कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism
आचऱ्याच्या खारफुटीपासून ते हिडन बीच कॅम्पिंगपर्यंत...बालपणीच्या निसर्गप्रेमातून जन्माला आलेला आणि शाश्वत पर्यटनाचा नवा आदर्श ठरलेला कोकणस्पर्शचा प्रेरणादायी प्रवास. मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील एकनाथ आचरेकर या तरुणाचा IT क्षेत्रातून पर्यटन उद्योजकतेकडे झालेला हा प्रवास आज स्थानिक रोजगारनिर्मिती आणि कोकणाच्या अस्सल अनुभवाचा नवा अध्याय लिहित आहे. हे कसं शक्य झालं ते त्यांच्याचकडून समजून घेऊ यात!
कोकणाचा खरा अनुभव देणारी जिवंत कहाणी
‘कोकणस्पर्श’ चा आमचा अधिकृत प्रवास ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाला, पण कोकणाशी असलेलं आमचं नातं लहानपणापासूनच खूप घट्ट आहे. निसर्ग, समुद्र आणि स्थानिक संस्कृतीशी असलेल्या या जवळिकीमधूनच या पर्यटन उपक्रमाची प्रेरणा मिळाली. आमचं बालपण आचरा परिसरातील ‘बागजामडुळवाडी’ या छोट्या बेटावर गेलं. चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेलं असूनही या बेटावरील विहिरींमध्ये गोड पाणी मिळतं, ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे.
या भागातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आणि मेहनतीची कामं हा आहे. साधारण ४०–५० वर्षांपूर्वी आमचे आजोबा डोंगराळ भागात शेती करत होते. मात्र शेतीसाठी लागणारी मोठी मेहनत, संसाधनांची कमतरता आणि मनुष्यबळाच्या अडचणी यामुळे पुढे आमच्या कुटुंबाने मासेमारीकडे वळण्याचा निर्णय घेतला. यानंतर पारंपरिक पद्धतीने, हाताने वल्ही मारून छोट्या होडीतून मासेमारी करणं हाच आमच्या आई-वडिलांचा मुख्य व्यवसाय बनला. त्यांच्या रोजच्या मेहनतीवरच आमचं शिक्षण, घरखर्च आणि दैनंदिन जीवन अवलंबून होतं. लहानपणापासून आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वाढलो. छोट्या होडीतून खारफुटीच्या जंगलात फिरणं, मासे पकडणं, शिंपले, ऑयस्टर आणि क्लॅम्स गोळा करणं, पोहणं आणि त्या स्वच्छ व थंडगार वातावरणात वेळ घालवणं हा आमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता.
डोंगर आणि जंगलातील ट्रेकिंग | Mountains & Jungle Trekking
आम्हाला डोंगर आणि जंगलातील ट्रेकिंगचीही खूप आवड होती. जिथे पूर्वी आमची शेती होती, तो परिसर कालांतराने नैसर्गिक जंगलामध्ये बदलला होता. तिथे रानफळं आणि बेरीज गोळा करणं, दीपगृह (Lighthouse) आणि आसपासच्या कड्यांवर भटकंती करणं हे आमचं नेहमीचं साहस होतं. या सगळ्यांमध्ये आमच्या मनाजवळची एक खास जागा होती - दोन डोंगरांच्या मधोमध वसलेला एक शांत आणि लपलेला समुद्रकिनारा. मानवी वस्तीपासून दूर असलेला हा बीच स्वच्छ, शांत आणि प्लास्टिक प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्त होता. तिथलं नितळ, पारदर्शक पाणी आणि निसर्गरम्य दृश्य आम्हाला निसर्गाशी अधिक जोडून टाकायचं.आम्ही अनेकदा पूर्ण दिवस त्या समुद्रकिनाऱ्यावर घालवत असू. घरून डबा घेऊन जाणं, नारळाच्या झाडाखाली साधा स्वयंपाक करणं, वाळूत खेळणं आणि समुद्राच्या लाटांमध्ये रमणं - या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. कधी कधी आम्ही त्या समुद्रकिनाऱ्यावर रात्री मुक्कामही करत असू. मोकळ्या आकाशाखाली, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत झोपण्याचा अनुभव अतिशय वेगळा आणि अविस्मरणीय होता. नंतर आम्ही हे अनुभव आमच्या नातेवाईकांना आणि सुट्टीत गावाला येणाऱ्या मित्रांनाही देऊ लागलो. ते आमच्या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य पाहून भारावून जात आणि नेहमी म्हणत, “तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, कारण असा निसर्ग तुम्हाला सहज मिळालाय.”
