाऊपणा नाही; त्याऐवजी स्वच्छता, शांतता आणि साधी जीवनशैली. या साधेपणातूनच विनोबांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी उंची जाणवते. आश्रमातील वातावरण पाहताना मनात वारंवार एक विचार येत राहतो, ज्याने संपूर्ण देशाला विचारांची दिशा दिली, ज्याने हजारो किलोमीटर पायी भ्रमंती केली, ज्याने भूमिहीनांसाठी जमीन मागितली, त्या व्यक्तीचे स्वतःचे जीवन किती साधे होते! विनोबा भावे हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते. ते विचारवंत, अध्यात्मनिष्ठ समाजसुधारक, लेखक, अनुवादक आणि प्रयोगशील कार्यकर्ते होते. गांधीजींच्या विचारांचा त्यांनी केवळ स्वीकार केला नाही, तर ते स्वतः च्या जीवनात जगून दाखवले.
आश्रमातील विविध वास्तू आणि स्मृतिस्थळे पाहताना विनोबांचे दैनंदिन जीवन डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांच्या साधनेसाठी आणि चिंतनासाठी वापरल्या गेलेल्या जागा पाहताना त्यांच्या अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. भिंतींवर, परिसरात आणि स्मृतीस्थळांवर त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित माहिती व विचार वाचायला मिळतात. त्यामुळे हा परिसर केवळ पाहण्याची जागा न राहता विनोबांच्या विचारांचा परिचय करून देणारे एक जिवंत केंद्र वाटते.
विनोबा: गांधीविचारांचा जिवंत वारसा | Vinoba Bhave & Mahatma Gandhi
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे नाते अत्यंत आत्मीय आणि वैचारिक होते. गांधीजींना विनोबांमध्ये सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि रचनात्मक कार्य यांचा प्रामाणिक साधक दिसला. म्हणूनच गांधीजींनी विनोबांना आपल्या प्रमुख आध्यात्मिक शिष्यांपैकी एक मानले. विनोबांचे गांधीजींशी असलेले नाते केवळ गुरु-शिष्याचे नव्हते; ते विचारांच्या आणि मूल्यांच्या ऋणानुबंधाचे होते. गांधीजींच्या आश्रम जीवनाचा, खादीचा, श्रमप्रतिष्ठेचा, अस्पृश्यता निर्मूलनाचा, ग्रामस्वराज्याचा आणि अहिंसेचा प्रभाव विनोबांच्या जीवनावर खोलवर पडला. १९४० मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. ही निवडच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर गांधीजींचा असलेला विश्वास स्पष्ट करते. गांधीजींच्या निधनानंतरही विनोबांनी त्यांच्या विचारांची मशाल पुढे नेली. मात्र त्यांनी गांधीविचारांची केवळ पुनरावृत्ती केली नाही; बदलत्या सामाजिक परिस्थितीत त्या विचारांना नवे प्रयोग आणि नवी दिशा दिली.
भूदान: जमिनीपासून माणुसकीपर्यंतचा प्रवास | Bhudan Movement
पवनारच्या भेटीत विनोबांच्या कार्याचा विचार करताना सर्वाधिक ठळकपणे आठवते ती भूदान चळवळ. १९५१ मध्ये आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे विनोबांच्या जीवनाला एक ऐतिहासिक वळण मिळाले. भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत असताना स्थानिक जमीनदारांनी स्वेच्छेने जमीन दान करण्याची तयारी दर्शवली. याच घटनेतून भूदान चळवळीचा जन्म झाला. विनोबांनी शस्त्र, संघर्ष किंवा कायद्याचा दबाव याऐवजी माणसाच्या अंतः करणाला साद घालण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी गावोगावी पायी प्रवास केला. जमीनदारांना आपल्या जमिनीतील काही हिस्सा भूमिहीनांना देण्याचे आवाहन केले. या चळवळीमागे केवळ ‘जमीन द्या’ एवढीच मागणी नव्हती. तिच्यामागे सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आणि संपत्तीच्या न्याय्य वाटणीचा विचार होता. भूदानानंतर विनोबांनी ग्रामदानाची संकल्पनाही पुढे नेली. म्हणजे केवळ व्यक्तीने जमीन द्यावी एवढेच नव्हे, तर संपूर्ण गावाने सामूहिकतेच्या भावनेतून आपल्या संसाधनांकडे पाहावे. हा विचार आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचा वाटतो.
ब्रह्मविद्या मंदिर
पवनारच्या आश्रम परिसरातील ब्रह्मविद्या मंदिर हे विशेष आकर्षण आहे. विनोबांच्या विचारांमध्ये अध्यात्माला महत्त्वाचे स्थान होते; मात्र त्यांचे अध्यात्म हे केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित नव्हते. आत्मशुद्धी, स्वावलंबन, श्रम, सामूहिक जीवन आणि समाजसेवा यांचा त्यात सुंदर संगम होता. ब्रह्मविद्या मंदिराशी संबंधित परिसर पाहताना विनोबांच्या विचारांची ही व्यापकता जाणवते. येथे स्त्रियांनी सामूहिक पद्धतीने साधना, श्रम आणि स्वावलंबनाचे जीवन जगण्याचा प्रयोग केला. साधेपणा आणि आत्मनिर्भरतेवर आधारित हे जीवन पाहताना विनोबांच्या सामाजिक प्रयोगांची व्याप्ती लक्षात येते.
