नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism
नागपूरची ओळख जशी संत्र्याचे शहर अशी आहे तशीच नागपूरची आणखी एक ओळख म्हणजे ही “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” या जगातील सगळ्यात मोठ्या स्वयंसेवी संघटनेची जन्मभूमी आहे. नागपूरमधील जुने नागपूर ज्याला ‘महाल’ असे संबोधतात त्या महालमध्ये मोहितेचा वाडा कोणता असे विचारले तर कदाचित आज कोणी सांगणार नाही. परंतु संघाशी संबंधित लोकांना माहिती आहे की ज्याला आज लोक ‘संघ बिल्डिंग’ किंवा संघ मुख्यालय किंवा डॉक्टर हेडगेवार भवन म्हणून ओळखतात ही वास्तु म्हणजेच मोहितेंचा वाडा आहे. याच्या डाव्या बाजूला भारत महिला विद्यालय व उजव्या बाजूला सुप्रसिद्ध भुऱ्याचा गणपती आहे.
बडकस चौकापासून पूर्वेला हे ठिकाण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात नागपूर येथील “मोहिते वाडा” या स्थळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संघ स्थापनेनंतर दैनंदिन शाखेची संकल्पना ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आकाराला आली, ते हे ऐतिहासिक स्थान होय. जेथील मातीला पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा पदस्पर्श झालेला आहे असे हे स्थान आजही स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान मानले जाते.
१९२६ मध्ये दैनंदिन शाखा सुरू | First Sangh Shakha in 1926
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ ला विजयादशमीच्या सुमुहूर्तावर संघाची स्थापना केली. प्रारंभी स्वयंसेवक रविवारी मैदानी कार्यक्रम, व्यायाम आणि गुरुवारी बौद्धिक कार्यक्रम घेत असत. परंतु समाजमनावर संस्कार करण्यासाठी दैनंदिन शाखेची आवश्यकता जाणवू लागली. सन १९२६ मध्ये दैनंदिन शाखा सुरू करण्याचा निर्णय झाला. शाखेसाठी निश्चित जागेची गरज होती. त्यावेळी डॉक्टरजींचे निकटवर्तीय सहकारी भाऊजी कावरे यांनी नागपूरमधील मोहिते वाड्याची सूचना केली. क्रांतिकारकांच्या बैठका पूर्वी या परिसरात होत असल्यामुळे डॉक्टरजींना हे ठिकाण परिचित होते. चर्चा आणि विचारविनिमयानंतर याच ठिकाणी दैनंदिन शाखा सुरू करण्याचे निश्चित झाले. त्या काळात मोहिते वाडा ही वास्तू भग्नावस्थेत होती. श्रीमती साळूबाई मोहिते यांच्या निधनानंतर ती जागा दुर्लक्षित झाली होती. परंतु शाखेसाठी जागा निश्चित होताच डॉक्टरजी स्वतः स्वयंसेवकांसह साफसफाईच्या कामात सहभागी झाले.
संघ मुख्यालय
शाखेपूर्वी आणि सुट्टीच्या दिवशी स्वयंसेवक येथे श्रमदान करीत. “हे केवळ खेळाचे मैदान नसून पवित्र संघस्थान आहे” हा संस्कार स्वयंसेवकांच्या मनावर तेव्हाच रुजविण्यात आला. या श्रमसंस्कारातून महाद्वारासमोर एक सुंदर मैदान तयार झाले आणि संघकार्याला स्थैर्य प्राप्त झाले. पुढे हे स्थान स्वयंसेवकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले.
![]() |
| याच मैदानावर संघाची पहिली शाखा लागली |
स्वयंसेवकांच्या श्रमदानातून उभे राहिलेले भवन
सन १९३० च्या सत्याग्रह आंदोलनानंतर काही काळ शाखेवर निर्बंध आले आणि शाखेचे स्थलांतर करण्यात आले. मात्र मोहिते वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहिले. पुढे सन १९४१ मध्ये हे मैदान व परिसर श्री. माधव सदाशिवराव गोळवलकर अर्थात श्रीगुरुजी यांच्या नावाने विकत घेण्यात आला. प्रारंभी येथे मातीचे छोटे घर होते. नंतर त्या जागेचा विस्तार करण्यात आला आणि स्थायी संघस्थान व कार्यालयाची निर्मिती झाली. सन १९४५-४६ मध्ये कार्यालयाच्या बांधकामाच्यावेळी काही आर्थिक व कामगारांच्या उपलब्धतेच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी मा.बाळासाहेब देवरस (तृतीय सरसंघचालक) यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी स्वतः स्लॅब टाकण्याचे कार्य पूर्ण केले. स्वयंसेवकांच्या श्रमदानातून उभे राहिलेले हे भवन पुढे “डॉ. हेडगेवार भवन” म्हणून प्रसिद्ध झाले. या भवनाने संघ कार्याची इमारत उभी करणारे अनेक “संघ शिल्पी” ज्येष्ठ प्रचारक पाहिलेले आहेत.
![]() |
| साळूबाई मोहितेंच्या वाड्याच्या भूतकालीन वैभवाची साक्ष देणारे प्रवेशद्वार |
आजही नागपूर हे संघाचे प्रमुख केंद्र मानले जाते. नागपूर हे संघाच्या कार्याचा ऐतिहासिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. मोहिते वाडा हे केवळ एक मैदान किंवा इमारत नाही; तर संघकार्याच्या प्रारंभिक तपश्चर्येचे, स्वयंसेवकांच्या श्रमसंस्काराचे आणि राष्ट्रकार्याच्या निष्ठेचे प्रतीक आहे. येथे रुजलेली दैनंदिन शाखेची परंपरा आज जगभरातील हजारो शाखांमधून विस्तारलेली दिसते.
सर्वसामान्य नागरिक संघ मुख्यालय बघण्यास जाऊ शकतात. परंतु तेथील सुरक्षा व्यवस्थेमुळे जाताना सोबत ओळखपत्र असणे आवश्यक आहे.




Amazinf article pusadkar ji
ReplyDeleteखूप छान लिहिला आहे सर
ReplyDelete