फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism
नागपूरच्या आध्यात्मिक आत्मगौरवाचा इतिहास
महाराष्ट्राची उपराजधानी व सतत आणि निरंतर विकसित होणारे भारतातले एक महत्त्वाचे महानगर म्हणजे नागपूर होय. पण काय तुम्हाला माहित आहे काय की, नागपूरचे आधीचे नाव होते फणिंद्रपूर. याबाबत अनेक दस्तऎवजात उल्लेख आढळतो. ‘फणिपुरे महाग्रामे, समस्ता: पुरवासिन:’ अशी ओळही प्रसिध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुमारास कदाचित नागपूर हा उल्लेख करणे प्रारंभ झाले असावे. आज जरी हा भाग मनुष्यवस्तीनी गजबजलेला असला तरी कोणी एकेकाळी येथे घनदाट अरण्य होते. परंतु नागपूर येथे जरी पूर्वी अरण्य व वन असले तरी ही तपोभूमी होती. इथे पूर्वी गुफाही होत्या. या गुफांमध्ये तपश्चर्या करणारे अनेक साधु-संत॒-ॠषी-मुनी-तपस्वी राहत असावेत. कालांतराने येथे मनुष्य वस्ती व तिचा सर्वांगिण विकास, प्रगत व प्रगल्भ अशी जीवनपद्धती विकसित होत गेली. त्याचाच अलीकडचा वारसा म्हणजे जुन्या नागपुरात घरोघरी दिसणारी समाधी स्थळे होत.
अनेक पुरातत्त्वांच्या पुराव्यानुसार नागपूर येथे रामायण काळापासून वस्ती असल्याचे आढळते. गझेटिअर (१९०३) यात नोंद आहे की रामायणात नागपूरचा उल्लेख आला आहे. २००८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाने नागपूरची प्राचीनता सिद्ध करणारे पुरावे शोधून काढलेत. याचा संबंध थेट महापाषाण कालीन युगासोबत जोडला गेला आहे, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
सध्याचे नागपूर हे राजे बख्त बुलंदशहा यांनी १७०२ च्या सुमारास वसविल्याचा इतिहास आहे. आधी सुमारे बारा वस्त्या घेऊन याची रचना करण्यात आली. मनुष्यवस्तीसह येथे विविध प्रथा-परंपरा-संस्कार-संस्कृती-ज्ञान-शिक्षण-उद्योगधंदे आदींनीयुक्त समाज उदयास येऊ लागला. त्याबरोबर सामाजिक-राजकीय-आध्यात्मिक वारसाही उदयास येऊ लागला. विविध कार्याची आद्य कर्मभूमी ही नागपूर ठरली. अशा समृद्ध इतिहासाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण नागपूरचे अवलोकन करतो तेव्हा लक्षात येते की आपला समग्र विकास साधता साधता येथील विविध परंपरा या समाजास, सर्व सामान्यांसाठी मार्गदर्शक व आधारभूत ठरलेल्या आहेत. या परंपरेने विभूषित अनेक गुरु घराणी हे नागपूरचे भूषण आहे. उदाहरणार्थ एकनाथपंथी परंपरा असणारे देवघर, माधवानाथ महाराज यांचा मठ, अयाचित मंदिर आदी घराणी ही नागपूरकरांच्या गुरुस्थानी होती. आजही या घराण्यांमध्ये अनुग्रह देण्याची परंपरा दिसून येते . श्रध्दावान नागपूरकर हे कुठल्यातरी घराण्याचे अनुग्रहित असल्याचे दिसून येते.
घरोघरी आहे समाधी स्थळ
अशाच या थोर गुरुपरंपरेंच्या घराण्यात अनेक सिद्ध पुरुष, संत, महात्मे योगी होऊन गेलेत. ज्यांनी आपली ईह जन्माची यात्रा संपवताना समाधी घेतली. घराघरांमध्ये असलेली ही समाधी स्थळे नागपूरच्या आध्यात्मिक वारसेची सुह्र्द खूणच होय. आपल्याशी निगडित भक्तजनांमध्ये चैतन्य निर्माण करून त्यांना निरंतर आनंद व समाधान देणे, त्यांना भक्ती-उपासना मार्गाचा अवलंब करायला लावणे आदींची साक्ष ठरलेली ही समाधी स्थळे होय. चित्तातील चेतना जागृत करून समाजातील चेतनाशक्तीचा उपयोग एका विधायक कार्यासाठी करणे, प्रसंगी त्यासाठी सर्वसंगपरित्याग करणे, हे तर कोणीही नागपूरकरांकडून शिकावे. मग तो स्वातंत्र्यलढा असो , सामाजिक जागृती असो की एखादे आंदोलन असो. समाज व राष्ट्र उन्नतीसाठी नित्य आपल्या भक्तांना सकारात्मक व तेजस्वी शिकवण, ही समाधी स्थळे देत आली आहेत. आज जरी हे गुरु देह रूपाने नसले तरी त्यांचे चैतन्य भक्तांना नित्य मार्गदर्शक ठरते व त्यांची शिकवण जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती प्रदान करते.अश्याच काही समाध्यांची माहिती आपण जाणून घेऊ यात.