गीताई मंदिर: श्रद्धा आणि विचारांचा संगम
पवनारमधील गीताई मंदिर हे या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य. ‘गीता’ हा भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ; परंतु विनोबांनी भगवद्गीतेकडे केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून पाहिले नाही. त्यांनी तिच्यातील कर्म, समत्व, आत्मसंयम आणि लोकसेवेचे तत्त्व जीवनाशी जोडले. त्यांनी भगवद्गीतेचा मराठी भावानुवाद ‘गीताई’ या नावाने केला. सर्वसामान्यांना गीतेचा अर्थ सहज समजावा, हा त्यामागचा हेतू होता. संस्कृतचे अवघडपण दूर करून गीतेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे काम ‘गीताई’ने केले. गीताई मंदिराच्या परिसरात उभे राहिल्यावर धर्म, अध्यात्म आणि सामाजिक कार्य यांच्यातील विनोबांनी साधलेला सुंदर समन्वय जाणवतो. अध्यात्म म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्षाचा मार्ग नसून समाजाच्या कल्याणासाठी जगण्याची प्रेरणा असावी, हा विनोबांच्या विचारांचा गाभा येथे प्रकर्षाने जाणवतो.
वाकाटककालीन ‘भरतभेट’ पाषाण शिल्प
विदर्भाच्या मातीला वाकाटक राजवंशाचा अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. पवनार (प्राचीन नाव प्रवरपूर) येथील आश्रमात श्रमदानादरम्यान सापडलेली १५०० वर्षांपूर्वीची राम-भरत भेट आणि वालीवधाची पाषाण शिल्पे म्हणजे वाकाटककालीन शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहेत. राम-भरत भेटीचे हे संपूर्ण देशातील पहिले आणि एकमेव मंदिर मानले जाते. विदर्भावर राज्य करणाऱ्या वाकाटक घराण्याचा काळ हा कला आणि संस्कृतीचा सुवर्णकाळ मानला जातो. ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांच्या मते, आजचे पवनार हेच वाकाटकांची प्राचीन राजधानी 'प्रवरपूर' असण्याची शक्यता आहे. याच भूमीत आचार्य विनोबा भावे यांच्या उपस्थितीत १९४७ च्या गुढीपाडव्याला एका प्राचीन शिल्पपट्टाची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात आश्रमात काम करताना भूगर्भात गाडलेला हा ऐतिहासिक वारसा अचानक समोर आला. सध्या धाम नदीच्या काठावर एका साध्या, देखण्या मंदिरात हा पुरातन ठेवा जतन करण्यात आला आहे. या प्राचीन पाषाण शिल्पात सीता, राम, भरत आणि लक्ष्मण अशा चार मूर्ती कोरलेल्या आहेत. यात श्रीराम आणि भरत यांच्यातील संवाद अतिशय संवेदनशीलतेने दाखवला आहे.
देशासाठी समर्पित जीवन
विनोबांचे संपूर्ण आयुष्य ‘स्वतः साठी’ या संकल्पनेच्या पलीकडे गेलेले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला, तुरुंगवास भोगला; परंतु स्वातंत्र्यानंतरही त्यांची सामाजिक बांधिलकी संपली नाही. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे देशाचे प्रश्न संपले असे त्यांना वाटत नव्हते. उलट, खरी कसोटी आता सुरू झाली आहे. गरिबी, विषमता, अशिक्षितपणा, भूमिहीनता, सामाजिक भेदभाव आणि ग्रामजीवनातील समस्या यांच्याशी लढणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी सत्ता किंवा पदाचा मार्ग निवडला नाही. त्याऐवजी त्यांनी पायी चालत लोकांपर्यंत जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या कार्यात प्रसिद्धीपेक्षा प्रयत्न, भाषणांपेक्षा आचरण आणि अधिकारापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व होते.
पवनारचीच निवड का?
पवनारमध्ये विनोबांनी आश्रम का उभारला, हा प्रश्न या प्रवासात स्वाभाविकपणे मनात येतो. पवनारची निवड ही केवळ एखाद्या रमणीय ठिकाणाच्या शोधातून झालेली नव्हती. वर्धा परिसरात गांधीजींच्या रचनात्मक कार्याची जी भूमी तयार झाली होती, त्याच व्यापक वातावरणाशी पवनार जोडले गेले. सेवाग्रामच्या जवळीकतेमुळे गांधीविचारांच्या प्रयोगशील वातावरणाशी सातत्याने संबंध ठेवणेही शक्य होते. धाम नदीच्या परिसरातील शांत, निसर्गरम्य वातावरण विनोबांच्या साधना, चिंतन आणि आश्रमजीवनाला पोषक होते. ग्रामीण भारताच्या वास्तवाशी जवळीक हीदेखील महत्त्वाची बाब होती. विनोबांचा केंद्रबिंदूच गाव, शेतकरी, श्रम आणि सर्वसामान्य माणूस हा होता. त्यामुळे पवनारसारख्या ग्रामीण परिसरात राहून समाजाशी जोडलेले जीवन जगणे त्यांच्या विचारांशी पूर्णपणे सुसंगत होते. पवनार ही त्यांच्या दृष्टीने केवळ राहण्याची जागा नव्हती; ती प्रयोगभूमी होती. स्वावलंबनाची, साधेपणाची, अध्यात्माची आणि समाजसेवेची.