Kayaking at Konkansparsh
“Tourism4in1”
२०१० नंतर ग्रामीण कोकणामध्ये पर्यटन हळूहळू वाढू लागलं. नवीन रिसॉर्ट्स, होमस्टे आणि पर्यटनाशी संबंधित सुविधा विकसित होऊ लागल्या. मालवण आणि आसपासचे समुद्रकिनारे स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्समुळे लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले. मात्र आचरा परिसरात २०१७–१८ पर्यंत अनेक रिसॉर्ट्स आणि होमस्टे सुरू झाले असले तरी पर्यटकांसाठी विशेष पर्यटन ॲक्टिव्हिटीज उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बहुतेक पर्यटकांना मालवणकडे जावं लागत होतं. याच ठिकाणी आम्हाला एक मोठी संधी दिसली. ऑक्टोबर २०१८ मध्ये आम्ही “Tourism4in1” या नावाने पर्यटन क्षेत्रात काहीतरी वेगळं सुरू करण्याचा निर्णय घेतला. कारण एका ठिकाणी पर्यटकांना चार वेगवेगळे अनुभव मिळत होते - मँग्रोव्ह बोट सफारी, लाईटहाऊस भेट, फिशिंग अनुभव आणि हिडन बीच कॅम्पिंग. आम्ही स्थानिक रिसॉर्ट्स आणि होमस्टे मालकांना भेटून त्यांच्या पर्यटकांना आमच्या उपक्रमाबद्दल माहिती देण्याची विनंती केली. काही महिन्यांतच आमच्या मँग्रोव्ह बोट सफारीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. पर्यटकांना खारफुटीचं जंगल, शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यं खूप आवडू लागली. कमी वेळात अनुभवता येणारी ही सफर असल्यामुळे ती पर्यटकांची आवडती ॲक्टिव्हिटी बनली. आम्ही सफारीमध्ये सतत सुधारणा करत गेलो.
Konkan - Unexplored Coastal Gem
हिडन बीच कॅम्पिंग ॲडव्हेंचरची मज्जा
खारफुटीच्या विविध प्रजाती, पक्षी, मासे आणि स्थानिक जैवविविधतेचा अभ्यास करून पर्यटकांना त्याबद्दल माहिती सांगू लागलो. निसर्गाशी जोडलेला आणि माहितीपूर्ण अनुभव हेच आमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर आम्ही हिडन बीच कॅम्पिंग, लाईटहाऊस टूर, डॉल्फिन सी सफारी, फिशिंग अनुभव आणि इतर अनेक निसर्गाधारित उपक्रम सुरू केले. “हिडन बीच कॅम्पिंग ॲडव्हेंचर” हा आमचा सर्वात वेगळा आणि लोकप्रिय अनुभव आहे. या अनुभवामध्ये किनारी भागातील बोटिंग, जंगलातून ट्रेकिंग, शांत समुद्रकिनाऱ्यावर मुक्काम, कॅम्पफायर, बार्बेक्यू, मोकळ्या आकाशाखाली तारांकित रात्रीचा अनुभव आणि अस्सल मालवणी जेवण - हे सर्व एका अनोख्या प्रवासात अनुभवायला मिळतं.
गेल्या काही वर्षांत हा अनुभव पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय झाला आहे. अनेक पर्यटकांसाठी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात शांत, वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव ठरतो. KonkanSparsh मध्ये आम्ही नेहमी सेवा गुणवत्ता आणि मनापासून केलेल्या आदरातिथ्याला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तम अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.आज आमचे सातत्याने मिळणारे Google वरील ५ स्टार रेटिंग हेच आमच्या प्रामाणिकपणा, सेवा गुणवत्ता आणि पर्यटकांप्रती असलेल्या समर्पणाची खरी ओळख आहे. या सुंदर परिसराचं नैसर्गिक सौंदर्य, आमचं एकत्र कुटुंब आणि आमच्यासोबत जोडले गेलेले स्थानिक गावकरी हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.
शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन
आमच्यासाठी KonkanSparsh हा फक्त पर्यटन व्यवसाय नाही. हा एक प्रयत्न आहे, सुंदर आठवणी निर्माण करण्याचा, स्थानिकांना रोजगार देण्याचा, निसर्गाचं संवर्धन करण्याचा आणि महाराष्ट्रात शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा. कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य जपत पर्यावरणपूरक आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. स्थानिक बोट चालक, मार्गदर्शक, मच्छीमार, शेतकरी, कलाकार आणि खाद्यव्यवसायाशी संबंधित लोकांसोबत काम करून आम्ही रोजगाराच्या संधी निर्माण करतो. कोकणातील निसर्ग, संस्कृती, आदरातिथ्य आणि साधेपणाचा खरा अनुभव प्रत्येक पर्यटकाला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
२०११ मध्ये BE पदवी पूर्ण केल्यानंतर मी कॉर्पोरेट क्षेत्रात माझ्या करिअरची सुरुवात केली आणि IT क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. कामाच्या निमित्ताने २०१९ मध्ये मला युरोपमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर २०२३ ते २०२५ या दरम्यान IT प्रोजेक्टसाठी अमेरिकेतही राहण्याचा अनुभव मिळाला.परदेशात राहून विविध देशांतील पर्यटन, संस्कृती, जीवनशैली आणि लोकांचे अनुभव जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. या अनुभवांमुळे पर्यटनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आणि कोकणातील नैसर्गिक सौंदर्य जगापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा अधिक मजबूत झाली. नोकरी सांभाळत असतानाच गावी सुरू केलेली कोंकणस्पर्श ही संकल्पना आम्ही सातत्याने पुढे नेत राहिलो. माझा लहान भाऊ ओमप्रकाश आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पूर्ण मेहनतीने आणि समर्पणाने हा व्यवसाय पुढे चालू ठेवला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हा उपक्रम अधिक मजबूत बनवू शकलो. मी दूर राहूनही सतत या उपक्रमाशी जोडलेलो होतो. नवीन कल्पना, अनुभव आणि पर्यटन क्षेत्रातील आधुनिक संकल्पनांचा अभ्यास करून आम्ही आमच्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत गेलो. आमचं उद्दिष्ट नेहमीच एकच राहिलं; पर्यटकांना कोकणाचा खरा, नैसर्गिक आणि मनापासून अनुभव देणं. सप्टेंबर २०२५ मध्ये मी माझ्या नोकरीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.
