नेपाळ: सागरमाथ्याच्या स्पर्शाची अनुभूती – भाग १ | Author: Savita 'Deo' Harkare | Travel Experience in Nepal | International Tourism
माऊंट एव्हरेस्ट! जगातील या उंच शिखराचे विमानातून अगदी जवळून दर्शन घेतानाचा अनुभव रोमांचक होता. सकाळच्या थंडगार बोचऱ्या वाऱ्यात अवकाशात उंच झेप घेणारे छोटेखानी विमान जसजसे एव्हरेस्टच्या जवळ जात होते तसतशी मनातील उत्सुकता आणखी वाढत चालली होती. अखेर तो क्षण आलाच! एव्हरेस्टपासून अवघ्या काही अंतरावर हे विमान घिरट्या घालू लागले तेव्हा सर्वच जण या सागरमाथ्याचे दर्शन घेण्यात तल्लीन झाले होते. हा अनुभव अविस्मरणीय आयुष्यभराचा ठेवा म्हणून जपण्यासारखा होता. एव्हरेस्टला सागरमाथाही म्हणतात हे येथेच कळले. या सागरमाथ्यासोबतच गौरीशंकर, मकालु, चामलँग, नुंबर आदी हिमशिखरांचे दर्शन झाले.
Mount Everest
हिमालयाच्या कुशीत वसलेलं नेपाळ म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचं लेणं लाभलेलं एक आश्चर्यच आहे. उत्तरेकडे जगातील सर्वात उंच शिखर सागरमाथा (माऊंट एव्हरेस्ट) तर दक्षिणेकडे अनेक नद्या व जंगलांनी वेढलेला प्रदेश! जगाच्या पाठीवर कुठेही अनुभवायला येणार नाही असं निसर्गाचं लेणं विविधतेनं येथे अनुभवायला मिळालं. आपल्या देशातून सीमा पार करुन दुसऱ्या देशात जायचं होतं. त्यामुळे सीमेवर फार कडेकोट असेल असं वाटलं होतं. पण खरच प्रत्यक्षात ही सीमा पार करताना खूपच गंमत वाटली. एक ते दीड किलोमीटरची ही सीमा आम्ही चक्क सायकल रिक्षातून पार केली. गोरखपूरजवळील सोनोली सीमेपर्यत भारताच्या बसने पोहोचल्यानंतर तेथून रिक्षा केला आणि नेपाळमध्ये पोहोचलो. तेथून पुढील प्रवास नेपाळच्या बसने करायचा होता. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 35 जण होतो. नेपाळमध्ये प्रवेश करताना सर्वांचा उत्साह ओसंडून वाहात होता. हद्दपार करताच माणसांचे चेहरेमोहरे बदलले होते. वेशभूषा बदलली होती. या सीमेपासूनच नेपाळच्या निसर्गसौंदर्याची चाहुल लागली होती. मला विशेषत: आकर्षण होतं ते हिमालयीन पर्वतराजीचे!
आमचा पहिला पडाव होता रॉयल चितवन पार्कमध्ये. सोनोली ते चितवन हा प्रवास औत्सुक्य वाढविणारा होता. आमची बस चितवनच्या दिशेने धावू लागली होती. मला तर चितवनमध्ये पोहोचण्याची प्रचंड घाई झाली होती. वन्यजीवांच्या दृष्टीने गाभा समजल्या जाणाèया अत्यंत घनदाट अशा चितवन जंगलात पोहोचलो तेव्हा अंधारले होते. रात्री उशिरापर्यत कुडकुडत्या थंडीत शेकोटीजवळ बसून जंगलातील पशुपक्ष्यांसोबत वास्तव्याचा आगळावेगळा असा तो अनुभव.
जंगल सफारी! | Jungle Safari in Nepal
दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सूर्यादयासोबतच सुरु झाली जंगल सफारी!
Jungle Safari Chitwan Nepal
जंगल हिरवंकंच होतं. सकाळच्या त्या प्रहरी तीनचार हरणं झाडाखाली शांत उभी होती. एक मोठे काळवीटही झुडपाआडून आमचा कानोसा घेत होते. हत्तीवरुन जंगलात फेरफटका मारताना वन्यजीवांच्या सान्निध्याचा मनमुराद आनंद लुटता आला. दोन ते तीन तास गजराजावर बसून जंगलात फिरत होतो. गेंड्याचं छप्पर फाडके दर्शन झालं. एकशिंगी गेंडा येथे प्रथमच बघितले. हे गेंडे अगदी आमच्या हत्तीच्या जवळ येत होते. चितवन जंगलातून नारायणी नदी वाहते. ही नदी पार करुन पलिकडील जंगलात जायचे होते. आमचा हत्ती नदीत प्रवेश करताच पाणी खेळण्याच्या मूडमध्ये आला होता. त्याने सोंडेत पाणी घेऊन उडविलेल्या फवाèयाने आम्ही ओलेचिंब झालो होतो. त्याच्या या बालक्रिडांचा आनंद घेत नदी पार केली. कुठे काही दिसते काय म्हणून नजर चौफेर फिरत होती. डाव्या बाजूला नदीच्या काठावर एक भलीमोठी मगर सूर्यस्नान करीत होती.