साल्पेकर देवघर येथील समाधी
गजानन महाराज यांचा मठ | साल्पेकर यांचे देवघर
जुन्या पिढीतील अनेक कुटुंबांचे गुरूस्थान असलेले देवघर. महाल संघ कार्यालयाजवळ ही मठवास्तु आहे.
दत्तं जनार्दनं, नाथं, उध्दवं केशवं तथा।
गणेशं पद्मनाभं च गोविंदं ज्ञानदं शुभम्।
मनोहरम नृसिंहं च गजानन गुरु तथा ।
वंदे तत् शिष्यं गोविंदम् तत् शिष्यं च हरिहरम् ।
तत् शिष्यं रामचंद्रम् च सद्गुरुभ्यो नमो नमः ।
एषा परंपरा भक्त्या स्मर्तव्या शिष्य साधकैः ।।
वरील ओळींत या सांप्रदायिक गुरुशिष्यांची परंपरा असलेल्यांचा उल्लेख आहे. सध्या देवघराची-मठाची वास्तू पडीत असून तेथे केवळ समाध्यांवर छत्र आहे. पूर्वी त्याच्या अवतीभोवती जंगल होते. पूर्व दिशेने देवघरात प्रवेश करतांना उजव्या हाताला दिसणारी विहीर फार पूर्वीपासून आहे. गुरूपरंपरेतील सद्गुरू श्री. गणेश आणि त्यांचे शिष्य पद्मनाथ यांची समाधीस्थाने मठाच्या बाहेर आहेत. भारतातील सकल संतवृंदांच्या मुक्कामचे हे स्थान असे. आजजरी साल्पेकर घराणे इथे निवासास नसले तरी परंपरेचे समस्त उत्सव त्यांच्या राहत्या ठिकाणी साजरे होतात. सकल भक्तगण आजही राम जन्मोत्सव, अखंड भजन सप्ताह, गंगा लहरी पुराण, भागवत सप्ताह, त्रिपुरी पौर्णिमा आदी उत्सवात उत्साहाने सहभागी होतात.
श्री विश्वंभर आबांचा मठ
नागपूर शहरातील महाल विभागात लाकडीपूल परिसरात चिरंजीवी रुग्णालयासमोर विश्वंभर आबा मठ आहे. या वास्तूच्या तळमजल्यात लाकडी कोरीव खांब तसेच नक्षीकाम केलेले एक देवघर आहे. या देवघरात विठ्ठल रखुमाई यांच्या सुबक मूर्ती आहेत. या मूर्ती स्थानापासून काही अंतरावर पुढे पण देवघरातच श्री. विश्वंभर आबा यांची काळ्या व पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेली पिरॅमिडच्या आकाराची संजीवन समाधी आहे. या वास्तूची देखभाल सध्या जामकर कुटुंबीयांकडे आहे. श्री. विश्वंभर आबांची पुण्यतिथी, गुरुपूजा, श्रीव्यंकटेश तसेच शारदीय देवीचे नवरात्र, श्रीमल्हारीमार्तंड नवरात्र, इत्यादी उत्सव समस्त भक्तांच्या उपस्थितीत साजरे होत असतात.