कॉर्पोरेट क्षेत्रातील ठरलेली चौकट, सततचं बॉसिंग कल्चर आणि मर्यादित स्वातंत्र्य हे मला सुरुवातीपासूनच फारसं पटत नव्हतं. त्यामुळे काहीतरी स्वतः चं आणि अर्थपूर्ण उभारण्याचा विचार अनेक वर्षांपासून मनात सुरू होता. दरम्यान कोंकणस्पर्श या पर्यटन उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद, पर्यटकांचे अनुभव, वाढत जाणारी लोकप्रियता आणि भविष्यातील संधी पाहता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो याची आम्हाला खात्री वाटू लागली. यामागे आम्ही अनेक व्यावहारिक गणितं, पर्यटन क्षेत्रातील वाढ आणि भविष्यातील संधींचा गंभीरपणे अभ्यास केला. शेवटी लाखोंच्या पगाराची नोकरी आणि जवळपास १४ वर्षांचा IT क्षेत्रातील अनुभव बाजूला ठेवून काहीतरी नवीन, स्वतःचं आणि मनापासून करण्याचा ध्यास घेत मी पूर्णपणे कोंकणस्पर्शमध्ये उतरलो.
![]() |
| ओमप्रकाश |
या संपूर्ण प्रवासात माझा लहान भाऊ ओमप्रकाश, आमचं एकत्र कुटुंब यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचं सततचं सहकार्य, मेहनत आणि विश्वास यामुळेच आम्ही हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो आहोत. आज कोंकणस्पर्श हा फक्त व्यवसाय नाही, तर आमच्यासाठी एक स्वप्न, एक जबाबदारी आणि कोकणातील शाश्वत पर्यटनाला पुढे नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आचरा येथे कसे पोहोचाल | How to reach Konkansparsh, Achra Village in Konkan
कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, शांत वातावरण आणि अस्सल मालवणी संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आचरा हे एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. आचरा येथे पोहोचण्यासाठी अनेक सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहेत.
१. खासगी वाहनाने: मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा गोवा येथून तुम्ही स्वतः च्या कार किंवा दुचाकीने सहज आचरा येथे पोहोचू शकता. प्रवासादरम्यान कोकणातील सुंदर घाटरस्ते आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.
२. विमानाने: सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ, मालवण. विमानतळावरून आचरा येथे कॅब किंवा ऑटोद्वारे सहज पोहोचता येते.
३. कोकण रेल्वेने: कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली हे आचराच्या सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कणकवलीहून आचरा येथे जाण्यासाठी कॅब, ऑटो किंवा स्थानिक वाहतूक सेवा उपलब्ध आहेत.
४. खासगी ट्रॅव्हल्स बसने: मुंबई आणि पुणे येथून मालवणसाठी अनेक खासगी बस सेवा उपलब्ध आहेत. मालवण येथे उतरून पुढे स्थानिक वाहतुकीने आचरा येथे जाता येते.
५. गोव्याकडे जाणाऱ्या बसने: मुंबई किंवा पुणे येथून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसने प्रवास करत असल्यास कणकवली येथे उतरू शकता. तेथून कॅब किंवा ऑटोने अल्प वेळात आचरा येथे पोहोचता येते.आचरा येथे येण्यासाठी कोणताही पर्याय निवडा आणि कोकणातील अविस्मरणीय पर्यटन अनुभवाचा आनंद घ्या!
प्रत्येकाने एकदा तरी या निसर्गरम्य कोकणस्पर्शला अवश्य भेट द्यावी. तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️




Amazing place
ReplyDeleteखूप छान ठिकाण आहे, अनुभवण्यासारखे
ReplyDeleteGood article
ReplyDeletewow
ReplyDeletegreat place to visit, great article
ReplyDeleteखूप छान 👍 नक्की भेट द्यायला आवडेल
ReplyDeleteकोकणपट्टी ही महाराष्ट्र वैभव आहे.
ReplyDeleteकोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीची भुरळ घालणारे लेखन. छान माहिती
ReplyDelete