या अभयारण्यातून रापती नदीही वाहते. या नदीतून कॅनोरायडिंग करता येतं. कॅनोरायडिंग म्हणजे निमुळत्या नावेत दहा ते बारा लोक एकामागे एक बसून नाव वल्हवतात. सर्वांनी मिळून नाव वल्हवायची असते. या छोटाश्या लाकडी कनो (लाकडी अरुंद बोट) आवाज न करता अगदी संथपणे पाण्याच्या प्रवाहाबरोबर हळूहळू पुढे जातात तेव्हा नदीच्या काठावर आलेल्या मगरी आपल्याला बघता येतात. कॅनोरायडिंगचा हा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. ही कॅनोराईड संपल्यानंतर नदीपलिकडे असलेल्या हत्ती प्रजनन केंद्रात जायचे होते. या केंद्राकडे जाणाऱ्या निमुळत्या रस्त्याच्या दुतर्फाही घनदाट वृक्षरांजी होती. बरच अंतर होतं आणि ते पायीपायी पार करायचं होतं. केंद्रापर्यत पोहोचलो तेव्हा जाम थकवा आला होता. पण केंद्रातील हत्तींचे गुबगुबीत छोटेछोटे पिल्ल बघितल्यानंतर सगळा थकवा पळाला होता. येथं एकाच वेळी २५-३० हत्ती आणि त्यांची गोजिरवाणी पिल्लं खेळण्यात रमली होती. जंगलची ही सफर आटोपून दुपारी उशिरा आम्ही रिसोर्टमध्ये पोहोचलो. हे रिसोर्ट खरच खूप छान होतं. आमची खोली ऐसपैस होती. बाथटबपासून सर्व सुविधा होत्या. बाहेर सायकली बघितल्यानंतर सायकलने एकदा तरी जमेल तेवढा फेरफटका मारायचाच असं मी ठरवून टाकलं होतं. कॉलेजमध्ये असेपर्यत मी सायकलनेच जात होते. परंतु नंतर मात्र सायकलची सवय पूर्ण तुटली होती. अनेक वर्षांपासून सायकलला हातही लावला नव्हता. जेवण आटोपल्यावर थोडा आराम करायचा बेत होता. पण का कोण जाणे आराम करण्याऐवजी बाहेर भटकण्याचीच तयारी केली. निसर्गाच्या आणखी जवळ जावेसे वाटत होते. एक सायकल भाड्याने घेतली आणि सायकलिंग सुरु केले. सुरुवातीला तोल गेला नंतर मात्र गाडी पुष्कळ रुळावर आली होती. नेपाळमध्ये ठिकठिकाणी अशा सायकली आणि मोटारसायकली भाड्याने मिळतात. खास पर्यटकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या येथे जशी अभयारण्यांमध्ये आणि त्याला लागून लहानलहान खेडी आहेत,तशीच येथे पण आहेत. येथेही जंगलाला लागून एक खेडेगाव होते. जवळ सायकल होतीच. गावाचा फेरफटका मारुन आलो. या खेड्याचं नावही चितवनच होतं. अगदी आपल्यासारखच गाव. बहुतांश घरं मातीची होती. समोर सारवलेलं अंगण. या लोकांशी गप्पा मारण्याची इच्छा होती. त्यावेळी ते जमलं नसलं तरी रात्री मात्र कॅम्पफायरमध्ये या गावकऱ्यांसोबत सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. ढोलकीच्या तालावर लोकसंगीत आणि लोकनृत्य या स्थानिक कलाकारांनी सादर केले. विशेष म्हणजे यापैकी बरीचशी लोकगीतं ही आपल्या हिंदी सिनेमातील गाण्यांच्या चालीवर होती.
किर्र, घनदाट जंगलात काळोख्या रात्री बोचऱ्या थंडीत गाण्याची मैफल रंगली होती.
‘रेशम फिरिरी, रेशम फिरिरी'
उडेर जाऊ कि डाडामा भज्यांग, रेशम फिरिरी’
आम्ही केव्हा त्यांच्या सुरात सूर मिसळले कळलच नाही. काठ्या नृत्यात तर सर्वच सहभागी झाले होते. या नेपाळी कलावंतांचा उत्साह बघून आम्हालाही जोश आला होता. मग काय? सूरसंगीताचं फारस ज्ञान नसलेल्या आम्हीही जमेल त्या तालासुरात आपली गाणी म्हणण्यास सुरुवात केली. नेपाळी आणि भारतीय संगीताचा मिलाप केव्हा झाला कोणाला कळलेच नाही. शहरात दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ का होईन पण बाहेर पडून आपलं होऊन आपल्यासाठी जगणं किती आवश्यक असतं हे येथं कळलं. दिवसभराच्या एवढ्या एक्झरशननंतरही थकवा नव्हता. येथील दिवस आणि रात्री दोन्ही स्मरणीय राहिली.
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️


मस्त अनुभव
ReplyDelete