या व अश्याच प्रकारच्या उपासना पध्दती जवळपास समस्त समाधी स्थानांवर आढळतात. प्रत्येक समाधीस्थळावर साजरे केले जाणारे उत्सव जरी भिन्न असले, पद्धती वेगळ्या असल्या तरी आत्मजागृती व ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य मात्र एकसारखेच आढळते. सगुणाची उपासना करता करता निर्गुण तत्त्वापर्यंत नेणे, जीवशिव ऎक्याच्या प्रवासपर्यंत भक्तांचा प्रवास घडवून आणणे, हे उच्चकोटीचे कार्य या समाधीस्थ योगीजनांचे आहे. या आध्यात्मिक आत्मगौरवाचा इतिहास रचणारी जागोबा महाराज, उदासीन बाबा, श्री उपासराव महाराज, तानकोपंत, गोविंदराव महाराज, गणोबा महाराज, साध्वी यमुनाबाई , निकालास महाराज, माधवनाथ महाराज, सुदाम बुवा,सदाशिव भट्ट , तेलीबुवा यांचे गुरू, ब्रह्मचारी बुवा, भुरे महाराज, गणोबा महाराज, लद्दू महाराज, आबाजी महाराज, मुकुंद गोसावी ,मुकुंद महाराज साधू ,भूतेश्वर महाराज इत्यादींची समाधी स्थळ होत.
जामकर यांचे 'योगीराज'
डी डी नगर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. राम जामकर यांनी लिहिलेल्या योगीराज या पुस्तकामध्ये फणिंद्रपुरातील ५५ हून अधिक समाधी स्थळांची माहिती दिलेली आहे. त्यांचा इतिहास, परंपरा, साजरे केले जाणारे उत्सव यांचे सविस्तर वर्णन या पुस्तकात केलेले आहे. तसेच काही भग्न झालेल्या खंडित पावलेल्या समाध्यांचीही यादी जामकरांनी दिलेली आहे. यापैकी काही समाधी या संजीवन तर काही नाम समाधी असल्याचे म्हंटले आहे.
रामायण कालापासून तपोभूमी असलेल्या या फणिंद्रपुरास संत, साधू, योगी, महात्म्यांच्या तपश्चर्येमुळे एक तेजोवलय प्राप्त झालेले आहे. अलीकडच्या काळातल्या या समाध्या श्रद्धा-भक्ती-साधना-उपासनेचे केंद्र आहेत. हे समाधीस्थ योगीजन सर्वसामान्यांना अतृप्ततेकडून आत्मतृप्तेकडे घेऊन जाणारे आहेत. विविध परंपरेने नटलेली फणिंद्रपूरची भूमी म्हणूनच पुण्यभू भारताचे परमवैभव आहे. स्वतः सह संपूर्ण विश्वास मांगल्याने परिपूर्ण करून सनातन धर्माची ऊर्जा अबाधित ठेवण्याचे कार्य ही समाधी स्थळं करतात आहे. त्याचबरोबर फणिंद्रपुराचा आत्मगौरवही वाढवतात आहे. आपणही या समाधी स्थळांना निश्चितपणे भेट देऊन येथील दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्यावा, अशी सर्व वाचकांना नम्र विनंती.
समाधी शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली?
समाधी शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे – ‘ सम्यक् आधीयते मनः यस्मिन् ।’ म्हणजे ज्या अवस्थेत मन योग्य प्रकारे स्थिर ठेवले जाते, ती समाधी. हा शब्द सम्+आ+धा असा बनला आहे. ‘सम्’ उपसर्गाचा अर्थ ‘योग्य रीतीने’, ‘आ’ उपसर्गाचा अर्थ ‘पर्यंत’आणि ‘धा’ धातुचा अर्थ ‘ठेवणे’ असा आहे. योगशास्त्रात ‘समाधी’ हा शब्द चित्ताची एकाग्रता आणि चित्तवृत्तींचा निरोध या दोन्ही अर्थांनी वापरला असला, तरी व्यवहारात ‘समाधी’ हा शब्द निरोधापेक्षा चित्ताच्या एकाग्रतेसाठी अधिक वापरला जातो. अशी ही समाधी घेतांना जीवनभराची साधना, योगनैपुण्य, आत्मसंयम अश्या अनेक बाबींची आवश्यकता असते. या समाधी अवस्थेला एखाद्या संयात्मा योगीपुरूषच प्राप्त होऊ शकतो. अश्या अनेक समाधीस्थ योगीजनांच्या पावन वास्तव्याने पुनित झालेले स्थान म्हणजे फणिंद्रपूर म्हणजेच नागपूर.
श्रीमत पंत प्रधान उभयता भेटी ।
होतांची हर्षली धरा सुखवृष्टि ।
मुक्काम फणींद्रपुराहुन महाराज श्रीमंत ।
सुमुहुर्ते डेरे दिधले संगमावरतं ।
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️
️सौ मृणालिनी राजेश वाघमारे
संचालिका, संस्कार सृष्टी
संस्कृत - मराठी शिक्षा केंद्र



Comments
Post a Comment
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️