![]() |
| Sun Dial Clock |
आजच्या काळात विनोबा का आठवतात?
पवनार सोडताना मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा येत होता. आजच्या काळात विनोबांचे विचार किती लागू पडतात? उत्तर शोधताना जाणवले की त्यांचे विचार कदाचित आज अधिकच आवश्यक आहेत. संपत्तीची वाढ आणि विषमता, वाढता उपभोगवाद, निसर्गाचा ऱ्हास, सामाजिक तणाव आणि माणसामाणसांतील दुरावा यांच्यात विनोबांचे साधेपण, अपरिग्रह, श्रमप्रतिष्ठा, अहिंसा आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतो. भूदान चळवळीचा परिणाम किंवा तिच्या मर्यादा यांचा ऐतिहासिक अभ्यास वेगळा विषय असू शकतो; पण लोकांच्या अंतः करणाला आवाहन करून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा विनोबांचा प्रयत्न हा स्वतः मध्ये विलक्षण होता.
पवनारमधून परतताना...
पवनारला जाताना वाटले होते की एका आश्रमाला भेट द्यायची आहे. पण परतीच्या वाटेवर जाणवले, आपण एका आश्रमाला नव्हे, तर एका विचारविश्वाला भेट देऊन आलो आहोत. आश्रमातील साधेपणा, गीताई मंदिरातील आध्यात्मिक वातावरण, भूदान चळवळीची आठवण, गांधीजींशी असलेला विनोबांचा आत्मीय संबंध आणि पवनारच्या शांत परिसरात जाणवणारी त्यांची उपस्थिती या सगळ्यांनी प्रवासाला वेगळाच अर्थ दिला. विनोबा भावे यांनी देशासाठी आयुष्य समर्पित केले; पण त्यांचे मोठेपण केवळ त्यांनी केलेल्या कार्यात नाही. माणसाने किती कमी साधनांत, किती साधेपणाने आणि किती व्यापक हेतूने जगता येते, हे त्यांनी स्वतःच्या जीवनातून दाखवून दिले. पवनारची माती मागे पडली, रस्ता पुन्हा गजबजला; पण मनात एक विचार मात्र ठामपणे रेंगाळत राहिला, समाज बदलण्यासाठी नेहमी मोठ्या घोषणांची गरज नसते; कधी कधी एका माणसाचे निर्मळ आचरणच हजारो मनांना बदलण्याची ताकद ठेवते. आणि म्हणूनच पवनारचा प्रवास संपत नाही, तो मनात सुरू होतो.
![]() |
| Vinoba Niwas |
केव्हा जायचे
परमधाम आश्रम (विनोबा भावे आश्रम) पहाटे ४ ते रात्री ८ या वेळेत खुला असतो, मात्र दुपारी १२ ते २ या वेळेत विश्रांतीसाठी बंद असतो. हा आश्रम आठवड्यातील सर्व दिवस खुला असतो.
कसे पोहोचाल | How to plan trip to Vinoba Bhave's Ashram in Paunar
- नागपूर ते पवनार (वर्धा) हे रस्ते मार्गाने साधारण ६९ ते ७० किलोमीटर अंतरावर आहे. कार किंवा खासगी वाहनाने हे अंतर पार करण्यासाठी साधारण १ तास ३० मिनिटे लागतात.
- नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावरून वर्धा किंवा यवतमाळकडे जाणाऱ्या बसेस दर १५ ते ३० मिनिटांनी मिळतात. तुम्ही वर्धा बस पकडून पवनार फाट्यावर किंवा थेट पवनारला उतरू शकता.
- खाजगी बसेस: नागपूरवरून वर्धा मार्गे जाणाऱ्या अनेक खासगी बसेस (उदा. ट्रॅव्हल्स) देखील उपलब्ध आहेत.
- रेल्वे - तुम्ही नागपूरवरून रेल्वेगाडीने वर्धा जंक्शन किंवा सेवाग्राम स्टेशन गाठू शकता (प्रवास वेळ: सुमारे १ ते १.५ तास). वर्धा किंवा सेवाग्राम रेल्वे स्टेशनवरून पवनार आश्रम साधारण ८ ते १० किलोमीटर अंतरावर आहे, जिथून तुम्हाला ऑटो सहज मिळतात.






प्रासंगिक
ReplyDeleteनव्या पिढीपर्यंत हा विचारांचा वारसा पोहोचणे आवश्यक
ReplyDeletegood article
ReplyDelete